पुणे। जिल्हा संघाने केडन्स संघाला तर २२ यार्ड्स संघाने पीवायसी संघाला पराभूत करताना इकोल स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरी १९ फेब्रुवारी रोजी देक्कम जिमखाना मैदानावर रंगणार आहे.
येवलेवाडी मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये जिल्हा संघाने केडन्सला ७ गडी राखून पराभूत केले. सलामीवीर अर्शीन कुलकर्णीच्या दमदार खेळीच्या जोरावर केडन्स संघाने ४६.२ षटकांत सर्वबाद २१२ धावा केल्या. अर्शीन कुलकर्णी यांने ११३ चेंडूत १० चौकारांच्या सहाय्याने ९४ धावांची खेळी केली. दिग्विजय पाटीलने ३७ (५ चौकार) आर्य जाधवने १७ (२ चौकार) तर अनिरुद्ध साबळेने १५(३ चौकार) धावा केल्या. ऋषिकेश काटाकडे व किरण चोरमारे यांनी प्रत्येकी ३, तर ओंकार पटकल, अभिषेक निषाद व शिवराज शेळके यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
जिल्हा संघाने कर्णधार अभिषेक पवारच्या दमदार शतकाच्या जोरावर केवळ ३१.४ षटकांत ३ बाद २१५ धावा करताना विजय साकारला. अडखळत सुरुवात झालेल्या जिल्हा संघाचा डाव अभिषेक पवार व अभिनंदन गायकवाड यांनी सावरला. अभिषेक पवार याने ९८ चेंडूत १५ चौकार व ७ षटकारांच्या जोरावर १३० धावांची खेळी केली. त्याला अभिनंदन गायकवाडने ८१ चेंडूत ७ चौकारांच्या साह्याने ५८ धावा करताना सुरेख साथ दिली. रझाक फल्लाहने २ तर सोहम सरवदेने एक गडी बाद केला. शतकवीर अभिषेक पवार याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पीवायसी मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीमध्ये २२ यार्ड्स संघाने पीवायसी संघाला ४९ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना २२ यार्ड संघाने निर्धारित ५० षटकांत ७ बाद २३५ धावसंख्या उभारली. कर्णधार यशराज खाडे यांने दमदार फलंदाजी करताना ९ चौकारांच्या सहाय्याने ७२ धावांची खेळी केली. त्याला मल्हार शेंबाडकरने ३३ (१ चौकार), श्रेयस केळकरने ३३ (५ चौकार), अथर्व शिंदेने नाबाद २९ (४ चौकार), नितीश कुकरेजाने २६ (६ चौकार) धावा केल्या. अजिंक्य तुळपुळेने भेदक गोलंदाजी करताना ४, वरून चौधरी व यश खळदकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
पीवायसी संघाला ४५.२ षटकांत सर्वबाद १८६ धावाच करता आल्या. यश खळदकरने ३४ (५ चौकार) व वरून चौधरीने नाबाद ३३ (२ चौकार) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. साईराज चोरगे २२ (४ चौकार), सोहम शिंदेने १९ (३ चौकार), रिषभ रानडेने १७ (१ चौकार, १ षटकार), यतींद्र कार्लेकरने १५ (३ चौकार) धावा केल्या. गौरव कुमारने ४ गडी बाद करताना संघाचा विजय सोपा केला. अथर्व शिंदे, हर्षवर्धन पाटील, शुभम काटरे, रोहन वाघासरे, रितेश तिडके व श्रेयस केळकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. ४ बळी मिळविणाऱ्या गौरव कुमारला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
आझम महिला टी२० क्रिकेट : जनादेश – एच पी रॉयल्स संघाची विजेतेपदासाठी लढत
नाट्यमय सामन्यात जमशेदपूरचा विजय; गतविजेत्या मुंबई सिटीची पुढील वाटचाल बिकट!
पटनाला पराभूत करत दबंग दिल्ली प्ले-ऑफ्समध्ये!