बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय संघाच्या नावे एक नकोसा विक्रम नोंदला गेला. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरू येथे खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संपूर्ण भारतीय संघ 46 धावांवर ऑलआऊट झाला. भारतानं अवघ्या 34 धावांत सात गडी गमावले होते, ज्यामध्ये पाच फलंदाज खातं न उघडता बाद झाले.
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय भूमीवर टीम इंडियाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. भारतीय संघाकडून सर्वोत्कृष्ट स्कोअरर ठरला रिषभ पंत. त्यानं 20 धावांची खेळी केली. याशिवाय यशस्वी जयस्वालनं 13 धावा केल्या. या दोघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.
1987 मध्ये दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघ 75 धावांत ऑलआऊट झाला होता. याआधी भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमधील एका डावातील भारताची ही सर्वात कमी धावसंख्या होती. 2008 मध्ये अहमदाबाद कसोटीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांवर ऑलआऊट झाला होता. ही भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची दुसरी सर्वात कमी धावसंख्या होती.
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाची सर्वात कमी धावसंख्या 36 धावा आहे. 2020 मध्ये भारतीय संघ ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 36 धावांवर ऑलआऊट झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये भारताची दुसरी सर्वात कमी धावसंख्या 42 धावा आहे, जी 1974 मध्ये बनली होती. तेव्हा इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत भारत 42 धावांत ऑलआऊट झाला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. 1955 मध्ये ऑकलंडमध्ये न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध 26 धावांत ऑलआऊट झाला होता. यानंतर सलग 4 स्थानी दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिका 1896 मध्ये इंग्लंडविरुद्ध 30 धावांत ऑलआऊट झाली होती. ते 1924 मध्ये इंग्लंडविरुद्ध 30 धावांत ऑलआऊट झाले होते. तर संघ 1899 मध्ये इंग्लंडविरुद्ध 35 धावांत सर्वबाद झाला होता. 1932 मध्ये दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध 36 धावांत ऑलआऊट झाली होती. ऑस्ट्रेलिया आणि भारत प्रत्येकी एकदा 36 धावांवर आऊट झाले आहेत. 1902 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहॅम कसोटीत ऑस्ट्रेलियाचा संघ 36 धावांत ऑलआऊट झाला होता.
आशियाई खेळपट्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही संघानं एका डावात केलेली ही सर्वात कमी धावसंख्या आहे. भारतानं या बाबतीत वेस्ट इंडिजला मागे टाकलं. 1986 मध्ये पाकिस्तानविरुद्ध वेस्ट इंडिजचा संघाचा 53 धावांत खुर्दा झाला होता. तर पाकिस्तान 2002 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 53 आणि 59 धावांत ऑलआऊट झाला होता.
हेही वाचा –
बंगळुरूमध्ये किवी गोलंदाजांची ‘दहशत’, टीम इंडिया पन्नाशीच्या आत गडगडली; 5 फलंदाज शून्यावर बाद
आयपीएल मेगा ऑक्शनची तारीख आली! कधी आणि कुठे होणार लिलाव? जाणून घ्या
कोहली शून्यावर बाद होऊनही रेकॉर्ड बनवतो, या बाबतीत महेंद्रसिंह धोनीला टाकलं मागे