वेस्ट इंडीज संघाचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा आज (२ मे) आपला ५२ वा वाढदिवस साजरा केला. त्याने १९९०मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
लाराने (Brian Lara) आपल्या कारकीर्दीत एकूण १३१ कसोटी आणि २९९ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ५२.८८ च्या सरासरीने एकूण ११९५३ धावा केल्या होत्या. त्यामध्ये ३४ शतके तर ४८ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच वनडेत त्याने ४०.४८ च्या सरासरीने १०४०५ धावा केल्या आहेत. लाराच्या चमकदार कामगिरीमुळे त्याला ऑस्ट्रेलियाचे सर डॉन ब्रॅडमन (Sir Don Bradman), भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबरोबरच (Sachin Tendulkar) जगातील इतर महान खेळाडूंमध्ये गणले जाते.
लारा आपल्या घरातील ११ मुलांमध्ये १० व्या क्रमांकाचे अपत्य होता. लाराचे वडील बंटी लारा (Bunty Lara) यांनी त्याला क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी प्रोत्साहन दिले. याबाबतीत अनेकवेळा सांगताना लारा म्हणाला की, त्याच्यातील प्रतिभा ओळखण्यात त्याच्या वडिलांचे मोठे योगदान आहे.
लाराचा २०१२मध्ये आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये (ICC Hall of Fame) समावेश झाला होता. यादरम्यान त्याला आपल्या वडिलांची आठवण आली होती. तो म्हणाला होता की, “तुम्ही ज्या व्यक्तीचा समावेश हॉल ऑफ फेममध्ये करत आहात, त्या व्यक्तीला त्याचे वडील बंटी यांनी घडवले आहे. त्यांनी हे ओळखले की, माझ्याकडे एक क्रिकेटपटू आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आहेत.”
लारा १९९०मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण करणार होता. परंतु काही दिवसांंपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे लाराला खूप वाईट वाटले होते की, त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याचे वडील नव्हते.
लाराने ऑस्ट्रेलिया (Australia) संघाविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्टने (Adam Gilchrist) २००३च्या एका सामन्याची आठवण सांगताना म्हटले होते की, “लाराने आम्हाला आव्हान देऊन चौकार-षटकारांचा पाऊस पाडला होता. त्या सामन्यात एका क्षेत्ररक्षकाला मिडविकेटवरून थेट पॉईंटवर उभे केले होते. यानंतर लाराने हळूच म्हटले होते की, ‘हे योग्य नाही.’ हे मी ऐकले होते. त्यावेळी लाराने मिडविकेटच्या दिशेने षटकार मारला होता.”
गिलख्रिस्ट पुढे म्हणाला की, “ऑफ-साईडमध्ये चौकार मारून दाखव. त्यावेळी लाराने सलग २ षटकार ठोकले होते.”
लाराच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये तसे अनेक विक्रम आहेत. लारा पदार्पणाच्या ४ वर्षांनंतर कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला होता. त्याने १९९४मध्ये इंग्लंडविरुद्ध (England) ३७५ धावांची खेळी केली होती. यापूर्वी लाराने आपले पहिले शतक १९९३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळताना केले होते.
विशेष म्हणजे लाराचे पहिले शतक हे द्विशतक होते. त्याने सिडनीच्या ऐतिहासिक मैदानावर २७७ धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. त्याने २००४मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद वैयक्तिक ४०० धावांची जबरदस्त खेळी केली होती. त्याच्या नावावर प्रथम श्रेणीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने इंग्लंडचा क्लब वॉर्विकशायरकडून खेळताना डरहमविरुद्ध सर्वाधिक नाबाद ५०१ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
चुकीला माफी नाही! दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील प्रमुख खेळाडूला मोठी शिक्षा, एका क्लिकवर घ्या जाणून
ऋतुराज अन् कॉनवेने रचली आयपीएलमधील सर्वात मोठी भागीदारी; सोबत ‘हे’ शानदार विक्रमही केले नावावर
मुंबईच्या विजयानंतरही रोहित आणि प्रशिक्षक जयवर्धने ट्रोल; कारण आहे ‘हा’ खेळाडू