कसोटी क्रिकेटची सुरुवात मार्च १८७७ साली झाली होती. यावेळी ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात सर्वात पहिला सामना मेलबर्न येथे झाला होता. त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये अनेक चढउतार आले आणि जवळपास १४० वर्षांनंतर क्रिकेटच्या या प्रकाराला प्रेक्षकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळाले.
कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त २ संघांनी एका डावात ९०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर, केवळ एक संघ ८०० पेक्षा जास्त धावा करु शकला आहे. शिवाय, कसोटीत एका डावात तब्बल २१ वेळा ७००पेक्षा जास्त धावांची नोंद झाली आहे. जर, ६०० धावांविषयी पाहायचं झालं तर, जवळपास १५७ वेळा कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यात एका संघाने ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
हा कारनामा जानेवारी १९२५मध्ये मेलबर्न येथे इंग्लंडविरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदा केला होता. त्या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघ ६०० धावांवर सर्वबाद झाला होता.
या लेखात कोणकोणत्या संघांनी कितीवेळा कसोटी सामन्याच्या एका डावात ६००पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, याचा आढावा घेण्यात आला आहे. तर बघूयात… List Of Team With Maximum Number Of 600 Score In Test
१. ऑस्ट्रेलिया (३४ वेळा)
ऑस्ट्रेलियाने जानेवारी १९२५मध्ये मेलबर्न येथे इंग्लंडविरुद्ध खेळताना सर्वात पहिल्यांदा कसोटी सामन्याच्या एका डावात ६०० धावा करण्याचा कारनामा केला होता. त्यानंतर तब्बल ३४वेळा ऑस्ट्रेलिया संघाने कसोटी सामन्याच्या एका डावात ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांनी ४ वेळा ७०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाने त्यांच्या कसोटी इतिहासात एका डावात सर्वाधिक धावा जून १९५५मध्ये केल्या होत्या. यावेळी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना त्यांनी ८ बाद ७५८ धावा केल्या होत्या.
२. भारत (३३ वेळा)
भारताने फेब्रुवारी १९७९मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्यांदा ६००पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला होता. या सामन्यात भारताने पहिल्या डावात ७ बाद ६४४ धावा केल्या होत्या. तो सामना अनिर्णीत राहिला होता. त्यानंतर ३३ वेळा भारताने ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यात भारताने ४ वेळा ७०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
भारताने त्यांच्या कसोटी इतिहासात एका डावात सर्वाधिक ७५९ धावा केल्या आहेत. डिसेंबर २०१६मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांनी ७ विकेट्स गमावत एवढे मोठे आव्हान दिले होते.
३. इंग्लंड (२० वेळा)
इंग्लंडने कसोटीच्या एका डावात ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम २० वेळा केला आहे. त्यांनी आतापर्यंत एक वेळा ९००, एक वेळा ८०० आणि एक वेळा ७०० धावा केल्या आहेत. १९३८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका डावात ७ बाद ९०३ धावांचा भलामोठी धावसंख्या इंग्लंडने केला होता. यासह कसोटीच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारा इंग्लंड हा दुसरा संघ आहे.
४. वेस्ट इंडिज (२० वेळा)
इंग्लंडप्रमामेच वेस्ट इंडिजने देखील कसोटीच्या एका डावात २० वेळा ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. नोव्हेंबर १९४८ मध्ये त्यांनी भारताविरुद्ध ६३१ धावा करत सर्वप्रथम ६०० धावांचा पल्ला गाठला होता. वेस्ट इंडिजने आतापर्यंत ४ वेळा ७०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडिजच्या कसोटीतील सर्वाधिक धावा पाकिस्तानविरुद्ध मार्च १९५८ मध्ये केल्या होत्या. यावेळी एका डावात ३ विकेट्स गमावत त्यांनी ७९० धावा केल्या होत्या.
५. पाकिस्तान (१५ वेळा)
पाकिस्तानने १५ वेळा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. जानेवारी १९५८मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ८ बाद ६५७ धावा करत त्यांनी हा कारनामा केला होता. पाकिस्तानने आतापर्यंत २ वेळा ७०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
पाकिस्तानचा आजवरचा सर्वाधिक धावांचा विक्रम फेब्रुवारी २००९मध्ये श्रीलंकाविरुद्ध बनला होता. यावेळी त्यांनी ६ बाद ७६५ धावा केल्या होत्या.
६. श्रीलंका (१३ वेळा)
श्रीलंकाने १३ वेळा कसोटीच्या एका डावात ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. १९९७ मध्ये भारताविरुद्ध श्रीलंकाने कसोटीतील सर्वाधिक केल्या आहेत. त्यांनी एका डावात ६ बाद ९५२ धावा करत भारताला ९५३ धावांचे आव्हान दिले होते. यासह कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एका डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांच्या यादीत श्रीलंका पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी १ वेळा ९०० आणि ५ वेळा ७०० धावांचा पल्ला गाठला आहे.
७. दक्षिण आफ्रिका (१२ वेळा)
दक्षिण आफ्रिकाने डिसेंबर १९६६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६२० धावा करत या यादीत प्रवेश केला होता. त्यानंतर तब्बल १२ वेळा त्यांनी ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. परंतु, दुर्दैवाने दक्षिण आफ्रिकाला कसोटीच्या एका डावात ७०० धावा करता आल्या नाहीत. त्यांच्या सर्वाधिक धावा ६८२ इतक्या आहेत. ज्या त्यांनी इंग्लंडविरुद्ध २००३मध्ये केल्या होत्या.
८. न्यूझीलंड (९ वेळा)
न्यूझीलंडने कसोटीच्या एका डावात ९ वेळा ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. १९९१मध्ये श्रीलंकाविरुद्ध ६७१ धावा करत त्यांनी पहिल्यांदा हा पराक्रम केला होता. न्यूझीलंडच्या कसोटी इतिहासात आतापर्यंतच्या सर्वाधिक धावा ७१५ इतक्या आहेत. त्यांनी या धावा फेब्रुवारी २०१९मध्ये बांग्लादेशविरुद्ध केल्या होत्या.
९. बांग्लादेश (१ वेळा)
बांग्लादेश हा आतापर्यंतचा एकटा असा संघ आहे, ज्याने कसोटीच्या एका डावात ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा कारनामा फक्त १ वेळा केला आहे. मार्च २०१३मध्ये श्रीलंकाविरुद्ध ६३८ धावा करत त्यांनी हा विक्रम नोंदवला होता. तो सामना अनिर्णीत राहिला होता.
ट्रेंडिंग लेख-
फॉलोऑन मिळाल्यानंतर कसोटीत शानदार विजय मिळवणारे २ संघ
वनडेत ‘पार्ट टाईम गोलंदाजी’ करत १००पेक्षा जास्त विकेट्स…
५०० सामने खेळणारे ३ भारतीय दिग्गज क्रिकेटपटू, एक आहे…