हरारे| बांगलादेशचा संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून उभय संघात वनडे मालिका सुरू झाली आहे. शुक्रवार रोजी (१६ जुलै) हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर झिम्बाब्वे विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला वनडे सामना पार पडला आहे. पाहुण्या बांगालादेशने तब्बल १५५ धावांच्या फरकाने हा सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान बांगलादेशचा ३४ वर्षीय वेगवान गोलंदाज शाकिब अल हसन याने इतिहास रचला आहे.
प्रथम फलंदाजी करताना यष्टीरक्षक फलंदाज लिटन दासच्या शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने २७६ धावा केल्या होत्या. बांगलादेशच्या २७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ अवघ्या १२१ धावांवर सर्वबाद झाला. झिम्बाब्वेला रोखण्यात बांगलादेशच्या डावखुऱ्या गोलंदाज शाकिबने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ९.५ षटके गोलंदाजी करताना ३० धावांवर ५ विकेट्स घेतल्या.
झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रेंडन टेलर (२४ धावा), रेगिस चाकाब्वा (५४ धावा), रयान बर्ल (६ धावा) यांना त्याने बाद केले. तसेच ब्लेसिंग मुझरबानी आणि रिचर्ड न्गारावा यांना दोन आकडी धावसंख्याही करू न देता पव्हेलियनला धाडले. अशाप्रकारे बळींचा पंच घेत त्याने वनडे क्रिकेटमध्ये २७४ विकेट्सचा आकडा गाठला आहे. यासह तो बांगलादेशकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने २१३ वनडे सामन्यात हा पराक्रम केला आहे.
याबाबतीत त्याने बांगलादेशचा गोलंदाज मशरफे मुर्तजाला मागे टाकले आहे. यापुर्वी तो सर्वाधिक २६९ विकेट्ससह अव्वलस्थानी होता. परंतु आता तो दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. एवढेच नव्हे तर, शाकिबची वनडे सामन्यात ५ बळी घेण्याची ही तिसरी वेळ आहे. कौतुकास्पद बाब अशी की, तो केवळ वनडे नव्हे तर टी२० आणि कसोटीतही बांगलादेशकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.
दरम्यान झिम्बाब्वे विरुद्ध बांगालादेश यांच्यातील पहिल्या वनडेत बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक १०२ धावा केल्या. तसेच अफिफ हुसैननेही ४५ धावांचे बहुमुल्य योगदान दिले. झिम्बाब्वेकडून ल्यूक जॉन्ग्वेने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. बांगलादेशच्या २७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या रेगिस चाकाव्बाने सर्वाधिक ५४ धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांना ३० धावांचाही आकडा गाठता आला नाही. परिणामी १५५ धावांच्या फरकाने झिम्बाब्वेने पराभवासह वनडे मालिकेची सुरुवात केली.
महत्त्वाच्या बातम्या-