आयपीएल २०२० चा शेवटचा साखळी सामना मंगळवारी (३ नोव्हेंबर) सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स संघात झाला. हा सामना हैदराबाद संघाने १० विकेट्सने जिंकला. यासह हैदराबादने प्लेऑफमध्ये धमाकेदारपणे एन्ट्री केली. या विजयात संघाचे शिलेदार डेविड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा यांनी तडाखेबंद अर्धशतकी खेळी करत मोलाचे योगदान दिले.
नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय
हैदराबादने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्स गमावत १४९ धावा केल्या होत्या. हे आव्हान हैदराबादने एकही विकेट न गमवता अवघ्या १८.१ षटकात पूर्ण केले.
वॉर्नर आणि साहाचे अर्धशतक
हैदराबादकडून फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर आणि वृद्धिमान साहाने डावाची सुरुवात केली होती. या दोघांनीही आपली जबाबदारी ओळखत संघासाठी उत्कृष्ट खेळी केली. वॉर्नरने ५८ चेंडूत ८५ धावा केल्या. या धावा करताना त्याने १ षटकार आणि १० चौकारांचा पाऊस पाडला. साहानेही आपल्या कर्णधाराला एकटे पडू दिले नाही. त्याने ४५ चेंडूत १ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ५८ धावांची अर्धशतकी खेळी केली. दोघांनीही १५१ धावांची दीडशतकी भागीदारी रचली.
मुंबईकडून गोलंदाजी करताना एकाही गोलंदाजाला हैदराबादच्या वॉर्नर आणि साहा या दोघांना बाद करता आले नाही.
मुंबईकडून पोलार्डने केली सर्वोच्च खेळी
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबईकडून विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्डने सर्वोच्च खेळी केली. त्याने २५ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या. सोबतच सूर्यकुमार यादव (३५), इशान किशन (३३) आणि क्विंटन डी कॉकने (२५) धावा केल्या. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.
संदीप शर्माने घेतल्या सर्वाधिक विकेट्स
हैदराबादकडून गोलंदाजी करताना संदीप शर्माने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकांत ३४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. यासोबतच जेसन होल्डर आणि शाहबाज नदीमने प्रत्येकी २ विकेट्स आपल्या खिशात घातल्या, तर फिरकीपटू राशिद खानला १ विकेटवर समाधान मानावे लागले.
या सामन्यात हैदराबादने विजय मिळवल्यानंतर प्लेऑफमध्ये एन्ट्री करणारे चार संघ निश्चित झाले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-IPL: ‘मागील ३ सामन्यात…’, कोलकाताविरुद्ध सामना गमावल्यानंतर डेविड वॉर्नरचे मोठे वक्तव्य
-“…म्हणून मी समदला गोलंदाजी दिली”, शेवटचे षटक फिरकीपटूला दिल्याबद्दल डेविड वॉर्नरचे स्पष्टीकरण
-दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर विलियम्सन, रशीद नाही तर ‘या’ भारतीयाचे डेविड वॉर्नरने केले कौतुक
ट्रेंडिंग लेख-
-‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
-IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?