इंग्लंड विरुद्ध भारत संघात सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तीन सामने पूर्ण झाले असून आता चौथा सामना ओव्हल मैदानावर २ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने १५ जणांच्या संघाची घोषणा केली आहे.
वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स संघात परतला आहे. तसेच सॅम बिलिंग्सलाही संधी देण्यात आली आहे. इंग्लंडने संघात हे दोन बदल केले आहेत. साकिब महमूदच्या जागी ख्रिस वोक्स आणि जोस बटलरच्या जागी सॅम बिलिंग्ज यांची निवड झाली आहे. बटलरने उर्वरित दोन्ही कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे.
जोस बटलर दुसऱ्यांदा बाप होणार आहे. त्याने पालकत्व रजा घेतल्यामुळे तो पुढील कसोटी सामने खेळणार नाही. त्यामुळे चौथ्या कसोटीसाठी सॅम बिलिंग्जला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून 15 जणांच्या संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज वोक्स 12 महिन्यांपासून कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. याचे कारण इंग्लंडने सुरू केलेली रोटेशन पॉलिसी आणि त्याला टाचेला झालेली दुखापत, या दोन कारणांमुळे तो कसोटी क्रिकेटपासून दूर होता. पण आता तो संघात परतला आहे.
इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड म्हणाले, ‘ख्रिस वोक्स कसोटी संघात परतला आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. त्याने गेल्या आठवड्यात टी20 स्पर्धेत चमकदार गोलंदाजी केली होती.’
दरम्यान, लीड्स कसोटीत इंग्लंडने भारताचा एक डाव आणि 76 धावांनी पराभव करत मालिका बरोबरीत आणली. या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ 78 धावांवर बाद झाला होता. तर दुसऱ्या डावात रोहित शर्माने 59 धावा, पुजाराने 91 धावा केल्या, तर कर्णधार विराट कोहलीने 55 धावा केल्या. चौथ्या दिवशी पुजारा आणि कोहली बाद झाले आणि त्यानंतर संपुर्ण भारतीय फलंदाजी अक्षरशः कोलमडली आणि भारतीय संघाला निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले.
तत्पूर्वी भारताने लॉर्ड्स कसोटीत विजय मिळवला होता. तर नॉटिंघम कसोटी अनिर्णित राहिली आहे. त्यामुळे सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने उर्वरित दोन्ही सामन्यांच्या निकालावर मालिकेचा विजेता ठरणार आहे.
इंग्लंडचा संघ – जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, रोरी बर्न्स, सॅम बिलिंग्स, सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, डेव्हिड मलान, क्रेग ओव्हरटन, ओली पोप, ओली रॉबिन्सन, मार्क वुड, ख्रिस वोक्स.
महत्त्वाच्या बातम्या –
इतिहास घडला! भारताच्या अवनी लेखराने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये जिंकले ‘सुवर्णपदक’
‘हा’ खेळाडू भारतीय संघासाठी अडचण, माजी इंग्लिश कर्णधाराने संघाबाहेर करण्याचा दिला सल्ला