मुंबई – प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दादा म्हणून ओळखला जाणार्या वसीम जाफरने विक्रमांचे इमले उभे केले होते. प्रथम श्रेणीच्या दुसऱ्याच सामन्यात त्रिशतक झळकावत भारतीय कसोटी संघात प्रवेश मिळवला होता. 2000 साली दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. काही सामन्यात भारताच्या राष्ट्रीय संघातून खेळताना सलामीच्या फलंदाजाची भूमिका बजावली.
फॉर्म, फिटनेस आणि संघातील वाढती स्पर्धा यामुळे तो संघाबाहेर गेला. राष्ट्रीय संघात कमबॅक करणे त्याला अवघड झाले. तरीही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घातला. सुमारे दोन दशके क्रिकेटमध्ये योगदान देऊन त्याने मार्च 2020 मध्ये वयाच्या 42 व्या वर्षी क्रिकेटच्या सर्वच प्रकारांतून निवृत्ती घेतली.
प्रथम श्रेणीचे तब्बल 260 सामने खेळत जाफरने 19 हजार 410 धावा केल्या आहेत. यामध्ये 57 शतके आणि 91 अर्धशतकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे 150 रणजी सामने खेळणारा वसीम जाफर हा पहिला खेळाडू आहे आणि त्याच्या नावे 12 हजारांपेक्षा अधिक धावा करण्याचा भारतातील विक्रम आहे.
‘रनमशीन’वासिम जाफरने ट्विटरवर नुकतेच भारताचा ऑल टाइम एकदिवसीय संघ निवडला. जाफरने त्याच्या संघात सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या प्रसिद्ध जोडगोळीला स्थान दिले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात यशस्वी ठरलेली सलामीची जोडी आहे. त्यांनी आतापर्यंत 21वेळा शतकी आणि 23 वेळा अर्धशतकीय भागीदारी केली आहे. सलामीला खेळून सर्वाधिक धावांची भागीदारी करणाऱ्या यादीमध्ये हे दोघे पहिल्या स्थानावर आहेत.
जाफरने तिसऱ्या क्रमांकासाठी रोहित शर्मा आणि चौथ्या क्रमांकासाठी कर्णधार विराट कोहलीला निवडले. एकेकाळी आपल्या बॅटने गोलंदाजाला फोडून काढणारा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याला संघात स्थान देण्यात आले नाही. यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यावर भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजनसिंगने ‘सेहवाग कुठे’ असा प्रश्न विचारला आहे.
No sehwag ??? 😳 https://t.co/HOqqAltARq
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) June 9, 2020
जाफरने युवराज सिंह आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी यांना पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी स्थान दिले. यासोबत संघाची कमान एमएस धोनी यांच्याकडे सोपवली. संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून भारताला विश्वविजेता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कपिल देव यांनाही संघात निवडले.
फिरकी गोलंदाजीची मदार रविंद्र जडेजा किंवा हरभजन सिंह यापैकी एक व सोबतीला अनिल कुंबळे यांच्याकडे सोपवली. तर वेगवान गोलंदाजीची धुरा झहीर खान आणि जसप्रीत बुमराह या जोडीकडे दिली.