भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात तेवढाच प्रभाव आहे. शिवाय भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावर क्रिकेटच्या इतिहास अनेक विक्रमांची नोंदही आहे. कदाचित याच कारणामुळे चाहते क्रिकेटशी आणि क्रिकेटपटूंशी खूप भावनिक रुपातून जुळलेले असतात. त्यांना भारताचा विजय झाला तर कमालीचा आनंद होतो. तर, एखादा महत्त्वाचा सामना भारताने गमावला तर ते तेवढेच चिडतातही.
आतापर्यंत असे बऱ्याचदा घडले आहे की, भारतीय संघाच्या पराभवामुळे फक्त संघाला चाहत्यांच्या टीकांचा सामना करावा लागला नाही. तर, एखाद्या खेळाडूच्या वाईट प्रदर्शनामुळे वैयक्तिकरित्या त्या खेळाडूलाही चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.
तर जाणून घेऊयात, अशा 3 भारतीय क्रिकेटपटूंच्या त्या खेळींविषयी, ज्यानंतर त्यांना चाहत्यांच्या टिकांचा सामना करावा लागला. 3 Indian players who were bashed by fans for their innings.
१. युवराज सिंग (२०१४ टी२० विश्वचषक अंतिम सामना) :
२०१४ला भारत आणि श्रीलंका संघात ढाका येथे टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळण्यात आला होता. त्यावेळी एका बाजूला विराट कोहलीने ५८ चेंडूत ७७ धावांची खेळी केली होती. तर, युवराज सिंगने २१ चेंडूत फक्त ११ धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीमुळे भारताने त्या सामन्यात २० षटकात ४ बाद १३० धावा केल्या होत्या.
श्रीलंकेने भारताच्या १३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १७.५ षटकात ४ बाद १३४ धावा करत सहज चषकावर आपले नाव कोरले होते. त्यामुळे अंतिम सामना झाल्यानंतर युवराजला चाहत्यांच्या टिकांचा सामना करावा लागला होता. एवढेच नव्हे तर, चाहत्यांनी चंदिगडमधील त्याच्या घरावर दगडफेकही केली होती.
२००७मधील टी२० विश्वचषक आणि २०११मधील वनडे विश्वचषक विजयात युवराजने महत्त्वाची भुमिका बजावली होती. शिवाय त्याने अनेकवेळा चांगली कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला आहे. तरी चाहते त्यावेळेला या सर्व गोष्टी विसरून गेले होते.
२. एमएस धोनी (२०१८ लॉर्डमधील वनडे सामना) :
२०१८साली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. यावेळी दोन्ही संघात ३ सामन्यांची वनडे मालिका झाली होती. या मालिकेतील लॉर्ड्स येथील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारताला ३२३ धावांचे आव्हान दिले होते. यावेळी भारताने २७व्या षटकापर्यंत १४० धावा केल्या होत्या आणि विराट कोहलीची चौथी विकेट गमावली होती.
त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आला होता. धोनीकडून कमी चेंडूत दमदार फटकेबाजीची अपेक्षा होती. पण त्याने ५९ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने फक्त ३७ धावा केल्या होत्या. शेवटी ४७व्या षटकात २१५ धावांवर धोनी बाद झाला आणि संघाने ५० षटकात फक्त २३६ धावा केल्या.
धोनीच्या त्या सामन्यातील हळूवार खेळीमुळे त्याची खूप टिका केली गेली. तो बाद होऊन मैदानावरून जात असतानाही सगळीकडे खूप जल्लोष साजरा केला जात होता. महत्त्वाचे म्हणजे धोनीने याच सामन्यात त्याच्या वनडेतील १०००० धावा पूर्ण केल्या होत्या.
३. विराट कोहली (२०१५ विश्वचषक उपांत्यफेरी) :
२०१५ला सिडनी येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषकातील उपांत्य फेरी सामना झाला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारताला ३२९ धावांचे आव्हान दिले होते. यात स्टिव्ह स्मिथच्या १०५ धावांचा समावेश होता. भारताने ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली होती. संघाच्या ७६ धावांवर शिखर धवनची पहिली विकेट गेली होती.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीकडून सर्वांच्या खूप अपेक्षा होत्या. पण तो १३ चेंडूत फक्त एक धाव करत बाद झाला होता. अखेर ४७व्या षटकात भारतीय संघ २३३ धावा करत सर्वबाद झाला होता. भारताच्या या पराभवासाठी त्यावेळी विराटला जबाबदार समजले जात होते.
ट्रेंडिंग लेख-
क्रिकेटची खेळपट्टी ते राजकारणाचा फड गाजवलेल्या खेळाडूंची ड्रीम ११
२००१ ते २०१० या काळात सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू, सचिन आहे चक्क ५व्या स्थानावर
अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती