मंगळवारी(18 डिसेंबर) आयपीएल 2019 साठीचा लिलाव जयपूर, राजस्थान येथे पार पडला. या लिलावात देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमक दाखवलेल्या युवा खेळाडूंना सर्वच संघांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली.
यामध्ये तमिळनाडूच्या वरुण चक्रवर्तीने आयपीएल 2019 च्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. वरुणला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने 8.4 कोटींची बोली लावत संघात सामील करुन घेतले. वरुणला संघात घेण्यासाठी या लिलावात पंजाबसह दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स अशा सर्वांनीच प्रयत्न केले होते.
तो आयपीएल 2019 च्या लिलावात वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटसह सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. उनाडकटलाही राजस्थानने 8.4 कोटींची बोली लावत संघात घेतले आहे.
या लिलावाच्यावेळी वरुण आणि त्याचे कुटुंब उत्साहात असताना वरुणला किंग्ज इलेव्हन संघाचा कर्णधार आर अश्विनचाही फोन आला होता. याबद्दल टाइम्स आॅफ इंडियाला सांगताना तो म्हणाला, “जेव्हा मी माझ्या बाबांना लिलावानंतर आनंदाने मिठी मारत होतो तेव्हा अश्विनने मला फोन केला. तो मला म्हणाला, ‘किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये तूझे स्वागत आहे. मी तूझ्यासाठी खूप आनंदी आहे. आपण लवकरच भेटू. तूला शुभेच्छा.'”
“मी अश्विनच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी उत्सुक आहे. आम्ही एकाच राज्यातील आहोत आणि तो आता माझा कर्णधार असणार आहे. तो खूप चांगला खेळाडू आहे. मी माझ्यासाठी चांगल्या मोसमाचा विचार करत आहे. अश्विनकडे भरपूर अनुभव आहे. तो सर्वप्रकारचे क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे मला त्याच्याकडून खूप शिकायला मिळेल.”
अश्विन सध्या भारतीय संघाबरोबर आॅस्ट्रेलिया दौऱ्यात आहे.
27 वर्षीय वरुणला अनिल कुंबळेकडून मोठी प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे तो त्याचा मोठा चाहता आहे. तसेच त्याला कुंबळेला भेटण्याचीही इच्छा आहे.
याबद्दल तो म्हणाला, ‘मी रोज कुंबळेचे व्हिडिओ पाहतो. मी त्याला खूप जवळून पाहिले आहे. त्याचा लाइन आणि लेन्थसाठी असणारा संयम हा अफलातून आहे. त्याने तो खेळत असताना अनेक फलंदाजांना गोंधळून टाकले होते.’
‘त्याचे व्हिडिओ पाहिल्याने मला खूप मदत मिळाली आहे. मी कधीही कुंबळेला भेटलेलो नाही. पण आशा आहे की आयपीएलमुळे मला ही संधी मिळेल. टीएनपीएलमुळे मला मार्ग मिळाला तर आयपीएलमुळे ओळख मिळली आहे.’
वरुण तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये(टीएनपीएल) केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे सर्वांच्या समोर आला होता. त्याने या स्पर्धेत 9 विकेट्स घेतल्या होत्या. वरुणने याचवर्षी रणजी ट्रॉफीमध्येही पदार्पण केले आहे. त्याने हैद्राबाद विरुद्ध रणजी सामना खेळताना 1 विकेट घेतली होती.
तसेच त्याने अ दर्जाचे 9 सामने खेळले असून यात त्याने 22 विकेट्स घेतल्या आहेत. या सर्व विकेट्स त्याने यावर्षीच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत घेतल्या होत्या. तसेच तो यावर्षीच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–कोहली-कुंबळे वादाबद्दल भारताच्या या दिग्गज खेळाडूने केला मोठा खूलासा
–विराट कोहली सेना कंट्रीजमध्ये कमनशीबीच, नकोसा विक्रम झाला नावे
–टीम इंडियाला तिसरी कसोटी जिंकायची असेल तर हा शिलेदार संघात हवाच- मायकल हसी