जगातली सर्वात ग्रॅंड टी२० लीग असलेल्या आयपीएलमध्ये काही प्लेयर एकदम गुमनामीच्या अंधारातून बाहेर येत, जगभरात आपल्या नावाचा डंका वाजवतात. काहींना या लीगमधून प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा हे सर्व काही मिळते, तर काहींच्या वाट्याला येते हेटाळणी, नव्या भाषेत सांगायचे झाले तर ट्रोलिंग.
अनेकदा प्लेअर्सला त्यांच्या परफॉर्मन्सवरून चिडवले जाते. त्यांचे मिम्स बनवून वायरल केले जातात. आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात सर्वाधिक ट्रोलिंग कोणाच्या वाट्याला आली असेल तर, क्रिकेटप्रेमी एक नाव एकमुखाने घेतील ते अशोक डिंडाचे.. डिंडा आयपीएलमध्ये फक्त मारच खातो, अशीच त्याची निगेटिव्ह पब्लिसिटी केली. मात्र, याच डिंंडाची एकूणच स्टोरी एकदम ऐकण्यासारखी आहे.
सन २००८ला जेव्हा आयपीएल सुरू झाली, तेव्हा सर्वात फेमस आणि मजबूत टीम वाटत होती केकेआर. एक तर किंग खान शाहरुखसारखा सुपरस्टार मालक. तीन-तीन वर्ल्डकप जिंकून देणारे जॉन बुकाननसारखे कोच. आणि त्यानंतर एक से बढकर एक सुपरस्टार क्रिकेटर. सौरव गांगुली, रिकी पॉंटिंग, ब्रेंडन मॅकलम, शोएब अख्तर, ईशांत शर्मा, अजित आगरकर अशी लिस्ट संपतच नव्हती.
हेही पाहा- कितीही ट्रोल केला तरी पॉंटिंगला भावला म्हणून डिंडा भारतासाठी खेळला
त्यावेळी, टीममध्ये इतकेच प्लेअर असावेत असा काही नियम नव्हता. अशातच, जवळपास महिनाभर आधी कोलकात्यात केकेआरचा पहिला कॅम्प लागलेला. या कॅम्पमध्ये मेन टीम सोबतच, बंगालसाठी खेळणाऱ्या काही प्लेअर्सला बोलावलेले. त्यांना आधीच सांगून ठेवलेले की, तुम्ही चांगला परफॉर्मन्स केला आणि टीम मॅनेजमेंटला इम्प्रेस केलं तर, केकेआरसाठी तुम्हाला खेळायला मिळेल.
त्या कॅम्पसाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने जॉय भट्टाचार्य, वृद्धिमान साहा, लक्ष्मीरतन शुक्ला व अशोक डिंडा यांना पाठवले. ‘परफॉर्मन्स करा अन् चान्स मिळवा’ ही गोष्ट डिंडाच्या डोक्यात एकदम फिट बसली आणि तो बॉलिंग मार्कवर आला.
त्यावेळी २४ वर्षाचा असणाऱ्या डिंडासमोर नेटमध्ये पहिल्यांदा बॅटींग करायला आला तुफानी ब्रेंडन मॅकलम. डिंडाने अर्जुनाने माश्याच्या डोळ्यावर नेम धरावा तसा, दोन वेळा मॅकलमचा बोल्ड उडवला. मॅकलमला बॉलिंग केल्यानंतर त्याच्यासमोर दस्तुरखुद्द रिकी पॉंटिंग उभा ठाकला. डिंडाने कसलाच प्रेशर घेतला नाही आणि त्यालाही दोन वेळा आऊट केले. एवढ्यावरच न थांबता काही बाउन्सरदेखील त्याने पॉंटिंगला मारले. पॉंटिंग थोडासा रागवला आणि काहीतरी पुटपुटला. डिंडाला ते समजले नाही आणि त्याने आणखी बाउन्सर मारले. पॉंटिंग मनातल्या मनात खुश झाला.
डिंडा डेव्हिड हसीला बॉलिंग करत असताना बुकानन, गांगुली, पॉंटिंग व मॅकलम ही सर्व मंडळी त्याची बॉलिंग पाहत होती. त्यावेळी, लक्ष्मीरतन शुक्लाने त्याच्या कानात येऊन सांगितले, “असेच बॉल टाक. तुझं सिलेक्शन जवळजवळ पक्के झालंय.” त्यानंतर तो आणखी त्वेषाने बॉलिंग करू लागला. मॅनेजमेंटने त्याला काही प्रॅक्टिस मॅच खेळण्यासाठी टीममध्ये बोलावले. पठ्ठ्याने तिथेही हवा केली. लवकरच त्याला तो आयपीएल खेळत असल्याची गुड न्यूज मिळाली.
आयपीएलच्या पहिल्याच मॅचला त्याला डेब्यू करायची संधी मिळाली. तो ऐतिहासिक सामना फक्त ब्रेंडन मॅकलमचा होता. त्याची ती १५८ रनांची इनिंग कोण विसरणार?, पण दुसऱ्या बाजूला त्याच मॅचमध्ये बॉलिंग करताना डिंडाने ३ ओव्हर टाकत, वसीम जाफर आणि विराट कोहलीच्या विकेट घेताना रन्स दिलेले फक्त सात. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण पहिल्या सीझनला तो १० मॅच खेळला आणि त्याचा इकॉनॉमी रेट होता ६.६६ होय ६.६६.
डिंडा फॉर्ममध्ये होता आणि त्याला वर्षभरात टीम इंडियात जागा मिळाली. डिंडा आपल्या करिअरमध्ये खूप ट्रोल झाला. त्याच्या ओव्हर्समध्ये जास्त रन जातात म्हणून त्याच्यावर नेहमी टीका व्हायची. एखाद्या बॉलरने जास्त रन्स दिले की, त्याला डिंडा अकॅडमीचा मेंबर म्हणले जाते, पण या गोष्टीची रिऍलिटी काही वेगळीच आहे. त्याच्या वनडे करिअरमध्ये त्याची इकॉनॉमी होती ६.१८ आणि टी२० मध्ये ८.२०. ज्या आयपीएलने खरंतर त्याला बदनाम केलं त्या आयपीएलमध्येही त्याचा इकॉनॉमी रेट आत्ताचा टॉप बॉलर मोहम्मद शमीपेक्षा कितीतरी चांगला आहे.
डिंडाचं इंटरनॅशनल करिअर लहान राहिलं. फक्त २५ मॅचच, पण आयपीएलमध्ये केकेआर, आरसीबी, दिल्ली आणि पुण्याच्या दोन्ही टीमसाठी तो खेळला. तब्बल १४ वर्ष बंगालसाठी डोमेस्टिक क्रिकेट खेळून २०२० मध्ये गोव्यासाठी खेळत त्याने क्रिकेटला रामराम केला.
क्रिकेट सोडताच त्याने दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली. कदाचित या इनिंगसाठीच त्याने क्रिकेट सोडल असावं. ही इनिंग होती राजकारणाच्या पिचवरील. पश्चिम बंगालच्या मोयना मतदारसंघातून त्याने भारतीय जनता पक्षासाठी, आमदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकलीही. ३८ व्या वर्षीच तो सक्रिय राजकारणात सामील झाल्याने, त्याला इथे मात्र मोठी इनिंग खेळायची सुवर्णसंधी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ एका निर्णयाने जडेजासह मुंबई इंडियन्स आलेली गोत्यात
काव्या मारन ते प्रीती झिंटा, ‘या’ आहेत ग्लॅमरचा तडका लावणाऱ्या आयपीएल संघांच्या मालकीणबाई
जेव्हा तुटला होता ‘कॅप्टन कूल’ धोनीच्याही संयमाचा बांध, भलताच झालेला ‘अँग्री यंग मॅन’