इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ चा हंगाम संपून काही दिवसच सरले आहेत. तोवर येत्या २०२२ च्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. या हंगामासाठी खेळाडूंना संघात कायम करण्याची (रिटेन) प्रक्रियाही सुरू झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल फ्रँचायझींना खेळाडूंना रिटेन करण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे फ्रँचायझींनी त्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. या रिटेन प्रक्रियेवरुन चेन्नई सुपर किंग्ज आणि रविंद्र जडेजा यांच्यात मजेशीर संवाद झाल्याचे पाहायला मिळाले.
नियमांनुसार, एक आयपीएल फ्रँचायझी जास्तीतजास्त ४ खेळाडूंना रिटेन करू शकते. त्यामुळे फ्रँचायजीही सक्रिय झाल्या असून आपल्या चाहत्यांना रिटेन खेळाडूंसंबंधी त्यांची मते विचारत आहेत.
चेन्नई सुपर किंग्जनेही (सीएसके) शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) ट्वीटर अकाउंटवर त्यांच्या चाहत्यांसाठी रिटेन खेळाडूंसंबंधी एक पोस्ट टाकली होती. यामध्ये त्यांनी चाहत्यांना त्यांचे आवडते ४ खेळाडू निवडायला सांगितले होते, ज्यांना सीएसकेने रिटेन करावे. यावर चाहते आपल्या प्रतिक्रिया नोंदवताना दिसत आहेत. यामध्येच सीएसकेचा अष्टपैलू रविंद्र जडेजा यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गंमतीने जडेजाने सीएसकेच्या पोस्टखाली लिहिले की, ‘मीही सीएसके रिटेन करणाऱ्या खेळाडूंची नावे सांगू शकतो का?’
Should i tell ?😜😜😜
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) November 26, 2021
जडेजाच्या या मजेशीर प्रतिक्रियेवर सीएसकेनेही आपले उत्तर दिले आहे. ‘आताच नको’, असे उत्तर देताना सीएसकेने पुढे मजेशीर असा इमोजीही टाकला आहे. खेळाडू आणि फ्रँचायझीमधील हा गमतीशीर संवाद चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसतो आहे.
Not Y8 😉
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 26, 2021
आयपीएल २०२१ ची विजेती सीएसके फ्रँचायझी आपला कर्णधार एमएस धोनी याला पुढील ३ हंगामांसाठी रिटेन करण्याच्या तयारीत आहे. धोनीव्यतिरिक्त अष्टपैलू जडेजा आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांनाही संघात कायम केले जाऊ शकते. मात्र चौथ्या नावाविषयी अद्याप कसलीही माहिती पुढे आलेली नाही. हे नाव ड्वेन ब्रावो याचे असू शकते. परंतु तो नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्याने त्यालाही रिटेन करण्याची शक्यता थोडी कमीच आहे.