२ एप्रिल २०११, या तारखेचं इतिहासातील महत्व काय? असा प्रश्न विचारला गेला तर याचे उत्तर कोणालाही सांगता यायचं नाही. इतकच काय गुगल करण्याची तसदीही कोणी घ्यायचं नाही. मात्र, भारतीय क्रिकेटचा इतिहासाशी या तारखेचा संबंध काय? असा दुसरा प्रश्न विचारला की उत्तर देण्याऐवजी, निबंध लिहिले जातील. कारण, क्रिकेटप्रेमींच्या दोन पिढ्यांचे स्वप्न या दिवशी पूर्ण झाले होते. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एमएस धोनीने उत्तुंग षटकार मारत, तब्बल २८ वर्षानंतर टीम इंडियाला वनडे वर्ल्डकप जिंकून दिला होता. मात्र, टीम इंडियाने जिंकलेल्या या वर्ल्डकपची बीजे कोठेतरी १०-१२ वर्षांपूर्वीच रोवली गेली होती. आणि ही बीजे रोवणारा व्यक्ती होता सौरव गांगुली. टीम इंडियाचा माजी कर्णधार.
गांगुली २००८ ला रिटायर झाला आणि टीम इंडियाने २०११ ला वर्ल्डकप जिंकला. मग या दोन्ही घटनांचा संबंध काय? असा प्रश्न पडू शकतो. मात्र, गांगुलीने दहा वर्षांपूर्वी असे काही हिरे शोधले नसते तर, टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकताना पहायला, अजूनही आपल्याला प्रतीक्षाच करावी लागले असती. गांगुली आणि भारताचा विश्वविजय यांचा सहसंबंध सांगणारा हा लेख…
१९९९ मध्ये मॅच फिक्सिंगचा वादळात सापडलेल्या टीम इंडियाला बाहेर काढायची जबाबदारी, नव्याने कर्णधार झालेल्या सौरव गांगुलीच्या खांद्यावर होती. अझर आणि अजय जडेजा मॅच फिक्सिंग प्रकरणात सापडले. त्यानंतर कॅप्टन बनलेल्या सचिन तेंडुलकरला ही जबाबदारी पेलवली नाही. त्याने राजीनामा दिल्यावर गांगुली कॅप्टन बनलेला. भारतीय क्रिकेटची नवी ओळख निर्माण करायचं आव्हान खरं तर त्याच्यापुढे होतं. हे आव्हान घेताना, आपण कसे पुढे जाऊ हे गांगुलीला माहित होतं. भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर न्यायचे म्हटलं तर नवे स्टार लागतील, हे त्याने मनाशी पक्क केलेलं.
अशाच टीम इंडियात एन्ट्री झाली दिल्लीच्या वीरेंद्र सेहवागची. त्याची बॅटिंगची आक्रमक स्टाईल साऱ्यांना आवडली. पण त्याच्यात सातत्य नव्हतं. चला तो चांद तक नही तो शाम तक अशी परिस्थिती. सुरुवातीला फेल होऊन सेहवाग टीम इंडिया बाहेरही गेला. डोमेस्टिक गाजवून त्यानं कमबॅक केलं. तरी त्याची लोअर मिडल ऑर्डरची जागा काही बदलली नाही. अशात कॅप्टन गांगुलीन एक मोठा निर्णय घेतला. स्वतःची ओपनिंगची जागा त्यान सेहवागला देऊ केली आणि त्यानंतर जे काही घडलं तो केवळ इतिहास. जेव्हा-केव्हा टीम इंडियाची ऑल टाईम बेस्ट इलेव्हन निवडली जाईल तेव्हा, ओपनर म्हणून सुनील गावस्कर यांच्यासोबत दुसरे नाव असेल वीरेंद्र सेहवाग. कारण फक्त एकच सौरव गांगुली.
१९९९-२००० मध्ये डोमेस्टिक क्रिकेटमध्ये एक नाव सर्वांच्या तोंडी होते ते म्हणजे युवराज सिंग. १८-१९ वर्षाचा हे पोरगं असं काही बॅटिंग करत की, फक्त पाहातच बसावं असं वाटतं, असेच सारेजण म्हणत. त्यात मोहम्मद कैफच्या नेतृत्वात २००० मध्ये इंडियाच्या पोरांनी अंडर नाईन्टीन वर्ल्डकप जिंकला. त्यातही हा युवराज होता. त्याला सरळ टीम इंडियात एन्ट्री मिळाली. एखाद-दोन मॅच सोडून तो फ्लॉप व्हायला लागला. अनेकांनी म्हटले, याला खेळवायची घाई केली. सिलेक्शन कमिटीतही मतभेद होते. फक्त एका व्यक्तीला युवराज आणि युवराजच्या टॅलेंटवर पूर्ण भरोसा होता. ती व्यक्ती होती दस्तुरखुद्द टीम इंडियाचा कॅप्टन सौरव गांगुली. युवराजला त्याने इतपत सांगितले होतं की, बाहेर जग काहीही म्हणो, जोपर्यंत हा सौरव गांगुली टीम इंडियाचा कॅप्टन आहे, तोपर्यंत तुला संघातून कोणीही बाहेर काढू शकत नाही. हाच विश्वास भारतीय क्रिकेटला ‘युवराज’ देऊन गेला. आणि या युवराजने मग २००७ टी२० वर्ल्डकप आणि २०११ वनडे वर्ल्डकप जिंकवून देत, त्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचे काम केले.
