इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) मधील दोन तगडे संघ, मुंबई सिटी एफसी आणि एटीके मोहन बागान यांच्यात शनिवारी (14 जानेवारी) सामना होणार आहे. या बलाढ्य संघांच्या सामन्यासाठी कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगण सज्ज झाले आहे. मुंबई सिटी एफसी 33 गुणांसह तालिकेत निर्विवादीतपणे अव्वल स्थानी विराजमान आहे आणि मोहन बागानविरुद्धचा विजय हा त्यांना दुसऱ्या स्थानावर असलेल्या हैदराबाद एफसी पेक्षा चार गुणांनी पुढे नेणारा ठरेल. दुसरीकडे एटीके मोहन बागानने विजय मिळवल्यास ते 26 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर सरकतील आणि हा त्यांचा मुंबई सिटी एफसीविरुद्धचा पहिला विजय ठरेल.
नवीन वर्षातील एटीके मोहन बागानचा हा पहिलाच सामना आहे. ज्युआन फेरांडोच्या या संघाने 2022चा विजयाने निरोप घेतला होता. त्यांनी एफसी गोवावर 2-1 असा विजय मिळवला होता. दिमित्री पेट्राटोस व ह्युगो बौमोस यांनी एफसी गोवाविरुद्ध गोल केले होते. फेडेरिको गॅलेगो व प्युतीआ या मध्यरक्षकांमुळे संघाची ताकद आणखी वाढली आहे. कार्ल मॅकह्युज यानेही प्रभावी कामगिरी केली आहे आणि जॉनी काऊकोच्या दुखापतीमुळे मोहन बागानची वाढलेली डोकेदुखी मॅकह्युजने थांबवली. पहिल्या टप्प्यात एटीके मोहन बागानने 2-2 अशा बरोबरीत मुंबई सिटी एफसीला रोखले होते आणि तेव्हा मॅकह्युजने 89व्या मिनिटाला महत्त्वाचा गोल केला होता.
”आमचा प्लान तोच आहे. चेंडूवर ताबा राखून आक्रमक खेळ करण्याचा आणि तीन गुण पदरी पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे. काहीवेळा ही रणनीती यशस्वी होते, काहीवेळा फसते, परंतु आमची मानसिकता तिच राहणार आहे. यंदाच्या पर्वात मुंबईची कामगिरी ही उल्लेखनीय राहिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या दर्जाचा खेळ आम्हालाही करणे गरजेचे आहे,”असे फेरांडो म्हणाले.
🔹 𝐌𝐚𝐭𝐜𝐡𝐝𝐚𝐲 🆚 𝐓𝐡𝐞 𝐌𝐚𝐫𝐢𝐧𝐞𝐫𝐬! 🔹#TheIslanders' have made their way to Kolkata as we take on ATK Mohun Bagan at the VYBK ⚡️
मंडळी, होऊ द्या आवाज आपल्या मुंबईच्या पोरांसाठी 💙#ATKMBMCFC #MumbaiCity #AamchiCity 🔵 pic.twitter.com/5BruVnciJm
— Mumbai City FC (@MumbaiCityFC) January 14, 2023
मुंबई सिटीने मागील सामन्यात केरळा ब्लास्टर्स एफसीवर 4-0 असा दणदणीत विजय मिळवून वर्षाची सुरुवात दणक्यात केली होती. त्यांचा हा सलग आठवा विजय ठरला होता आणि आता त्यांना हिरो आयएसएलमध्ये सलग 9 विजयाचा विश्वविक्रम खुणावत आहे. यंदाच्या पर्वात मुंबई सिटीने 13 सामन्यांत अपराजित मालिका कायम राखली आहे आणि यंदाच्या पर्वातील हा एकमेव अपराजित संघ आहे.
मुख्य प्रशिक्षक डेस बकिंगहॅम यांना उद्याच्या सामन्यात क्लबकडून सर्वाधिक गोल करणाऱ्या जॉर्ज डिएझशिवाय खेळावे लागणार आहे. केरळाविरुद्ध त्याने दोन गोल केले होते आणि एक गोलसाठी सहाय्य दिलं होतं. त्याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं आहे. केरळाविरुद्ध पहिल्या हाफमध्ये ग्रेग स्टीवर्ट यानेही दुखापतीमुळे मैदान सोडले होते, परंतु तो उद्याच्या सामन्यात खेळणार आहे. अल्बर्टो नोग्युएरा त्याला मधल्या फळीत सहाय्य करायला असणार आहे.
”यंदाच्या पर्वात ज्या पद्धतीने आमचा खेळ झालाय, त्याने मी आनंदी आहे. आम्ही चांगल्या पोझिशनवर आहोत, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही प्रत्येक सामन्यागणित खेळात सुधारणा करत चाललो आहोत. अशीच वाटचाल आम्हाला कायम राखायची आहे. एटीके मोहन बागान सारख्या तगड्या संघाचा सामना करण्यासाठी शक्य तेवढी मेहनत आम्ही घेतली आहे. प्रत्यक्ष सामन्यात त्याहून अधिक योगदान देण्याचा आमचा प्रयत्न असेल,”असे बकिंगहॅम यांनी सांगितले.
आयएसएलमध्ये दोन्ही संघ 6 वेळा समोरासमोर आले आणि त्यात मुंबई सिटीने 4 विजय मिळवले. अन्य दोन लढती ड्रॉ राहिल्या. (ISL 2022-23 ATK Mohun Bagan’s challenge to the top ranked Mumbai City FC)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धावांचा पाऊस पाडून काही उपयोग नाही सरफराज टीम इंडियाच्या बाहेरच! सरासरीत फक्त ब्रॅडमनच्या मागे
बंगळुरू प्ले ऑफसाठी प्रयत्नशील, तर ओडिशा तिसऱ्या स्थानावर झेप घेण्यासाठी उत्सुक