बुधवारी(७ जुलै) भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने त्याचा ४० वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या या वाढदिवसानिमित्त त्याला जगभरातील चाहत्यांसह अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनीही खास शुभेच्छा दिल्या. दरम्यान, धोनी आपला ४० वा वाढदिवस साजरा करत असतानाच भारताचा युवा फलंदाज देवदत्त पडीक्कलनेही बुधवारी आपला २१ वा वाढदिवस साजरा केला.
पडीक्कलने दिल्या धोनीला शुभेच्छा
पडीक्कल सध्या मर्यादीत षटकांच्या भारतीय संघासह श्रीलंका दौऱ्यावर आहे. याचदरम्यान संपूर्ण भारतीय संघासह त्याने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. पण, केक कापण्यापूर्वी त्याने धोनीला संपूर्ण भारतीय संघाकडून खास शुभेच्छा दिल्या. याचा क्षणांचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की पडीक्कल जेव्हा केक कापण्यासाठी आला तेव्हा, त्याने भारतीय संघातील जल्लोष करणाऱ्या खेळाडूंना थोडावेळ शांत राहा सांगितले. तसेच त्यानंतर तो म्हणाला, ‘मी हा केक कापण्यापूर्वी भारतीय संघातर्फे माही भाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. प्रेरणा देत राहा. त्यांच्याबरोबर माझा वाढदिवस असणे, ही खूप मस्त भावना आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा माही भाई.’
2⃣ Birthdays 🎂 🎂
1⃣ Celebration 🥳
1⃣ Heartfelt message from @devdpd07 to @msdhoni 🤗 #TeamIndia pic.twitter.com/h0epKPj3Yq— BCCI (@BCCI) July 7, 2021
धोनीने गेल्यावर्षी घेतली निवृत्ती
धोनीने गेल्यावर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तो २०१९ विश्वचषकातील उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा सामना खेळला. त्यामुळे धोनीने २०२० नंतर आपला वाढदिवस भारतीय संघासह साजरा केलेला नाही.
देवदत्त पडीक्कलला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी
सध्या भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने श्रीलंका दौऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंना भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघात संधी दिली आहे. यात पडीक्कलचाही समावेश आहे. त्यामुळे आता पडीक्कलकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी आहे. या श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे.
पडीक्कल सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने आयपीएल २०२१ स्थगित होण्यापूर्वी या हंगामात एका शतकासह ६ सामन्यात १९५ धावा केल्या. तसेच त्याने यावर्षीच्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही उत्तम कामगिरी करताना ७ सामन्यात १४७.४० च्या सरासरीने ७३७ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ४ शतकांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तुझ्याकडे एकच स्वेटशर्ट आहे का?’ जडेजाने ‘त्या’ फोटोमुळे केले शार्दुल ठाकूरला ट्रोल
विराट कोहलीने आपला पहिला आंतरराष्ट्रीय कर्णधार धोनीला ‘अशा’ दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा