पुणे । महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने ‘सर्वात वेगवान महिला धावपटू’ या स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२० रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे करण्यात आले असल्याची माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या सहाय्यक संचालक निलीमा अडसूळ यांनी दिली.
‘फिट इंडिया’ मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र शासन व क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या वतीने या ‘‘गो गर्ल गो’’ क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मुलींचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढावा या उद्देशाने ही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे उदघाटन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरीया व एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण शोभा पंडित, शकुंतला खटावकर, गुरुबन्स कौर, किशोरी शिंदे, पूजा घाटकर, दीक्षा दिंडे, रेशमा पाटील व अंकिता गुंड यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित राहणार आहेत.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने शाळा, तालुका, जिल्हा व विभाग स्तरातून या वेगवान महिला धावपटूची निवड केली आहे. सर्वात वेगवान ‘१०० मीटर स्प्रिंट’ मारण्याच्या या स्पर्धेत सुमारे १ कोटी विद्यार्थीनी स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता. ६-९ वर्षे, १०-१४ वर्षे व १५-१८ या वयोगटात विभाग स्तरावर अव्वल कामगिरी बजाविणाऱ्या धावपटू या स्पर्धेत धावणार आहेत.
या स्पर्धेत प्रथम स्थान पटकावणाऱ्या धावपटूला ७५ हजार, द्वितीय स्थान पटकाविणाऱ्या धावपटूला ५० हजार तर तृतीय स्थान पटकाविणाऱ्या धावपटूला २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी एचडीएफसी बँकेचे प्रायोजकत्व लाभले आहे. मुलींना प्रोत्साहित करण्यासाठी या नागरीकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री विजय संतान यांनी केले आहे.