भारत व इंग्लंड यांच्यादरम्यान पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेला रंग चढायला सुरुवात झाली आहे. आजी-माजी खेळाडू याविषयी चर्चा करत वातावरणनिर्मिती करत आहेत. भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनीदेखील भारतातर्फे मालिकेचे रणशिंग फुंकले. आगामी मालिकेत इंग्लंडचा कर्णधार जो रूट याच्यावर आपले लक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुढील महिन्यात सुरू होईल इंग्लंडचा भारत दौरा
सन २०२१ या वर्षातील भारतीय क्रिकेट संघाची मायदेशातील पहिली कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून इंग्लंड विरुद्ध चेन्नई येथे सुरू होईल. बंद दाराआड खेळवली जाणारी ही मालिका कमालीची अटीतटीची होऊ शकते. भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियात तर इंग्लंडने श्रीलंकेत कसोटी मालिका विजय साजरा केला आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट जगताचे लक्ष या ‘हाय वोल्टेज’ मालिकेकडे लागलेले दिसून येते. दोन्ही संघात दर्जेदार खेळाडू असल्याने जाणकार तसेच प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
भरत अरुण यांचे जो रूटला आव्हान
भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी आगामी मालिकेसाठी भारताकडून रणशिंग फुंकले आहे. चेन्नईस्थित एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अरुण यांनी म्हटले की, “आम्ही ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टीव स्मिथला जखडून ठेवण्यात यशस्वी ठरलो. आता आमचे पुढील लक्ष्य इंग्लंडचा कर्णधार जो रूट असेल. आम्ही आमच्या कामाला सुरुवात देखील केली आहे. ऑस्ट्रेलियातील यशस्वी मालिकेनंतर आता मायदेशात होणाऱ्या मालिकेकडे आम्ही पाहत आहोत.”
भारताच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या अरुण यांनी पुढे सांगितले की, “या मालिकेत शमी आणि जडेजा व्यतिरिक्त भारताचे अन्य प्रमुख गोलंदाज उपलब्ध असतील. मालिका अटीतटीची होईल. परंतु आमच्या खेळाडूंनी ज्याप्रकारे ऑस्ट्रेलियात खेळ दाखवला, त्याच प्रकारचा खेळ ते येथे दाखवतील.”
चांगल्या फॉर्ममध्ये आहे रूट
इंग्लंडचा कर्णधार असलेला जो रूट सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत त्याने चार डावात १०६.५० च्या सरासरीने ४२६ धावा ठोकल्या होत्या. यात एक द्विशतक तर एका १८६ धावांच्या खेळीचा समावेश होता. इंग्लंड संघ भारतात त्याच्याकडून अशाच खेळीच्या अपेक्षेत असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कागिसो रबाडाचे कसोटी विकेट्सचे ‘द्विशतक’, दिग्गजांच्या मांदियाळीत मिळवली टॉप-५ मध्ये जागा
“धोनीच्या ५ ते १० टक्के जरी खेळलो तरी विशेष आहे”, ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूची प्रतिक्रिया