इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुक याने कारकिर्दीच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय पादळीवर चमकदार कामगिरी केली. हेच पाहून सनरायझर्स हैदराबादने तब्बल 13.25 कोटी रुपये खर्च करून त्याला आपल्या संघात सामील केले. मात्र, आयपीएल हंगाम सुरू झाल्यापासून अद्याप बूक अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. गुरुवारी (4 मे) कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध ब्रुक पुन्हा एकदा अपयशी ठरला.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आमना सामना झाला. उभय संघांतील या सामन्यात नाणेफेक केकेआरने जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारित 20 षटकांमध्ये केकेआरने 9 विकेट्सच्या नुकसानावर 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादची धावसंख्या 54असताना संघाला हॅरी ब्रुक (Harry Brook) याच्या रूपात चौथी विकेट गमवावी लागली. ब्रुकने चार चेंडू खेळून एकही धाव केली नाही. सलग दुसऱ्या सामन्यात त्याने शून्यावर विकेट गमावली.
चालू आयपीएल हंगामात ब्रुकने आतापर्यंतच्या 9 सामन्यांपैकी 8 सामन्यांमध्ये तो 20 पेक्षा कमी धावा करून बाद झाला आहे. पाच सामन्यांमध्ये त्याने एक आकडी धावसंख्येवर समाधान मानले, तर दोन सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला. केवळ एका सामन्यात ब्रुकने नाबाद 100 धावा केल्या आहेत. ही 100 धावांची खेळी ब्रुकने 14 एप्रिल रोजी केकेआरविरुद्ध केली होती. पण गुरुवारी केकेआरविरुद्ध हंगामातील दुसरा सामना खेळताना त्याने शून्यावर विकेट गमावली.
आयपीएल 2023 मध्ये हॅरी ब्रुकचे प्रदर्शन
13, 3, 13, 100*, 9, 18, 7, 0, 0
दरम्यान, आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी ब्रुकने अक्षरशः धावांचा पाऊस पाडला होता. त्याने मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून इंग्लंडसाठी कसोटी पदार्पण केले. आतापर्यंत त्याने खेललेल्या 6 कसोटी सामन्यांमध्ये 10 वेळा फलंदाजी केली आणि 809 धावा केल्या आहेत. या धावा त्याने 98.77च्या स्ट्राईक रेटने आणि 80.90च्या सरासरीने केल्या आहेत. कसोटीत जबरदस्त प्रदर्शन करणारा ब्रुक आयपीएलमध्ये मात्र पूर्णपणे फसल्याचेच दिसत आहे. येत्या सामन्यांमध्ये त्याच्या प्रदर्शनावर चाहते आणि जाणकारांची नजर असेल. (Harry Brook’s Disappointing Stats in IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गीता फोगाट आणि पती पवनला दिल्ली पोलिसांकडून अटक, जंतर-मंतरवर आंदोलन सुरूच
अविश्वसनीय! मार्करमने टिपला ‘कॅच ऑफ द सिझन’, व्हिडिओ पाहून व्हाल अवाक्