भारताला २ वेळा ऑलिंपिक पदके जिंकून देणारी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिची बॅडमिंटन विश्व महासंघा (BWF)च्या ऍथलिट कमिशन (BWF Athlete Commission) ची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २६ वर्षीय सिंधूला ५ इतर खेळाडूंसह सदस्य म्हणून निवडले गेले आहे. सदस्यपदी त्यांचा कार्यकाळ २०२५ पर्यंत असेल. सोमवारी (२० डिसेंबर) बॅडमिंटन विश्व महासंघाने यासंदर्भात घोषणा केली आहे.
बॅडमिंटन विश्व महासंघाने याबद्दलची घोषणा करताना म्हटले आहे की, “बॅडमिंटन विश्व महासंघाला ऍथलिट कमिशन २०२१-२०२५ साठीच्या ६ सदस्यांची घोषणा करताना आनंद होतो आहे. आयरिल वेंग (अमेरिका), रोहिन टेबलिंग (नेदरलँड), ग्रेसिया पोली (इंडोनेशिया), किम सोयोंग (कोरिया), पीव्ही सिंधू (भारत) आणि झेंग सी वेई (चीन) यांचा यामध्ये समावेश आहे.”
या ६ सदस्यांमधून आता एकाला अध्यक्ष (President Of BWF Athelete Commission) आणि उपाध्यक्ष म्हणून निवडले जाईल. बॅडमिंटन विश्व महासंघाने यासंबंधी बोलताना सांगितले आहे की, “नवीन आयोगाची लवकरच एक बैठक होईल आणि या ६ सदस्यांमधून एकाला अध्यक्ष आणि एकाला उपाध्यक्ष बनवले जाईल. बॅडमिंटन विश्व महासंघाच्या ऍथलिट आयोगाचा अध्यक्ष २०२५ मध्ये होणाऱ्या पुढील निवडणूकांर्यंत परिषदेचा सदस्य राहिल.”
रियो ऑलिंपिक २०१६ ची रौप्य पदक विजेती सिंधू हिने यावर्षीच टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकत इतिहास रचला होता. ती हे पदक जिंकत २ ऑलिंपिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ऍथलिट बनली होती. प्रतिष्ठित अशा विश्व चँपियनशिपमध्ये तिने २ रौप्य, २ कांस्य आणि २०१९ मध्ये सुवर्ण, अशी एकूण ५ पदके जिंकली आहेत.
मात्र २०२१ च्या विश्व चँपियनशीपच्या क्वार्टर फायनलमध्ये ताई जू यिंगने सिंधूला पराभूत केल्याने ती या स्पर्धेतून बाहेर झाली होती. सिंधूला ४२ मिनिटांपर्यंत चाललेल्या या सामन्यात १७-२१, १२-२१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. हा सिंधूचा ताई जू यिंगविरुद्धचा सलग ५ वा पराभव होता. दुर्देवाची बाब म्हणजे, सिंधूची कट्टर प्रतिद्वंद्वी असलेल्या या ताइवानच्या स्टार बॅडमिंटनपटूने टोकियो ऑलिंपिकच्या उपांत्य सामन्यातही सिंधूला पराभूत केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
“आम्हाला आयपीएल खेळायचेय”; चक्क विदेशी महिला क्रिकेटपटूंनी मांडले गाऱ्हाणे
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘या’ १० भारतीय फलंदाजांच्या नावावर आहेत सर्वाधिक कसोटी धावा
वडिल नाही बनू शकले क्रिकेटर, म्हणून उघडले किराणा दुकान; आता मुलाची थेट ‘टीम इंडिया’त निवड