इंग्लंडचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कसोटीपटू अॅलस्टर कूकने आज सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषीत केली. भारताविरुद्ध होणारा ५वा आणि शेवटचा कसोटी सामना खेळुन क्रिकेटला तो अलविदा करणार आहे.
क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीचा शेवट हा नेहमीच इतर खेळांपेक्षा खराब राहिला आहे. त्याला जगातील अगदी भलेभले खेळाडूही अपवाद राहिले नाहीत. काही दिग्गजांना तर निवृत्तीचा सामना देखील खेळण्याची संधी मिळाली नाही.
असे असताना कूकची निवृत्ती मात्र कुठेतरी चटका लावुन जाते. जे कुमार संगकारा, केविन पीटरसन किंवा अगदी एबीने केलं असच काहीसं कूकनेही केलं असं म्हणता येईल. जेमतेम १२-१३ वर्ष क्रिकेट खेळून १२ हजार धावा जमवणे नक्कीच सोपं नाही. काही दिग्गजांना १२-१३ वर्षांत जेथे १० हजार धावा देखील जमवता आल्या नाहीत तिथे कूकने १२ हजारांचा टप्पा वयाच्या ३३व्या वर्षीच पार केला होता. आता तुम्ही म्हणाल हे तसंही उशीराच आहे. तर एक उदारण म्हणुन विचार करा की यापुढे २९वर्षीय विराटने ४-५ वर्षांनी निवृत्ती घेतल्यावर ज्या भावना आपल्या असतील तसंच काहीसं कूकचं झालं.
जरी त्याच्या बॅटमधून धावा येत नसल्या तरी त्याने प्रयत्न करायला नक्कीच हरकत नव्हती. त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळून पुन्हा राष्ट्रीय संघात हक्काचे स्थान मिळवायला हवं होतं. अगदी फीटनेसपासून तंत्रापर्यंत त्याच्या खेळात नक्कीच कुठे काही कमतरता नव्हती. कूकसारखा विचार केला असता तर अनेक खेळाडूंची कधी कारकिर्दच घडू शकली नसती.
यावर्षी कूकने ९ कसोटी सामन्यात १८.६२च्या सरासरीने २९८ धावा केल्या आहेत. ज्या कूकने भारताविरुद्ध २००६मध्ये नागपूरला नाबाद १०४ धावांची खेळी करत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, ज्याने कारकिर्दीत भारताविरुद्ध तब्बल २२०० कसोटी धावा केल्या त्याच भारताविरुद्ध या कसोटी मालिकेत खेळताना कूकची बॅट चाललीच नाही. क्रिकेट हा खेळ जेवढे देतो तेवढेच घेतो, उगीच म्हणत नाही. ४ कसोटी सामन्यात जेमतेम १०९ धावा या खेळाडूने केल्या. यामुळे त्याचा निवृत्तीचा हा विचार पुढे आला असावा.
कारण काहीही असो परंतु कूकमध्ये सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची मोठी संधी होती. अशी संधी जागतिक क्रिकेटमध्ये ज्या पाॅटिंग, संगकारासारख्या खेळाडूंना होती त्यात कूकचे नाव हे सर्वात पुढे होते. अफलातून फाॅर्ममध्ये असलेल्या आणि २०११पासून विशेष बॅट चमकलेल्या संगकाराने अचानक निवृत्तीची घोषणा करुन ही संधी घालवली तर कारकिर्दीच्या शेवटी पाॅटींगच्या बॅटमधील धावा आटल्याने त्याला हा कारनामा पुढे करता आला नाही.
कूक या बाबतीत अनेक कारणांनी संगकारा आणि पाॅटिंगच्या पुढे होता.
वय हेच मुख्य कारण
त्यातील सर्वात मुख्य कारण म्हणजे या खेळाडूच वय. ३२-३३व्या वर्षी या खेळाडूने जो काही कारनामा केला आहे तो कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या कोणत्याही खेळाडूला जमला नाही. या वयात त्याच्या नावावर १२२५४ धावा आहेत. दिग्गज कसोटीपटू हे अगदी वयाच्या ४०व्या वर्षीही क्रिकेट खेळताना आपण पहिले आहे.
