फिफा विश्वचषक 2026 क्वालिफायर सामन्यात भारताला अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. गुवाहाटी येथे मंगळवारी, 26 मार्चला झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं भारताचा 2-1 असा पराभव केला.
टीम इंडियाच्या पराभवानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. घरच्या मैदानावर भारताचा पराभव झाल्यानं चाहते निराश आहेत. विशेष बाब म्हणजे, भारतीय कर्णधार सुनील छेत्रीचा हा 150 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यानं या खास सामन्यात एक गोलही केला. मात्र असं असतानाही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे टीम इंडियाच्या फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील तिसरी फेरी गाठण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.
भारतानं सामन्याची सुरुवात शानदार शैलीत केली. आपला 150 वा सामना खेळत असलेल्या छेत्रीनं 38व्या मिनिटाला पेनल्टी किकवर टीम इंडियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाची आघाडी पूर्वार्धापर्यंत कायम राहिली. मात्र, उत्तरार्धात भारताच्या पदरी निराशा पडली. 70व्या मिनिटाला रहमत अकबरीचा फटका भारतीय बचावपटूला चुकवत गोलरक्षक गुरमीत सिंगला बायपास करत गोलपोस्टमध्ये घुसला. अफगाणिस्ताननं 1-1 अशी बरोबरी साधली. यानंतर 88व्या मिनिटाला अफगाणिस्तानला पेनल्टी मिळाली, ज्यावर शरीफ मोहम्मदनं गोल करत आपल्या संघाला 2-1 असा विजय मिळवून दिला.
घरच्या मैदानावरील पराभवामुळे टीम इंडिया तीन गुणांपासून वंचित राहिली. विश्वचषकाच्या दुसऱ्या पात्रता फेरीत भारताचे आता चार सामन्यांनंतर चार गुण झाले आहेत. भारतीय संघाच्या गटात आणखी चार संघ आहेत. या गटात कतार तीन सामन्यांत नऊ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानचे तीन सामन्यांतून चार गुण आहेत.
भारताला आता आणखी दोन सामने खेळायचे आहेत. यामध्ये घरच्या मैदानावर आशियाई चॅम्पियन कतारविरुद्धचा आणि 6 जूनला कुवेतविरुद्धच्या सामन्याचा समावेश आहे. मात्र, या पराभवामुळे भारताची गुणतालिकेत अफगाणिस्तानपेक्षाही खाली घसरण झाली आहे. पात्रतेची तिसरी फेरी गाठण्यासाठी भारताला उरलेले दोन्ही सामने जिंकावे लागतील. टीम इंडिया आजपर्यंत कधीही फिफा क्वालिफायरच्या तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचू शकलेली नाही.
सुनील छेत्रीनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 94 वा गोल केला, पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. त्यानं सात सामन्यांनंतर गोल केला. यासह त्याच्या नावावर एक अनोखा विक्रमही जमा झाला आहे. छेत्रीनं आपल्या 25व्या, 50व्या, 75व्या, 100व्या 125व्या आणि 150व्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये किमान एक गोल केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 क्रिकेटमध्ये हे दुर्मिळच! गुजरातविरुद्ध ऋतुराज-रहाणेचा अनोखा कारनामा
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! भारतातच होणार आयपीएलचे सर्व सामने, धोनीच्या ‘होम ग्राउंड’वर अंतिम सामना