नवी दिल्ली। न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना आयपीएल स्पर्धेसाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे की, आम्ही सध्या बीसीसीआयच्या आयपीएलवरील अधिकृत निर्णयाची वाट पाहत आहोत. २०२० टी२० विश्वचषक पुढे ढकलल्यामुळे आयपीएल २०२०च्या आयोजनाचा मार्ग बीसीसीआयसाठी मोकळा झाला आहे.
न्यूझीलंड क्रिकेटचे प्रवक्ते रिचर्ड बूक यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना पुष्टी केली आहे, की ते आपल्या खेळाडूंना एनओसी देणार आहेत. त्यांनी असेही म्हटले की, बोर्डाने हा निर्णय खेळाडूंवर सोडला आहे की त्यांना या स्पर्धेमध्ये खेळायचे आहे की नाही. बूक म्हणाले, “होय, न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड आयपीएलमध्ये भाग घेणाऱ्या न्यूझीलंडच्या खेळाडूंसाठी ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एनओसी जारी करणार आहे. खेळाडूंना एनओसी हवंय की नको हा निर्णय आम्ही खेळाडूंवर सोडला आहे.”
एएनआयने एनओसीबाबत जेव्हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी संपर्क साधला, तेव्हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रतिनिधीने सांगितले, “आधी स्पर्धेची पुष्टी केली गेली पाहिजे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यानुसार आपले विचार मांडेल.” अशामध्ये असे म्हटले जात आहे की, क्रिकेट ऑस्ट्रेलियादेखील करार केलेल्या आपल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देईल. कारण पॅट कमिंस (Pat Cummins) आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यांसारख्या खेळाडूंना आयपीएल फ्रंचायझींनी करोडो रुपये देऊन आपल्या संघात सामील केले आहे.
आयपीएल २०२०मध्ये खेळणारे न्यूझीलंडचे ६ खेळाडू-
केन विलियम्सन (सनरायजर्स हैद्राबाद), ट्रेंट बोल्ट (मुंबई इंडियन्स), मिचेल मॅकलेनघन (मुंबई इंडियन्स), जेम्स नीशम (किंग्ज इलेव्हन पंजाब), लॉकी फर्ग्यूसन (कोलकाता नाईट रायडर्स), मिचेल सँटनर (चेन्नई सुपर किंग्ज)
आयपीएल २०२०मध्ये खेळणारे ऑस्ट्रेलियाचे १४ खेळाडू-
ऍरॉन फिंच (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर), जॉश फिलीपी (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर), केन रिचर्डसन (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर), ख्रिस लिन (मुंबई इंडियन्स), नॅथन कुल्टर नाईल (मुंबई इंडियन्स), जॉश हेजलवूड (चेन्नई सुपर किंग्ज), शेन वॉटसन (चेन्नई सुपर किंग्ज), ऍलेक्स कॅरे (दिल्ली कॅपिटल्स), मार्कस स्टॉयनिस (दिल्ली कॅपिटल्स), ग्लेन मॅक्सवेल (किंग्ज इलेव्हन पंजाब), पॅट कमिन्स (कोलकाता नाईट रायडर्स), ख्रिस ग्रीन (कोलकाता नाईट रायडर्स), स्टिव्ह स्मिथ (राजस्थान रॉयल्स), अँड्र्यू ट्राय (राजस्थान रॉयल्स)
ट्रेंडिंग घडामोडी-
-बेन कटिंगने खरेदी केला आलिशान बंगला; किंमत ऐकून व्हाल हैराण
-बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने केली कोरोना टेस्ट; असा आला रिपोर्ट
-इंग्लंडला पहिला विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू २७ व्या वर्षी निवृत्त झाला