गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शनिवारी एफसी गोवा संघाने ओदिशा एफसीवर 1-0 अशी मात करीत आगेकूच केली. पूर्वार्धाच्या भरपाई वेळेत आघाडी फळीतील स्पेनचा 36 वर्षीय खेळाडू इगोर अँग्युलो याने केलेला गोल निर्णायक ठरला.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झालेल्या या लढतीमधील विजयासह गोव्याने गुणतक्त्यात चौथे स्थान गाठले. गोव्याने तीन क्रमांक प्रगती केली. त्यांचे आठ गुण झाले. पाच सामन्यांत दोन विजय, दोन बरोबरी व एक पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. मुंबई सिटी (5 सामन्यांतून 12) आघाडीवर आहे. एटीके मोहन बागान (5 सामन्यांतून 10) दुसऱ्या, तर नॉर्थईस्ट युनायटेड एफसी (5 सामन्यांतून 9) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ओदिशाची पहिल्या विजयाची प्रतिक्षा लांबली. 5 सामन्यांत त्यांना चौथी हार पत्करावी लागली. एका बरोबरीच्या एकमेव गुणासह त्यांचे 11 संघांमधील शेवटून दुसरे म्हणजे दहावे स्थान कायम राहिले. गोलरक्षक अर्शदीप सिंग याच्या चपळाईमुळे गोव्याच्या काही अप्रतिम चाली हुकल्या. अन्यथा ओदिशाला आणखी मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले असते.
पूर्वार्धाच्या भरपाई वेळेत गोव्याने खाते उघडले. मध्य फळीतील अलेक्झांडर जेसुराज याने डाव्या बाजूने ही चाल रचली. त्याने नेटच्या समोरील भागात मारलेल्या चेंडूवर अँग्युलोने पहिल्या प्रयत्नात नियंत्रण मिळवले. त्यावेळी त्याने ओदिशाचा बचावपटू जेकब ट्रॅट याला धुर्तपणे हुलकावणी दिली. मग त्याने कौशल्याने चेंडू नेटमध्ये मारताना प्रतिस्पर्धी गोलरक्षक अर्शदीप सिंगला कोणतीही संधी दिली नाही.
34व्या मिनिटाला ओदिशाने उल्लेखनीय प्रयत्न केला. आघाडी फळीतील मॅन्युएल ओन्वूने सहकारी स्ट्रायकर दिएगो मॉरीसिओला पास दिला. मॉरीसिओने गोलक्षेत्रात प्रवेश करताच गोव्याचा बचावपटू सेरीटॉन फर्नांडिस याने धोका ओळखला. त्याने मॉरीसिओवर दडपण आणले. टाचेच्या मागील भागाचा वापर करून मॉरीसिओने प्रयत्न केला. त्यावेळी त्याला जेरी माहमिंगथांग यानेही साथ दिली, पण सेरीटॉनने चेंडू धोकादायक क्षेत्रातून बाहेर घालवला. 36व्या मिनिटाला गोव्याचा मध्यरक्षक जोर्गे मेंडोझाने डावीकडून आगेकूच केली, पण ओदिशाच्या बचाव फळीतील स्टिव्हन टेलरने त्याचा पास ब्लॉक केला. मग सहकारी बतचावपटू शुभम सारंगीने चेंडूवर ताबा मिळवत गोव्याची चाल अपयशी ठरवली. 38व्या मिनिटाला गोव्याच्या मेंडोझाला चकवून ओदिशाचा मध्यरक्षक कोल अलेक्झांडर याने उजव्या बाजूला चेंडूवर ताबा मिळवला. मात्र लेनी रॉड्रीग्जला तो चकवू शकला नाही. 42व्या मिनिटाला ब्रँडन फर्नांडिसने उजवीकडून आगेकूच केली. सुरवातीला ओदिशाने बचाव केल्यानंतर लेनीला संधी मिळाली, पण अखेरीस त्याच्या स्वैर फटक्यामुळे चाल वाया गेली.
दुसऱ्या सत्राच्या प्रारंभीच गोव्याने धडाका लावला. मेंडोझाने ब्रँडनच्या साथीत उजवीकडून आगेकूच केली. मेंडोझाने मारलेला चेंडू ओदिशाच्या जेकब ट्रॅटने हेडिंगद्वारे अडवला. त्यानंतर 50व्या मिनिटाला सेरीटॉन याला मेंडोझाकडून पास मिळाला. स्टीव्हन टेलरने झेपावत चेंडू थोपवला, जो अर्शदीपने अडवला.
64व्या मिनिटाला अँग्युलोने दमदार फटका मारला, पण अर्शदीपने चेंडू थोपवला. ओदिशाचा बचावपटू हेंड्री अँथनी याने चेंडू धोकादायक क्षेत्रातून बाहेर घालवण्याचा प्रयत्न केला, पण गोव्याच्या रिबेलोला संधी मिळाली. त्याने मेंडोझाकडे पास दिला. मेंडोझाने मारलेला फटका अर्शदीपने उजवीकडे झेपावत अडवला. 70व्या मिनिटाला मध्य फळीतील बदली खेळाडू प्रीन्सटन रिबेलो याने अँग्युलोला पास दिला. अँग्युलोने घोडदौड केली. त्यावेळी ओदिशाचा बचावपटू गौरव बोरा त्याला रोखू शकला नाही. अँग्युलोने नेटच्या दिशेने फटका मारला, पण त्यात अचूकता नव्हती.
संबधित बातम्या:
– आयएसएल २०२०: जमशेदपूरला रोखत ईस्ट बंगालने उघडले खाते
– आयएसएल २०२०: मुंबई सिटीची चेन्नईयनविरुद्ध पिछाडीवरून बाजी
– आयएसएल २०२०: बंगळुरू- नॉर्थईस्ट सामना बरोबरीत; युनायटेड एफसीने गाठला पॉईंट टेबलमध्ये दुसरा क्रमांक