भारतीय क्रिकेट इतिहासातील यशस्वी कर्णधारांच्या यादीत एमएस धोनीचा समावेश होतो. त्याने त्याच्या नेतृत्त्व कौशल्याने सर्वांनाच प्रभावित केले आहे. अनेक युवा खेळाडूंसाठी तो प्रेरणास्रोत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे भारतीय संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यातच भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलने एमएस धोनीचे तोंडभरून कौतुक केले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (27 नोव्हेंबर) सिडनी येथे खेळला जाईल. या सामन्याआधी बुधवारी (२५ नोव्हेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल म्हणाला की, “एमएस धोनीची जागा कुणीही घेऊ शकत नाही, अर्थात यष्टीरक्षक फलंदाजांसाठी तो एक आदर्श आहे. खेळात आपली भूमिका कशी पार पाडावी हे त्याने दाखवून दिलं.”
“यष्टीरक्षक म्हणून फिरकी गोलंदाजांनी वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर कशी गोलंदाजी करावी, याचा सल्ला मी देऊ शकतो. यष्टीरक्षकाची ही जबाबदारी आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मी हे केले आहे. आशा आहे की भविष्यातही मी ही कामगिरी करू शकेल,” असेही पुढे बोलताना राहुल म्हणाला.
भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्यामुळे वनडे आणि टी20 सामन्यात त्याची निवड झाली नाही. तो सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तंदुरुस्तीवर काम करत आहे. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल संघाचा उपकर्णधार असेल.
केएल राहुल खूपच चांगल्या फॉर्ममध्ये आहे. इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार होता. त्याने 14 सामन्यात 670 धावा केल्या. या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी होता. त्याने ऑरेंज कॅपही आपल्या नावे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाचे ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच टी२० सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे ३ भारतीय धुरंदर
ऑस्ट्रेलियन भूमीत वनडेमध्ये सर्वाधिक चेंडूचा सामना करणारे ३ भारतीय फलंदाज
वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारे ३ भारतीय फलंदाज