भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध काल खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात पराभव स्विकारावा लागला. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताची गाडी रुळावर आली असेच सगळ्यांना वाटले होते. मात्र तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा भारताला इंग्लंडने तिन्ही आघाड्यांवर मात दिली.
या सामन्यात फलंदाजीत कर्णधार विराट कोहलीशिवाय इतर भारतीय फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यामुळे फलंदाजांना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची नितांत आवश्यकता असेल. याशिवाय गोलंदाजीत देखील भारतीय गोलंदाज प्रभावहीन वाटले. इंग्लंडच्या चौफेर हल्ल्यासमोर भारतीय गोलंदाजांना उत्तर सापडले नाही. अशा परिस्थितीत पुढील सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन अंतिम अकराच्या समीकरणात दोन बदल करण्याची शक्यता आहे.
केएल राहुलच्या जागी अष्टपैलूला संधी
भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल गेले काही सामने खराब फॉर्मशी झुंजतो आहे. सध्या चालू असलेल्या मालिकेतील तीन सामन्यात त्याने अनुक्रमे १, ० आणि ० अशा धावा केल्या आहेत. त्यामुळे चौथ्या सामन्यात त्याला वगळले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या स्थानी संघ व्यवस्थापन राहुल तेवातिया सारखी एखाद्या अष्टपैलूला संधी देण्याचा विचार करू शकते.
भारतीय संघ हार्दिक पंड्यासह पाचच गोलंदाजांना घेऊन खेळत असल्याने बदली गोलंदाजाचा पर्याय उपलब्ध राहत नाही. त्यामुळे हे टाळण्यासाठी राहुलच्या जागी अष्टपैलू खेळाडू संघात येऊ शकतो. असा बदल केल्या गेल्यास ईशान किशनला पुन्हा एकदा रोहित शर्मासह सलामीला बढती दिली जाऊ शकते.
युझवेंद्र चहलला वगळले जाण्याची शक्यता
भारताचा लेगस्पिनर युझवेंद्र चहल इंग्लंडविरुद्धच्या टी२० सामन्यात निष्प्रभ ठरत असल्याचे चित्र आहे. मालिकेतील तीन सामन्यात त्याने तब्बल ९.९२ म्हणजे जवळपास १०च्या ईकॉनॉमी रेटने धावांची खैरात केली आहे. याशिवाय त्याला बळी मिळवण्यात देखील फारसे यश आले नाहिये.
त्यामुळे चौथ्या सामन्यात त्याला वगळण्याचा विचार संघ व्यवस्थापन करू शकते. जर केएल राहुलच्या जागी राहुल तेवातियाला संधी देण्यात आली लेगस्पिनरचा पर्याय उपलब्ध होईल. अशा परिस्थितीत चहलच्या जागी डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल अथवा वेगवान गोलंदाज दीपक चहरला संधी मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या:
वेस्ट इंडिज लिजेंड्सची इंग्लंडवर मात, आता सेमिफायनलमध्ये होणार भारताशी मुकाबला
तिसऱ्या सामन्यात या रणनितीने भारताला पाजले पाणी, सामनावीर जोस बटलरचा खुलासा
क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, आयपीएलमध्ये मिळू शकते सामना पाहण्याची संधी