दक्षिण आफ्रिका विरुद्ध आयर्लंड यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ४२ धावांनी विजय मिळवत या मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिका संघातील डाव्या हाताचा फलंदाज डेविड मिलर याने खास विक्रम आपल्या नावावर करत दिग्गज क्रिकेटपटूला मागे टाकले आहे.
दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात सलामीवीर फलंदाज साजेशी सुरुवात करून देण्यास अपयशी ठरले होते. परंतु शेवटी डेविड मिलर नावाचे वादळ आले होते, ज्याने आयर्लंड संघाच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडले. संघातील इतर फलंदाज मोठी खेळी खेळण्यास अपयशी ठरले असताना डेविड मिलरने एकहाती झुंज देत ४४ चेंडूंमध्ये नाबाद ७५ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने ४ चौकार आणि ५ षटकार लगावले. या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाला २० षटकअखेर ७ बाद १५९ धावा करण्यात यश आले होते.
विश्वविक्रमाला घातली गवसणी
डेविड मिलरने आपल्या तुफानी खेळीदरम्यान एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मिलरने या डावातील २० व्या षटकात तब्बल ४ षटकार लगावले. या षटकारांच्या जोरावर तो टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० व्या षटकात सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला आहे. मिलरने २० व्या षटकात आतापर्यंत एकूण १५ षटकार लगावले आहेत, जो एक विश्वविक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम एमएस धोनीच्या नावावर होता. धोनीने २० व्या षटकात १२ षटकार लगावले होते. तसेच एल्टन चिगुंबुराच्या नावावर देखील १२ षटकार लगावण्याचा विक्रम आहे.
तर अँजेलो मॅथ्यूज आणि डॅरेन सॅमी या दोघांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटच्या षटकात ११-११ षटकार लगावले होते. तसेच डेविड मिलरने तिसऱ्यांदा टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील २० व्या षटकात २४ पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.(David Miller claims the top spot in hitting most sixes in last over of T20 international Cricket)
दक्षिण आफ्रिका संघाचा ४२ धावांनी विजय
दक्षिण आफ्रिका संघाने दिलेल्या १६० धावांचा पाठलाग करत असताना आयर्लंड संघाकडून शेन गेटकटेने सर्वाधिक २४ धावांची खेळी केली; तर, डॉकरेलने २० धावांचे योगदान दिले. परंतु कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. परिणामी हा सामना आयर्लंड संघाला ४२ धावांनी गमवावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटसेनेला दुखापतींनी घेरले, बीसीसीआय नवख्या खेळाडूंना करणार इंग्लंडला रवाना?
कोणाची फलंदाजी तर कोणाची गोलंदाजीत कमाल! सराव सामना अनिर्णीत राहूनही भारताला ‘असा’ झाला फायदा
भुवीने हार्दिकच्या फिटनेसबाबत दिली महत्त्वाची माहिती, तिसऱ्या वनडेत खेळणार की नाही केले स्पष्ट