क्रिकेट या क्रिडाप्रकाराने मोठा प्रवास केला आहे. मागील कित्येक दशकांपासून चालू असलेल्या क्रिकेटचे मूळ कसोटी क्रिकेटमध्ये रोवले गेले आहे. आधुनिक युगात भलेही टी२० आणि वनडे क्रिकेटला अधिक पसंती दर्शवली जात असली, तरीही दिग्गज क्रिकेटपटू आज देखील कसोटीला क्रिकेटचे खरे स्वरुप मानतात. सध्या कसोटी सामना ५ दिवस खेळला जातो. परंतु सुरुवातीला या सामन्यांना वेळेची मर्यादा नसायची.
एक असाच कसोटी सामना झाला होता, ज्याची क्रिकेट इतिहासात सर्वात मोठा कसोटी सामना म्हणून नोंद आहे. तो अंतिम ‘Timeless Test’ होता. एवढेच नव्हे तर, त्या सामन्याला गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड-रिकॉर्डमध्येही जागा मिळाली आहे. त्या ऐतिहासिक सामन्याची आजच्याच दिवशी (३ मार्च १९३९) सुरुवात झाली होती.
चला उजाळा देऊया, त्या सामन्याच्या आठवणींना…
दक्षिण आफ्रिकाचा पहिला डाव
ही गोष्ट आहे साल १९३९ ची. इंग्लंड संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला होता. ३ मार्चपासून डर्बन येथे दोन्ही संघ भिडणार होते. यजमान दक्षिण आफ्रिकाच्या बाजूने नाणेफेकीचा निकाल लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी निवडली. पहिल्या डावात त्यांनी २०२.६ षटके फलंदाजी करताना ५३० धावा केल्या. यात पीटर वेन डर बील यांच्या १२५ धावा आणि डडली नर्स यांच्या १०३ धावांचा समावेश होता. दरम्यान पाहुण्या इंग्लंडच्या रेग पर्कने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या होत्या.
इंग्लंडचा पहिला डाव
प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव ११७.६ षटकात ३१६ धावांवर संपला. इंग्लंडकडून यष्टीरक्षक फलंदाज लेस एमेस सर्वाधिक ८४ धावांची खेळी करू शकले. तर एडी पेन्टर यांनीही धावांची पन्नाशी पार केली. दक्षिण आफ्रिकाच्या एरिक डाल्टन यांनी सर्वाधिक ४ फलंदाजांना पव्हेलियनला पाठवले. आता दक्षिण आफ्रिकाला पहिल्या डावात २१४ धावांची आघाडी मिळाली होती.
दक्षिण आफ्रिकाचा दुसरा डाव
त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला. कर्णधार ऍलेन मेलविले यांच्या शतकी खेळीच्या जोरावर संघाने १४२.१ षटकात फलंदाजी केली. मेलविलेबरोबर पीटर वेन डर बीलनेही ९७ धावा, ब्रूस मिचेलने ८९ धावांचे योगदान दिले आणि दक्षिण आफ्रिकाने ४८१ धावांचा भलामोठा स्कोर उभारला. परिणामत विजयासाठी इंग्लंडला ६९६ धावांचे आव्हान मिळाले.
इंग्लंडचा दुसरा डाव
तब्बल ६९६ धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांचे वेगळेच रुप पाहायला मिळाले. सलामीवीर लिओनार्ड हटन ५५ धावांवर त्रिफळाचीत झाले. त्यानंतर दुसरे सलामीवीर पॉल गिब यांनी १२० धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावरील बिल एडरिच यांनी २१९ धावांची झुंजार खेळी केली. चौथ्या क्रमांकावरील वॉलि हेमंड यांनी १४० धावांचे योगदान दिले. पुढे एडी पेंटरने ७५ धावा, लेस एमेसने नाबाद १७ धावा आणि ब्रायन वेलेंटाइनने नाबाद ४ धावा केल्या. यासह २१८.२ षटके खेळताना इंग्लंडने ५ बाद ६५४ धावांचा पल्ला गाठला.
किती दिवस चालला आणि कसा संपला सामना ?
हा सामना दुसऱ्या डावापर्यंत पोहोचायला तब्बल १२ दिवस लागले होते. यात विश्रांतीच्या २ दिवसांचा समावेश होता. सामन्याच्या १२ व्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी फक्त ४२ धावांची गरज होती. परंतु हा सामना संपण्याचे नाव घेत नव्हता. दुसरीकडे इंग्लंड संघाला त्याचदिवशी २ दिवसांची रेल्वेयात्रा करत केपटाउनला पोहोचायचे होते. जहाज तयारीनिशी समुद्रात त्यांची वाट पाहात होते. त्यामुळे ६५४ धावांवर खेळ थांबवण्यात आला आणि सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.
अर्थातच हा सामना तब्बल १२ दिवस चालला. दरम्यान दोन्ही संघांनी मिळून ५४४७ चेंडू टाकले आणि १९८१ धावा केल्या. या सामन्यानंतर पुढे कधीही इतक्या दिवसांचा कसोटी सामना झाला नाही. त्यामुळे या सामन्याची शेवटचा अमर्यादित कालावधीचा कसोटी सामना म्हणून नोंद झाली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्या’ भीषण घटनेची १३ वर्षे! आजच्याच दिवशी श्रीलंकन संघावर पाकिस्तानमध्ये झाला होता दहशतवादी हल्ला
वाढदिवस विशेष: पाकिस्तानचे विश्वविजयाचे स्वप्न पूर्ण करणारा ‘इंझमाम-उल-हक’
विराट १०० वा कसोटी करणार खास? ३८ धावा करताच सचिन, द्रविड, सेहवागच्या पंक्तीत बसण्याची संधी