आधीच पराभवाच्या खाईत पडलेल्या वेस्ट इंडिज संघाला पहिल्या डॉमिनिका कसोटी सामनाही गमवावा लागला. या सामन्यात भारताचा 1 डाव आणि 141 धावांनी विजय झाला. या सामन्यात भारतीय संघाच्या प्रत्येक विभागाने कौतुकास्पद योगदान दिले. या सामन्यातून पदार्पण करणारा यशस्वी जयसवाल याने 171 धावा चोपत सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यासाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. तसेच, आर अश्विन याने दोन्ही डावात विकेट्सचे पंचक पूर्ण करत विक्रमांचा पाऊस पाडला. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा खूपच खुश झाला. तसेच, रोहितने मोठी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला रोहित?
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अनेक खेळाडूंसाठी कौतुकाचे पूल बांधले. सामन्यानंतर तो म्हणाला की, “देशासाठी धावा करणे महत्त्वाचे असते. मी असे म्हणून सुरुवात करू इच्छितो की, चेंडूसोबत शानदार प्रयत्न होता. 150 धावांवर सर्वबाद केल्यामुळे सामना आमच्या बाजूने आला होता. आम्हाला माहिती होते की, फलंदाजी करणे कठीण जाईल. धावा करणे सोपे नव्हते. आम्हाला माहिती होते की, आम्हाला फक्त एकदा फलंदाजी करायची होती आणि मोठी खेळी करायची होती. 400हून अधिक धावा केल्या आणि त्यानंतर आम्ही चांगली गोलंदाजी केली.”
जयसवालचे कौतुक
कसोटी पदार्पणात शानदार प्रदर्शन करणाऱ्या यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याच्याविषयी बोलताना रोहित म्हणाला की, “त्याच्याकडे प्रतिभा आहे, त्याने पहिल्या डावातही आपल्याला दाखवले आहे की, तो तयार आहे. तो आला आणि समंजस्यपणे फलंदाजी केली. त्याच्या स्वभावाची परीक्षाही घेतली गेली होती. कोणत्याही स्तरावर तो घाबरत नव्हता. आम्ही जे काही बोलत होतो, ते त्याला आठवण करून देण्यासाठी होते की, ‘तू इथलाच आहेस, तू खूप मेहनत घेतली आहेस, तू इथल्या तुझ्या वेळाचा आनंद घे.'”
ईशानच्या फलंदाजीनंतर का केला डाव घोषित?
भारतीय संघाने पहिला डाव 5 विकेट्स गमावल्यानंतर 421 धावांवर घोषित केला होता. डाव घोषित करण्याविषयी आणि ईशान किशन (Ishan Kishan) याच्या पदार्पणाविषयी रोहित म्हणाला की, “मी घोषित करण्यापूर्वी त्याला सांगितले होते की, आपल्याकडे एक षटक आहे. माझी इच्छा होती की, ईशानने त्याची छाप सोडावी. मी त्याला वैयक्तिक कामगिरी करण्यास सांगू इच्छित होतो आणि त्यानंतर आम्हाला डाव घोषित करावा लागला. मी पाहू सकत होतो की, तो नेहमीच फलंदाजीसाठी उत्सुक होता, हे त्याच्यासाठी थोडे निराशाजनक असू शकते.”
अश्विन आणि जडेजाबाबत काय म्हणाला रोहित?
‘हिटमॅन’ नावाने ओळखऱ्या जाणाऱ्या रोहितने सामन्यात 12 विकेट्स घेणारा फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) आणि 5 विकेट्स घेणारा अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्याविषयीही भाष्य केले. तो म्हणाला की, “निकाल हे स्वत:साठी बोलतात, ते काही काळापासून असे करत आहेत. त्यांना सांगण्यासाठी काहीच नाहीये. हे त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्याविषयी आहे. अशाप्रकारच्या खेळपट्टीवर या खेळाडूंचा अनुभव नेहमीच लक्झरी असतो. अश्विन आणि जडेजा दोघेही शानदार होते. खासकरून अश्विनचे अशाप्रकारे गोलंदाजी करणे शानदार होते.”
पुढे बोलताना रोहित म्हणाला की, “चांगली सुरुवात करणे नेहमीच चांगले असते. ही एक नवीन सायकल आहे. आम्ही खेळपट्टीविषयी जास्त चिंतीत नव्हतो. मात्र, आम्हाला इथे निकाल लावायचा होता. चांगली सुरुवात करणे गरजेचे होते. हे सर्व हीच लय दुसऱ्या कसोटीतही घेऊन जाण्याविषयी आहे. इथे असे अनेक लोक आहेत, जे जास्त कसोटी क्रिकेट खेळले नाहीत. त्यामुळे आता त्यांना फक्त मैदानावर आणण्याविषयी आहे.”
WHAT. A. WIN! 🙌 🙌
A cracking performance from #TeamIndia to win the first #WIvIND Test in Dominica 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/FWI05P4Bnd pic.twitter.com/lqXi8UyKf1
— BCCI (@BCCI) July 14, 2023
दुसरा सामना कधी?
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघातील दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून सुरू होणार आहे. हा सामना त्रिनिदाद येथील क्वीन्सपार्क ओव्हल मैदानात खेळला जाणार आहे. (1st dominica test india won by an innings and 141 runs skipper rohit sharmas reaction yashasvi jaiswal POTM)
महत्वाच्या बातम्या-
अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा! 709 विकेट्स पूर्ण करत हरभजनला पछाडलं, इतर 3 विक्रमही लईच भारी
अश्विन-यशस्वीच्या वादळात वेस्ट इंडिज उद्ध्वस्त! Team Indiaचा 1 डाव आणि 141 धावांनी दणदणीत विजय