ही गोष्ट आहे अशा भारतीय गोलंदाजाची, ज्याने 18व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, तेव्हा कोणालाच काय त्याला स्वत:लाही कधी वाटले नसेल की, तो 100 पेक्षाही अधिक कसोटी सामने खेळेल. एक दिवस तो भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असेल. रिकी पाँटिंग, स्टिव्ह स्मिथ, ऍलिस्टर कूक अशा अनेक दिग्गजांना तो नडेल, पण त्याच्या बाबतीत हे सर्व घडत गेले. तो खेळाडू म्हणजे इशांत शर्मा. इशांत आज (2 सप्टेंबर) आपला 36वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याच्या कारकीर्दीवर टाकलेली नजर…
दिनांक 2 सप्टेंबर 1988 ला दिल्लीमध्ये जन्मलेल्या इशांत शर्मा (Ishant Sharma) याला वडीलांप्रमाणेच क्रिकेटची आवड होती. ते शिक्षण घेत असताना क्रिकेट खेळायचेही. इशांतने 14 व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याने जवळ असणाऱ्या क्रिकेट अकादमीत श्रवण कुमार यांच्याकडून सुरुवातीला मार्गदर्शन घेतले. त्यांच्याकडे सराव करताना इशांत सांगतो तो दुपारी गोलंदाजी टाकायला सुरुवात करायचा ते संध्याकाळ होईपर्यंत तो सराव करत राहयचा. याचमुळे त्याला लाँग स्पेल टाकण्याची सवय लागली. इशांत त्यावेळी त्याचे शूज शिवून शिवून 2-2 वर्षेही वापरायचा. इशांतने लवकरच त्याच्या क्रिकेटमध्ये प्रगती केली.
या दरम्यान बऱ्याचदा त्याला शाळेत असताना क्रिकेट सरावामुळे संघर्ष करावा लागला. त्यात त्याला लहानपणापासून लांब केस ठेवण्याची आवड. त्यामागे कारण असं की लहानपणी डब्ल्यूडब्यूएफ पहाण्याची त्याला भारी आवड. त्यामुळे तो डब्ल्यूडब्ल्यूएफमधील खेळाडूंची नावे उशांवर लिहून खेळायचा. त्याचा हा खेळ पाहून त्याला अनेकदा मार खावा लागला ही गोष्ट वेगळी सांगायला नको. त्यात लांब केसांमुळे शाळेतही त्याला वर्गाबाहेर उभे राहावे लागायचे. पण तरीही त्याने कितीही झाले तरी केस काही कापले नाही. एकदा तर 19 वर्षांखालील भारतीय संघाकडून खेळत असताना प्रशिक्षक असणाऱ्या लालचंद राजपूत यांनीही त्याला केस कापण्यास सांगितले होते, नाहीतर ते दंड आकारणार होते. यावर इशांतने सांगून टाकले होते मी दंड भरतो पण मी केस कापणार नाही. इशांत तसा लहानपणी अभ्यासात ठिकठाकच होता. बऱ्याचदा तो त्याचे क्लासेसही बंक करायचा. त्याला एकदा क्लासेस बंक केले असताना त्याच्या आईने पकडले आणि घरी आल्यावर चांगला चोपही दिला. असे असले तरी इशांतची क्रिकेटमधील प्रगती भराभर होत होती. पण त्यावेळी इशांतने अन्य सर्वांप्रमाणेच रणजी खेळली की नोकरी मिळेल असा सर्वांसारखाच विचार केला होता. कधी त्याला भारताकडून खेळायला मिळेल असे वाटले नव्हते.
त्याचा 2006 ला 19 वर्षांखालील भारतीय संघाने केलेल्या इंग्लंड दौऱ्यात समावेश होता. विशेष म्हणजे, त्याने 19 वर्षांखालील वनडे आणि कसोटी पदार्पण विराट कोहली बरोबर केले आहे. तसेच, विराट आणि इशांतच्या बाबतीत आणखी एक खास गोष्ट म्हणजे 2006 मध्येच या दोघांचेही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पण एकाच सामन्यातून आणि एकाच संघातून म्हणजेच दिल्ली संघाकडून झाले आहे. पहिल्याच सामन्यात त्याने 4 विकेट्स घेतल्या. त्याची आणि भारताचा कर्णधार विराटची मैत्री तेव्हापासूनचीच. त्या दोघांनी सुरुवातीपासूनच एकत्र अनेक सामने खेळले.
इशांतने 2006-07 च्या रणजी मोसमात 7 सामन्यात 29 विकेट्स काढल्या. त्याला काही दिवसातच भारताच्या वरिष्ठ संघातही संधी मिळाली. तो मे 2007 ला दुखापतग्रस्त मुनाफ पटेलच्या ऐवजी बांगलादेश दौऱ्यात कसोटी मालिकेत खेळला. विशेष म्हणजे त्यावेळी संघात राहुल द्रविड, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण असे दिग्गज खेळाडू होते. त्याचा पदार्पणाच्या वेळीचा किस्सा असा की तो बांगलादेशला पोहचला तेव्हा त्याची किटबॅगच हरवली. त्यामुळे इशांत त्याचा पदार्पणाचा सामना झहीर खानचे शूज घालून खेळला. या सामन्यात इशांतला केवळ 1 विकेट घेता आली. या सामन्यातनंतर काही महिने त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. नंतर त्याची निवड पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी झहीर दुखापतग्रस्त झाल्याने झाली. त्यानंतर त्याने 2008 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही संघात संधी मिळवली. त्याच मालिकेत पर्थ कसोटीत त्याने त्यावेळीचा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगला चांगलेच सतावले होते. त्याने त्यावेळी पाँटिंगची महत्त्वपूर्ण विकेटही घेतली होती.
त्यानंतर मात्र इशांत भारतीय कसोटी संघात स्थिरावला. एव्हाना त्याने वनडेतही पदार्पण करत त्या संघातही जागा निश्चित केली होती. इशांतने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सर्वोत्तम कामगिरी 2008 ला ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आली असताना केली. त्याने 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 15 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला कारकिर्दीतील पहिला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. त्यावेळीचा गमतीचा किस्सा असा की इशांतला तेव्हा वाटायचे की मालिकावीरापेक्षा सामनावीराचा पुरस्कार मोठा असतो आणि त्याला त्या मालिकेत एकही सामनावीर पुरस्कार मिळाला नव्हता. त्यावेळी त्याने भारताचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना मालिकावीर पुरस्काराबद्दल विचारले होते. तेव्हा त्यांनी त्याला समजावले होते, अरे मालिकावीर पुरस्कार सामनावीर पुरस्कारापेक्षा महत्त्वाचा आहे.
त्यावेळीचीच गोष्ट नवीन नवीन असताना इशांतला रोख रक्कम बक्षीस मिळाल्याने आणि तेव्हा क्रेडिट, डेबिट कार्ट असल्या गोष्टी माहित नसल्याने एवढ्या पैशांचे करायचे काय म्हणून त्याने थेट 40-42 हजारांचे स्पिकर्स खरेदी केले होते. इशांतची सुरुवातीला बॅटिंग काही बरी नव्हती. पण कर्स्टन यांनी त्याला त्याच्या बॅटिंगवरही मेहनत करायला लावली. त्यांचे म्हणणे होते की इशांत तळातल्या फळीत गरज लागेल तेव्हा चांगली फलंदाजी करु शकतो. त्याचाच परिणाम काही दिवसांनंतर लेगचच दिसला. २०१० ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोहाली येथे चौथ्या डावात 216 धावांचा पाठलाग करताना भारत 128 धावांवर 8 बाद अशा वाईट अवस्थेत होता. इशांतने दुखापतग्रस्त व्हीव्हीएस लक्ष्मणबरोबर 9 व्या विकेटसाठी तब्बल 81 धावांची भागीदारी केली होती. त्यावेळी लक्ष्मणने दुखापतीमुळे पळता येईना म्हणून सुरेश रैनाला रनर म्हणून घेतले होते. त्यावेळी इशांतने तब्बल 92 चेंडू खेळताना 31 धावा केल्या होत्या. तेव्हा इशांतने लक्ष्मण फक्त एवढे सांगितले होते की तू मिशेल जॉन्सनच सामना कर बाकी मी सांभाळू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात यशस्वी धावांचा पाठलाग करताना 9व्या विकेटसाठी केलेली ही सर्वाधिक धावांची भागिदारी आहे. इशांत तेव्हा जेमतेत 21 वर्षांचा होता. तशी तेव्हापेक्षा इशांतची आत्ता फलंदाजीतील कामगिरी बऱ्यापैकी सुधारली. 2 वर्षांपूर्वी त्याने पहिले कसोटी अर्धशतकही केले होते.
