मुंबई – भारताचा यशस्वी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक विक्रम केले आहेत. मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय क्रिकेटची प्रतिमा खूप मलीन होत होती तेव्हा सौरव गांगुलीने नेतृत्वाची धुरा सांभाळून एक मजबूत संघ उभा केला.
सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००३ साली झालेल्या विश्वचषकात संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा कसोटीमधील सलग सोळा कसोटी सामने जिंकण्याचा विजयीरथ सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने रोखला होता. भारतीय संघाला अनेक यश मिळवून देणारा हा खेळाडू क्रिकेटमध्ये अपघाताने आला.
सौरव गांगुली यांचे फुटबॉलवर नितांत प्रेम होते. इयत्ता नववीच्या वर्गापर्यंत ते फुटबॉल चांगले खेळायचे. एक फुटबॉलपटू ते क्रिकेटपटू हा प्रवास कसा सुरू झाला? याविषयी बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली म्हणाले की, मी फुटबॉलमध्ये करिअर करण्याचे ठरवले होते, पण माझ्या वडिलांनी जाणून बुजून मला क्रिकेटचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी कधीच पाठीमागे वळून पाहिले नाही.
फुटबॉल हे माझ्यासाठी जीवन होते. मी चांगले फुटबॉल खेळत होतो पण अचानक एके दिवशी उन्हाळय़ाच्या सुट्टीत माझ्या वडिलांनी मला क्रिकेट अकॅडमीत पाठवले. माझे वडील खूप कडक स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांना मी नाही म्हणू शकलो नाही. तेथील क्रिकेट प्रशिक्षकांनी माझ्या वडिलांना काय भरवले देव जाणे. माझ्या वडिलांनी मला फुटबॉलपासून दूर केले आणि क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यास सांगितले.
पुढे दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात मी शतक ठोकलो. बंगालकडून रणजीच्या अंतिम सामन्यातही पदार्पण केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लॉडर्सच्या मैदानावर पदार्पपणाच्या पहिल्या सामन्यात ऐतिहासिक शतक ठोकणे हे माझ्यासाठी जणू एक स्वप्नच होते.
सौरव गांगुली यांनी भारताकडून ११३ कसोटी आणि ३११ एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केले. १९९६ साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या सौरव गांगुलीने कसोटी क्रिकेटमध्ये ७ हजार २१२ धावा केल्या. ज्यात १६ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे.
गांगुली यांनी कसोटी क्रिकेट पूर्वी १९९२ साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३११ सामन्यात ११ हजार ३६३ धावा केल्या. यात त्याने २२ शतके आणि ७२ अर्धशतके ठोकली. सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखाली वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, झहीर खान आणि युवराज सिंग सारख्या दिग्गज खेळाडूंचा उदय झाला. अखेर २००८ साली त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.