अफलातून फॉर्म:
जेमेतेम १२ वर्षाच्या कारकिर्दीत हा खेळाडू कधीही जास्त काळ खराब फॉर्ममध्ये राहिला नाही. ४४.८८ ची सरासरी राखून असणारा हा सलामीवीर कित्येक कसोटी मालिकेत संघाला एकहाती सामना जिंकून देत होता. भारतात येऊन भारताला हरवणारा हाच तो कर्णधार. १६० सामन्यात ३८ शतके आणि ५२ अर्धशतके या खेळाडूच्या नावावर आहेत.
इंग्लंड संघ खेळत असलेले सामने.:
कूकच्या पदार्पणापासून आजपर्यंत सार्वधिक कसोटी सामने खेळलेला देश जर कोणता असेल तर तो आहे इंग्लंड. या कालावधीत इंग्लंड तब्बल १६१ कसोटी सामने खेळला असून त्यात कूकने १६० कसोटीमध्ये भाग घेतला आहे. अन्य देश जसे की भारत (१३३), ऑस्ट्रेलिया(१३५), दक्षिण आफ्रिका(१२१), श्रीलंका(११७), न्यूझीलंड (१०९) आणि विंडीज (१०२) हे देश केवळ १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळू शकले आहेत.
इंग्लंड हा देश वर्षाला सरासरी १२.८८ कसोटी सामने गेली १२ वर्ष खेळत आहे. पुढील ३-४ वर्ष कूक जर ह्याच सरासरीने खेळत राहिला असता आणि इंग्लंड एवढेच सामने दरवर्षी खेळला असता तर सचिनचे रेकॉर्ड मोडणं कूकसाठी नक्कीच अवघड नव्हते.
इतिहास कूकच्या बाजूने
कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा कोणताही खेळाडू ३६ वयापूर्वी निवृत्त झाला नाही. सचिन(४०-४१), रिकी पॉन्टिंग(३७), कॅलिस(३७), राहुल द्रविड(३८), संगकारा(३७), लारा(३७), चंद्रपॉल(४१) हे खेळाडू अगदी ३५-३६ वयातही चांगली सरासरी राखून क्रिकेट खेळत होते. त्यामुळे ३३ वर्षीय कूकच्या बाजूने हा मोठा इतिहास होता. तसेच गेल्याच महिन्यात योयो या फिटनेस टेस्टमध्ये हा खेळाडू इंग्लंडसंघातील सर्वाधिक गुण घेणारा खेळाडू ठरला होता,
एकदिवसीय सामने:
१२ वर्षांच्या कारकिर्दीत कूक जेमतेम ९२ एकदिवसीय सामने खेळला आहे. आजकाल क्रिकेटपटू कारकीर्द लांबण्यासाठी मोठ्या प्रमाणावर क्रिकेटच्या कोणत्यातरी एकाच प्रकारात खेळतात. कूक तर अगदी पहिल्यापासून हे करत आला आहे. मोठ्या प्रमाणावर कसोटी क्रिकेट खेळणारा हा खेळाडू मर्यादित षटकांच्या क्रिकेटपासून ४ हात दूरच आहे. अनेकवेळा त्याची या प्रकारासाठी संघात निवडही झाली नाही. याचा मोठा फायदा कूकला कसोटी कारकीर्द वाढविण्यासाठी झाला होता आणि पुढेही झाला असता.
क्रिकेटमध्ये जर-तरला नसते महत्व:
क्रिकेट हा खेळ असा आहे की जर तरला यात अजिबात स्थान नाही. त्यामुळे कूककडून सचिनचा विक्रम मोडलाच जाईल असेही काही नाही. तसेच क्रिकेट खेळण्यासाठी जी एक मोठी इर्षा लागते तीही कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असणे खूपच गरजेची आहे. अखेर अशी इच्छा असण्याला क्रिकेटमध्ये तरी पर्याय नाही. याचमुळे यावर्षी आपण एबीसारख्या एका दिग्गजाला निवृत्त होताना पाहिले आणि आता याच वर्षी पुन्हा एकदा अशाच एका तोडीच्या दिग्गजाच्या खेळाला आपण मुकणार आहोत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–कोहली बाद तर झाला.. परंतु खास विक्रमांपासुन कुणी रोखु शकले नाही
–राशिद खान खेळणार या मोठ्या क्रिकेट लीगमध्ये