भारताचा मर्यादीत षटकांचा क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळायचे आहेत. या मालिकांदरम्यान भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी अशा अनेक अनुभवी खेळाडू अनुपलब्ध आहेत. त्याचमुळे श्रीलंका दौऱ्यातील मालिकांसाठी मर्यादीत षटकांच्या भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच शिखर धवनकडे कर्णधारपद तर भुवनेश्वर कुमारकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तसेच प्रशिक्षकपद राहुल द्रविडकडे देण्यात आले आहे.
संघातील केवळ ६ खेळाडू खेळलेत श्रीलंकेविरुद्ध वनडे
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेल्या २० खेळाडूंपैकी केवळ ६ खेळाडू श्रीलंकेविरुद्ध वनडे क्रिकेट खेळले आहेत. यामध्ये शिखर धवन, मनिष पांडे, हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि भुवनेश्वर कुमार या ६ खेळाडूंचा समावेश आहे. तसेच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला श्रीलंका विरुद्ध खेळण्याचा अनुभव आहे.
द्रविडच्या ६ खेळाडूंपेक्षा अधिक धावा
विशेष गोष्ट अशी की श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातील खेळाडूंपैकी जे ६ खेळाडू श्रीलंकेविरुद्ध वनडे सामने खेळले आहेत, त्यांच्या एकूण धावांपेक्षाही द्रविडने श्रीलंकेविरुद्ध अधिक धावा केल्या आहेत. द्रविडने श्रीलंकेविरुद्ध ४६ वनडे सामन्यात ४८.८८ च्या सरासरीने ३ शतके आणि ११ अर्धशतकांसह १६६२ धावा केल्या आहेत.
तर, सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंपैकी कर्णधार शिखरने श्रीलंकेविरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १६ वनडे सामन्यांमध्ये ७०.२१ च्या सरासरीने ४ शतके आणि ५ अर्धशतकांसह ९८३ धावा केल्या आहेत. तसेच सध्याच्या भारतीय संघातील तो एकमेव खेळाडू आहे, ज्याने श्रीलंकेविरुद्ध शतक केले आहे.
त्याच्याव्यतिरिक्त मनिष पांडेने ५ सामन्यांत ८८ धावा, हार्दिकने ९ सामन्यांत ५३ धावा, कुलदीपने ५ सामन्यांत १९ धावा, चहलने ७ सामन्यांत शुन्य धाव आणि भुवनेश्वर कुमारने १३ सामन्यात ५३ धावा केल्या आहेत. या ६ जणांच्या मिळून ११९६ धावा होतात.
या ६ जणांपैकी कुलदीप, चहल आणि भुवनेश्वर हे प्रमुख्याने गोलंदाज आहेत. तर हार्दिक अष्टपैलू खेळाडू आहे. तसेच मनिष आणि शिखर फलंदाज आहेत. कुलदीपने श्रीलंकेविरुद्ध ७ विकेट्स, चहलने ११ आणि भुवनेश्वरने १७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच हार्दिकने ९ विकेट्स घेतल्या आहेत.
शिखरकडे श्रीलंकेविरुद्ध १००० धावा करण्याची संधी
शिखरने श्रीलंकेविरुद्धच्या अगामी वनडे मालिकेत १७ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या, तर तो श्रीलंकेविरुद्ध वनडेत १००० धावा पूर्ण करेल. असा कारनामा करणारा तो भारताचा १२ वा खेळाडू ठरेल. सध्या श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक धावा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. त्याने वनडेत ८४ सामन्यांत ३११३ धावा श्रीलंकेविरुद्ध केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्ध वनडेत ३००० पेक्षा अधिक धावा करणारा तो एकमेव भारतीय आहे.
याचबरोबर सरासरीच्या बाबतीत मात्र धवन सर्वांच्या पुढे आहे. श्रीलंकेविरुद्ध ५ किंवा त्यापेक्षा अधिक वनडे सामने खेळलेल्या खेळाडूंची फलंदाजी सरासरीन लक्षात घेतल्यास धवनचा सर्वाधिक सरासरी असणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल क्रमांक लागतो. त्याने तब्बल ७०.२१ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
असा होणार आहे श्रीलंका दौरा
श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघ ३ टी२० सामन्यांची आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळवणार आहे. हा दौरा १३ ते २५ जुलै दरम्यान होईल. आधी वनडे मालिका खेळवली जाईल. त्यानंतर टी२० मालिका होईल. वनडे मालिकेतील सामने अनुक्रमे १३, १६ आणि १८ जुलै रोजी होतील; तर टी२० मालिकेतील सामने २१, २३ आणि २५ जुलै रोजी होतील. हे सर्व सामने कोलंबो येथे होणार आहेत.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया, युजवेंद्र चहल.
नेट गोलंदाज – इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजीत सिंग
महत्त्वाच्या बातम्या –
‘अशी होती दादासोबत ५ वर्षांची राईड’ म्हणत विरूच्या बड्डे बॉय गांगुलीला लक्षवेधी अंदाजात शुभेच्छा
‘तो’ भारतीय धुरंधर पुन्हा इंग्लंडविरुद्ध ५ शतके झळकावेल, महान कसोटीपटूला आहे विश्वास