पुणे। अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खालीद नबील सैय्यद व असिफ शेख यांची मिरज येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती आझम स्पोर्टस अकादमीचे संचालक गुलजार शेख यांनी दिली.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात खालीद नबील सय्यदने सोलापूर येथे झालेल्या विभागीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुणे महानगरपालिकेच्या अदनान शेखला ८-३ असे पराभूत करताना विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीत झालेल्या लढतीमध्ये खालीदने पुणे जिल्ह्याच्या आशिषला २३-० असे एकतर्फी पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य लढतीमध्ये अदनान शेखने असिफ शेखला १४-९ असे पराभूत करतना अंतिम फेरी गाठली. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये असिफ शेखने आशिषला ११-६ असे पराभूत केले.
खालीद व आसिफ यांनी मिळविलेल्या यशासाठी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती परवीन शैख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.