त्याचवेळी स्पिन डिपार्टमेंटमध्ये पंजाबचाच हरभजन सिंग आलेला. उंचापुरा आणि बोटात जादू असावी असा ऑफ स्पिन करणारा. सेहवाग आणि युवराजसारख त्याचंही फर्स्ट इम्प्रेशन डाऊन. त्यात त्यानं एनसीएत राडा घातलेला. २००१ ला स्टीव्ह वॉची जगज्जेती ऑस्ट्रेलिया, इंडिया टूरवर येणार होती. अनिल कुंबळे इंजर्ड होता. मग स्पिनर म्हणून हरभजनला चान्स द्यावं, असं गांगुलीच्या मनात होत. या महत्त्वाच्या सिरीजच्या सिलेक्शनसाठी गांगुलीला मिटींगला बोलावलेल. सगळी टीम सिलेक्ट झाली आणि एका स्पिनरच्या जागेसाठी घोडं अडून बसलं. गांगुलीने हरभजनच नाव घेतलं आणि सिलेक्टर्सनी स्पष्ट नकार दिला. इथेच गांगुलीने दादागिरी केली. या लिस्टमध्ये हरभजनचं नाव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत, मी या रूममधून काही बाहेर जात नसतो, असा इशारा त्याने दिला. शेवटी सिलेक्शन कमिटी झुकली आणि हरभजन टीम इंडियात आला. वॉच्या कांगारू सेनेचे गर्वहरण करण्याची जबाबदारी हरभजनने उचलली. फक्त ३ मॅचमध्ये ३४ विकेट घेत त्याने गांगुलीला आपल्यावर गर्व वाटावा अशी कामगिरी करून दाखवली. आज अनिल कुंबळेनंतर, याच हरभजनच नाव भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम स्पिनर म्हणून घेतलं जात.
ज्या धोनीने भारतीय क्रिकेटला सारे सोन्याचे क्षण दाखवले, तो धोनी आज रांचीत कुठेतरी क्रिकेट खेळत असता किंवा एखादी नोकरी करत असता. जर गांगुलीला त्याच्यावर विश्वास नसता. पहिल्या चार मॅचमध्ये फक्त २२ रन्स करणाऱ्या धोनीसाठी, गांगुलीने आपली तीन नंबरची जागा सोडली आणि इतिहास घडला. आधी फलंदाज आणि नंतर कर्णधार म्हणून यशानं धोनीच्या पायाशी लोटांगण घातलं. पण धोनीसारख्या हिऱ्याला, गांगुली नावाच्या जोहर्याने पारखल नसतं तर, ही गोष्ट अशक्य होती.
महाराष्ट्राच्या श्रीरामपूरमधून आलेला जहीर खान, यूपीच्या गाजियाबादचा सुरेश रैना, बडोद्याचा इरफान पठाण, दिल्लीचा आशिष नेहरा ही सारी गांगुलीने घडवलेली पिढी. या साऱ्यांनीच २०११ मध्ये १२० कोटी भारतीयांचं वर्ल्डकपच स्वप्न पूर्ण केलं. मात्र यांना घडवणाऱ्या गांगुलीला त्या वर्ल्डकपच क्रेडिट न देणे म्हणजे कृतघ्नता ठरेल. आपण सहज बोलताना बोलून जातो की, तो त्या गोष्टीतील बाप आहे. मात्र बापाचा ही बाप म्हणजे ‘दादा’ त्यापेक्षा मोठा असतो आणि भारतीय क्रिकेटमध्ये तो दादा फक्त सौरव गांगुली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रिषभ पंतच्या येण्याने ‘या’ स्टार सलामीवीराची जागा धोक्यात! दुसऱ्या टी२०त करू शकतो ओपनिंग
विराट अन् रोहितमध्ये रंगणार वरचढ ठरण्याची जंग! कोण बनणार खास ‘त्रिशतका’चा पहिला मानकरी?
भारत का इंग्लंड? दुसऱ्या टी२० सामन्यात खेळपट्टी कोणाला मदत करणार, वाचा एका क्लिकवर