आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव जवळ येऊन ठेपला आहे. आता प्रत्येक संघांनी आपआपले खेळाडू रिटेन करण्यास सुरुवात केली आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामात सनरायझर्स हैदराबादची कामगिरी अत्यंत खराब राहिली होती. गुणतालिकेत संघ शेवटच्या स्थानावर राहिला. फ्रँचायझीने स्पर्धेदरम्यान केन विलियम्सनकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. मात्र, तो संघाला प्ले-ऑफमध्ये पोहचवण्यात अपयशी ठरला. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद आयपीएल २०२२ साठी विलियम्सनवर अवलंबून राहू शकते. एका वृत्तानुसार, विलियम्सनने हैदराबाद संघासोबत राहण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबतचा संघ व्यवस्थापनाने त्याच्याशी करार केला आहे.
सनरायझर्स हैदराबादने आपल्या संघात विलियम्सनची जागा निश्चित केल्यानंतर, आता ते टी२० चा जगातील सर्वोत्तम टी२० गोलंदाज राशिद खानला रिटेन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, राशिद खानच्या मानधनाबाबत अजून निर्णय होत नाही. राशिद खानला सध्या ९ कोटी रुपये मिळतात. फ्रँचायझी ती १२ कोटींपर्यंत वाढवण्यास तयार आहे. मात्र, आपण लिलावात गेलो तर त्याला जास्त किंमत मिळू शकेल, असे राशिदला वाटते. त्यामुळे त्यांनी अद्याप राशिदला रिटेन केलेले नाही.
सनरायझर्स हैदराबाद संघ व्यवस्थापन एक भारतीय खेळाडू उमरान मलिकला कायम ठेवू शकते. मलिकने आयपीएलच्या चौदाव्या हंगामात पदार्पण केले होते. त्याने हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकलेला. मलिक सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून, भारत अ संघाचा भाग आहे. मात्र, मलिकला फ्रँचायझी किती रक्कम देऊन आपल्या संघात घेते याचा खुलासा अद्याप झालेला नाही.
हैदराबादने माजी कर्णधार डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांना लिलावात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. टी२० विश्वचषकातील उत्कृष्ट कामगिरीमुळे वॉर्नरला रिटेन करण्यात येईल असे म्हटले जात होते.
आयपीएल २०२२ च्या रिटेन्शन नियमांनुसार, आधीच अस्तित्वात असलेले आठ संघ जास्तीत जास्त चार खेळाडू राखू शकतात. यासाठी आठ जुन्या संघांना ३० नोव्हेंबरपर्यंत खेळाडू रिटेन ठेवण्याची यादी जाहीर करावी लागणार आहे. यानंतर, लखनौ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ १ ते २५ डिसेंबर दरम्यान प्रत्येकी तीन खेळाडू आपल्या संघात जोडू शकतात.