मंगळवारी (२२ सप्टेंबर) यूएईतील शारजाह येथे पार पडलेल्या आयपीएल २०२०च्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघावर १६ धावांनी विजय मिळविला. यानंतर राजस्थान संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथला भलताच आनंद झाला आहे. विजयानंतर त्याने आपल्या विजयाचे श्रेय हे संजू सॅमसनला देत त्याची जोरदार प्रशंसा केली आहे.
संजू सॅमसनने केली चमकदार कामगिरी
सॅमसनने काल(२२ सप्टेंबर) झालेल्या सामन्यात ३२ चेंडूत ७४ धावांची ताबडतोब अर्धशतकी खेळी केली. यामध्ये १ चौकार आणि तब्बल ९ षटकारांचा समावेश होता. त्याच्यासह ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जोफ्रा आर्चरनेही ८ चेंडूत २७ धावांची तुफानी खेळी केली. त्याने शेवटच्या षटकात सलग ४ षटकार मारले होते. त्यांच्या या खेळीमुळेच राजस्थान संघाला चेन्नईसारख्या बलाढ्य संघाला पराभूत करण्यात यश आले.
विजयानंतर बोलताना कर्णधार स्मिथ म्हणाला, “मला वाटते की जोफ्रा आर्चरने शेवटच्या षटकात जे काही षटकार ठोकले होते, ते अविश्वसनीय होते. त्याच्या खेळीमुळे आमच्या धावसंख्येत भर पाडली.”
“संजू सॅमसननेही खूप शानदार खेळी केली. तो जो चेंडू मारायचा तो थेट षटकारासाठी जात होता. त्याला खेळताना पाहण्याचा मी जोरदार आनंद लुटला,” असे सॅमसनच्या खेळीबद्दल बोलताना स्मिथ म्हणाला.
“फाफ डु प्लेसिस आणि धोनीने शेवटच्या काही षटकात काही चांगले फटकार लावले. परंतु विजय आम्ही मिळविला. ही आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे,” असेही धोनी आणि डु प्लेसिसबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला.
जॉस बटलरसारख्या खेळाडूला सलामीला खेळण्यापासून दूर ठेवणे कठीण
स्मिथने पुढे संकेत दिले की, “पुढील सामन्यांमध्ये जॉस बटलर संघासाठी सलामीला फलंदाजी करेल. तो आजच्या सामन्यात खेळत नव्हता.”
“बटलर एक गुणवत्तापूर्ण खेळाडू आहे. आम्ही पाहू की तो जेव्हा परत येईल, तेव्हा काय होते. त्याच्यासारख्या खेळाडूला सलामीला फलंदाजी करण्यापासून दूर ठेवणे कठीण आहे,” असेही बटलरबद्दल बोलताना सॅमसन पुढे म्हणाला.
आम्ही स्पर्धेत येत्या सामन्यांमध्येही चांगली कामगिरी करण्याचा विचार करत आहोत
“गोलंदाजांसाठी फुल लेंथचा चेंडू टाकून वाचणे खूप कठीण होते. त्यामुळे चेंडूची लेंथ मागे घेणे हे महत्त्वाचे होते. फिरकीपटू आपल्या लेंथने खूप चांगली गोलंदाजी करत होते. विशेषत: श्रेयस गोपाळ. तो नेहमीच चांगली गोलंदाजी करतो. आम्ही स्पर्धेत येत्या सामन्यातही चांगली कामगिरी करण्याचा विचार करत आहोत. त्यासाठी खेळाडूही तयार आहेत,” असे आपल्या गोलंदाजांबद्दल बोलताना स्मिथ म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘या’ गोष्टीमुळे गमवावा लागला सामना, राजस्थान विरुद्धच्या पराभवानंतर धोनीची प्रतिक्रिया
-पुन्हा एकदा राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनीने घातला पंचाशी वाद, ‘हे’ आहे कारण
-तू वरच्या क्रमांकावर फलंदाजीला का येत नाही? धोनीने दिले ‘हे’ उत्तर
ट्रेंडिंग लेख-
-दे घुमा के! भारतीय फलंदाज गाजवतायेत आयपीएलचा १३ वा हंगाम
-केवळ चार आयपीएल सामन्यातच झाले ३ मोठे खेळाडू जखमी
-वाढदिवस विशेष- माहित नसलेला अंबाती रायडू