बहुचर्चित ‘द हंड्रेड’महिला स्पर्धेला आपला पहिला विजेता मिळाला आहे. ओव्हल इनविन्सिबल्स संघाने हा मान पटकावला आहे. शुक्रवारी(21 ऑगस्ट) लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ओव्हल इनविन्सिबल्स महिला संघानी साउथर्न ब्रेव्हचा 48 धावांनी पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना ओव्हल इनविन्सिबल्सने 100 चेंडूत 6 बाद 121 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, साउथर्न ब्रेव्हचा संघ अवघ्या 73 धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे ओव्हल इन्विन्सिबल्सने एकतर्फी द हंड्रेड महिला स्पर्धा जिंकली.
ओव्हल इनव्हिन्सिबल्सची वेगवान गोलंदाज मारिजेन कॅपने या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिने 18 चेंडूत फक्त 9 धावा देऊन 4 बळी घेतले. मारिजेन कॅपने 13 चेंडूत एकही धाव दिली नाही. कॅपने डॅनी व्याट, गॅबी लुईस आणि सोफिया डंकलेच्या विकेट्स घेतल्या. साउथर्न ब्रेव्हचे अव्वल 3 खेळाडूंना खातेही उघडता आले नाही.
तत्पूर्वी, साउथर्न ब्रेव्ह संघाची कर्णधार एन्या श्रबसोलने नाणेफेक जिंकून ओव्हल इनविन्सिबल्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ओव्हलची सुरुवात खराब झाली, जॉर्जिया ऍडम्स फक्त 4 धावांवर बाद झाली. पण यानंतर कर्णधार डॅन व्हॅन नीकेर्कने 26 आणि फ्रान विलेनने 25 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. अष्टपैलू मारिजेन कॅपने फलंदाजीतही ताकद दाखवली आणि 14 चेंडूत 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्यामुळे ओव्हल इनविन्सिबल्सचा संघ 100 चेंडूत 121 धावांपर्यंत पोहोचला.
प्रत्युत्तरादाखल, साउथर्न ब्रेव्हची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. संघाने आपले तीन गडी केवळ 2 धावांवर गमावले. मारिजेन कॅपने तिच्या पहिल्या 10 चेंडूंमध्ये डॅनी व्यॅट, गॅबी लुईस आणि सोफिया डंकलेचा अडथळा दूर केला. स्टेफनी टेलरने साउथर्न ब्रेव्हकडून खेळपट्टीवर उभे राहण्याची ताकद दाखवली, पण दुसऱ्या बाजूने विकेट पडत राहिल्या. साउथर्न ब्रेव्हच्या 7 विकेट अवघ्या 29 धावांवर पडल्या होत्या. फी मॉरिसने कसे तरी 23 धावा करून आपल्या संघाची लाज वाचवली आणि 8 व्या विकेटसाठी 33 धावा जोडल्या. पण शेवटी 73 धावांवर संपूर्ण संघ बाद झाला.
मारिजेन कॅपला तिच्या उत्कृष्ट अशा अष्टपैलू कामगिरीसाठी सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. त्याचवेळी, ओव्हल इनविन्सिबल्सची कर्णधार डॅन व्हॅन नीकेर्कला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. नीकेर्कने 10 सामन्यांमध्ये सर्वाधिक 259 धावा केल्या. तिची सरासरी 43 पेक्षा जास्त होती. नीकेर्कने स्पर्धेत दोन अर्धशतके लगावली.
भारताच्या जेमिमाह रॉड्रिग्सने 7 सामन्यांत 249 धावा केल्या, ती सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर होती. ओव्हल संघाच्या फेरंटने स्पर्धेत सर्वाधिक 18 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आता माझी सटकली! विराटने इशारा करताच मोहम्मद सिराजने ‘सिंघमचे’ रूप केले धारण, पाहा व्हिडिओ
बटलर राजस्थान संघातून बाहेर; न्यूझीलंडच्या ‘या’ यष्टीरक्षक फलंदाजाला मिळाली बदली खेळाडू म्हणून संधी
रक्षाबंधन विशेष: आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या