भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मिताली आता महिला आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) लीगच्या पहिल्या हंगामात खेळताना दिसणार आहे. या वर्षीच्या जून महिन्यात क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या मितालीने आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा दर्शवली आहे.
आयसीसीच्या (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) १०० पर्सेंट क्रिकेट पॉडकास्ट या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मिताली राज (Mithali Raj) आली. यावेळी तिने म्हटले, “माझी खेळण्याची इच्छा असून त्यावर अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसेच महिलांचे आयपीएल सुरू होण्यासाठी अजून काही महिने शिल्लक आहेत. महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा भाग होण्याची इच्छा आहे.”
वयाच्या १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या मितालीने तब्बल २३ वर्षांनंतर क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. तिने वनडे क्रिकेटमध्ये २३२ सामने खेळताना ५०.६८ च्या सरासरीने ७८०५ धावा केल्या आहेत. तर ८९ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २३६४ धावा आणि १२ कसोटी सामन्यात ६९९ धावा नोंदवल्या आहेत. ती वनडेमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी आणि सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटपटू आहे. त्याचबरोबरच तिच्या नावावर अनेक विक्रमांची नोंदही आहे.
मिताली ही सर्वाधिक विश्वचषक खेळणारी पहिलीच महिला भारतीय खेळाडूही ठरली. तसेच ती आयसीसीमध्ये महिला आणि पुरुषांच्या स्पर्धेत संघाचे नेतृत्त्व करणारी सर्वात वयस्कर कर्णधार (Oldest Indian Captain Playing In ICC Tournament) बनली होती. आयसीसी महिला विश्वचषक २०२२च्या स्पर्धेत संघाचे नेतृत्व करताना तिने हा विक्रम रचला. त्यावेळी तिचे वय ३९ वर्षे ९३ दिवस इतके होते. तिच्यापूर्वी डायना एडुलजी यांच्या नावावर हा विक्रम होता. त्यांनी १९९३च्या महिला वनडे विश्वचषकात भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची कमान सांभाळली होती. तेव्हा त्यांचे वय ३७ वर्षे १८४ दिवस इतके होते.
तसेच मितालीने १५५ वनडे सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले असून ८९ सामने जिंकले आहेत. तसेच ६३ सामन्यांत तिला कर्णधार म्हणून पराभव पाहावा लागला आहे, तर ३ सामन्यांचा निकाल लागलेला नाही. त्याचबरोबर तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २००५ आणि २०१७ साली महिला वनडे विश्वचषकाचा उपविजेता राहिला आहे.
मितालीने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तिने यावर्षीच्या जून महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच निवृत्ती घेतली. ती अखेरचे यावर्षी न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषकात खेळताना दिसली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टनसीचा फायदा घेत धवन ‘या’ सलामीवीराची कारकीर्द लावतोय पणाला? वाचा सविस्तर
माजी क्रिकेटपटूने जय शहांना दाखवला आरसा; म्हणाला, “तुम्ही करताय ते क्रिकेटसाठी…”
डरबन फ्रॅंचायजीचा मुख्य प्रशिक्षक बनला माजी अष्टपैलू! अफगाणिस्तान, झिम्बाब्वे संघाशी आहे कनेक्शन