विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे इंग्लंड संघातील खेळाडूंवर टीका केली जात आहे. माजी इंग्लिश कर्णधार नासिर हुसेन यांनी देखील इंग्लंड संघातील खेळाडूंवर बोचरी टीका केली होती. अशातच माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूने देखील इंग्लिश संघातील खेळाडूंवर टीकांचा वर्षाव केला आहे.
ऑस्ट्रेलियन संघासाठी १४५ कसोटी सामने आणि १९४ वनडे सामने खेळणाऱ्या दिग्गज गोलंदाज शेन वॉर्नने ट्विट करत इंग्लिश खेळाडूंवर टीका केली आहे. त्याने आपल्या ट्विट मध्ये लिहिले की, “इंग्लंड संघाचा नकारात्मक दृष्टिकोन पाहून मी निराश झालो आहे. काल ( ६ जून ) एकदाही असे जाणवले नाही की, ते धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाचव्या दिवशी इंग्लंडने पाठलाग कसा केला जातो याची मोठी संधी गमावली. तसेच कसोटी क्रिकेट पाहणाऱ्यांसाठी देखील हे निराशाजनक होते. ”
Disappointed at the negative approach from England y’day as they never even contemplated chasing down a very getable total. A huge opportunity missed on how to chase on the 5th day, plus exciting for spectators, viewers & test cricket ! @robkey612 @nassercricket @MichaelVaughan
— Shane Warne (@ShaneWarne) June 7, 2021
काय म्हणाले होते नासिर हुसेन
नासिर हुसेन यांनी सामना अनिर्णित राहिल्यानंतर म्हटले की, “या सामन्यात एकच संघ होता, जो सामना जिंकण्यासाठी खेळत होता. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन शेवटपर्यंत मैदानात उभा होता. विलियम्सनला हवं असल्यास तो १५ मिनिटांपूर्वी हात मिळवून सामना संपवू शकला असता. परंतु त्याने तसे केले नाही आणि आपला सकारात्मक दृष्टिकोन दर्शवला. इंग्लंड संघ विजयाच्या दिशेने का जात नाही, हे मला देखील माहित आहे. कारण, मागील तीन सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि यावेळी संघात कोणतेही मोठे खेळाडू नाहीत.”
या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ३७८ धावा केल्या होत्या. यामध्ये डेवोन कॉनवेने महत्वाची भूमिका बजावली होती. कॉनवे पदार्पणाच्या सामन्यात २०० धावांची विक्रमी खेळी केली. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाला पहिल्या डावात अवघ्या २७५ धावा करण्यात यश आले होते. इंग्लंड संघाकडून रॉरी बर्न्सयाने सर्वाधिक १३२ धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने १६ चौकार आणि १ षटकार लगावला होता.
त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने ६ बाद १६९ धावा करत डाव घोषित केला होता. तसेच पहिल्या डावातील १०३ धावांच्या आघाडीसह इंग्लंडला २७३ धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला पाचव्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ बाद १७० धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी चॅम्पियनशीप फायनलपूर्वी केन विलियम्सनने भारतीय संघाबद्दल ‘असे’ व्यक्तव्य करुन जिंकली मने
व्हिंटेज धोनी! सीएसकेने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस