इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ मधील ४८ वा सामना शारजाच्या मैदानावर खेळला गेला. विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व पंजाब किंग्स हे दोन संघ या सामन्यात समोरासमोर उभे ठाकले होते. बेंगलोरने ६ धावांनी सामना आपल्या नावे करत प्ले ऑफसाठी पात्रता मिळविली. त्याच वेळी पंजाबचे दोन्ही सलामीवीर केएल राहुल व मयंक अगरवाल यांच्या नावे नकोसे विक्रम जमा झाले.
मयंक व राहुलची अर्धशतकी सलामी
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने निर्धारित २० षटकात १६४ धावा बनविल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात पंजाबचा कर्णधार केएल राहुल व मयंक अगरवाल यांनी पंजाबला पुन्हा एकदा दमदार सुरुवात दिली. दोघांनी १०.५ षटकात ९१ धावा ठोकत पंजाबला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. राहुलने ३९ तर, मयंकने ५७ धावांचे योगदान दिले. मात्र, हे दोघेही बाद झाल्यानंतर उर्वरित फलंदाज अपेक्षित धावगती राखण्यात अपयशी ठरले व संघाला पराभव पत्करावा लागला.
राहुल व मयंकचा नकोसा विक्रम
अर्धशतकी भागीदारी करूनही संघाला पराभव पत्करावा लागल्याने कर्णधार राहुल व मयंक अगरवाल यांच्या नावे दोन नकोसे विक्रम जमा झाले. आयपीएल इतिहासात अर्धशतकी भागीदारी करूनही संघाला विजयापर्यंत पोहचवू न शकलेल्या जोड्यांमध्ये मयंक व राहुल यांची जोडी अग्रस्थानी पोहोचली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली असताना संघाला पराभव पत्करावा लागण्याची ही आठवी वेळ आहे. एबी डिव्हिलियर्स व विराट कोहली हे देखील आठ वेळा अर्धशतकी भागीदारी करून संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
सलामीवीर म्हणूनही सहा वेळा अर्धशतकी सलामी देऊन संघाला विजय मिळवून देण्यात राहुल-मयंक जोडी अपयशी ठरली आहे. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल व केएल राहुल तसेच, डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन या जोड्या आहेत. या दोन्ही जोड्या प्रत्येकी पाच वेळा अर्धशतकी सलामी देऊनही संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत.