रविवारी (१० एप्रिल) आयपीएल २०२२चा चौथा डबल हेडर खेळला गेला. यातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने निर्धारित २० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर २१५ धावा केल्या. दिल्लीच्या २१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ १७१ धावाच करू शकला आणि दिल्लीने ४४ धावांनी हा सामना खिशात घातला. या सामन्यादरम्यान दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याने एक विक्रम केला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या फलंदाजांनी चाहत्यांचे पैसावसूल मनोरंजन केले. सलामीवीर डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी शानदार अर्धशतकी खेळी केल्या. तसेच कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) यानेही काही आकर्षक फटके मारत संघासाठी छोटेखानी पण उपयुक्त अशी खेळी केली. त्याने १४ चेंडूंमध्ये १९२ च्या स्ट्राईक रेटने २७ धावा केल्या. त्याच्या या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून २ चौकारांसह एक १ षटकारही निघाला.
हा एकमेव षटकार पंतसाठी विक्रमी (Most IPL sixes at the age of 25 or less) ठरला आहे. त्याने या षटकारासह आयपीएलमधील ११७ षटकारांचा आकडा गाठला आहे. यासह तो २५ पेक्षा कमी वय असताना आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. पंत सध्या २४ वर्षांचा आहे. पंतनंतर संजू सॅमसन, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि विराट कोहली हेदेखील या यादीत आहेत.
संजूच्या नावावर २५ पेक्षा कमी वयात ११५ षटकार आहेत. रोहितच्या नावावर १०५, सुरेश रैनाच्या नावावर ९७ तर विराट कोहलीच्या नावावर ८७ षटकार आहेत.
२५ किंवा त्यापेक्षा कमी वयात सर्वाधिक आयपीएल षटकार:
११७* – रिषभ पंत
११५- संजू सॅमसन
१०५- रोहित शर्मा
९७- सुरेश रैना
८७- विराट कोहली
दरम्यान दिल्लीने हा सामना जिंकत त्यांचा हंगामातील दुसरा विजय नोंदवला आहे. त्यांनी यापूर्वी हंगामातील पहिला सामना जिंकून होता. त्यानंतर पुढील सलग २ सामने गमावले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा विजय गुणतालिकेतील स्थिती मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्लीचा दिमाखात कमबॅक, विजयरथावर स्वार कोलकात्याला ४४ धावांनी पाजले पराभवाचे पाणी
एमएस धोनीला तंबूत धाडल्यानंतर ‘हा’ पठ्ठ्या आहे भलताच खुश; म्हणाला, ‘मी चिंतेत होतो, पण…’
RR vs LSG: लखनऊचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय; दोन्ही संघात २ महत्त्वाचे बदल