असो, पुढे इशांत कसोटीतच नव्हे तर वनडेमध्येही चांगली कामगिरी करत होता. मात्र त्याला 2011 च्या विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यात 2012 ला त्याच्या घोट्याची शस्त्रक्रिया झाली. त्यावेळीची गोष्ट अशी की इशांतने त्या काळात एक कुत्र्याचे पिल्लू घरी आणले होते. त्यामुळे त्याला या दुखापतीतून सावरताना फार मदत झाली होती. त्याचा वेळ चांगला जात होता आणि महत्त्वाचे म्हणजे त्याची मानसिकता चांगली राहत होती.
इशांतने या दुखापतीनंतर पुन्हा भारतीय संघात पुनरागमन केले. त्याने 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थानही मिळवले. त्या स्पर्धेत त्याने उपांत्य सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 3 विकेट्स घेत भारताला अंतिम सामन्यात पोहचवण्यात मोठा वाटा उचलला होता. मात्र, पावसामुळे 20-20 षटकांचा करण्यात आलेल्या अंतिम सामन्यात इशांतला सुरुवातीच्या काही षटकात इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगलेच धूतले होते. मात्र तरीही धोनीने इशांतवर विश्वास टाकत 18 वे आणि महत्त्वाचे षटक टाकण्यासाठी पुन्हा त्याच्याकडे चेंडू सोपवला. अखेर इशांतनेही हा विश्वास खरा ठरवला. त्याने त्या षटकात 9 धावा देत ओएन मॉर्गन आणि रवी बोपारा या महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताच्या हातात ही मॅच आली होती. तो सामना नंतर भारताने 5 धावांनी जिंकत विजेतेपद मिळवले होते.
मात्र, इशांत त्यानंतर वनडे क्रिकेट जास्त खेळू शकला नसला तरी त्याने 2015 च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवले होते. पण इशांतचे नशीब त्याच्यावर इतके रुसले की विश्वचषकासाठी काही दिवस राहिले असताना तो दुखापतग्रस्त झाला आणि त्याच्याऐवजी मोहित शर्माची भारताच्या संघात वर्णी लागली. 2015 नंतर मात्र इशांतने केवळ 4 वनडे सामने खेळले. असे असले तरी इशांतने नंतर कदाचीत वनडेकडे लक्ष देणे कमी केले आणि कसोटीवर लक्ष केंद्रित केले असावे. कारण इशांतच्या नंतर कसोटी कामगिरीत झालेले बदल अत्यंत चांगले होते. यामागे अनेक कारणेही होती. इशांतने फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती. त्यात त्याला आयपीएलमध्ये कोणीही खरेदी न केल्याने वाईट वाटून न घेता त्याने कौऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने ससेक्सकडून खेळताना चांगली कामगिरी केली. तिथे तो गुडलेंथवर चेंडू टाकायला शिकला.
अनेकांना इशांतची एक चांगली गोष्ट अनेक वर्षांत लक्षात आली नाही. इशांत इतकी वर्षे खेळत आहे पण त्याने कधीही असे म्हटले नाही की मला सगळे काही येते. तो प्रत्येकवेळी वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहिला. आलेल्या अनुभवातून त्याने शिकण्याची संधी गमावली नाही. कदाचित त्याचमुळे तो आजही भारतीय संघात टिकून आहे आणि फक्त टिकून नाही तर आज तो संघात नवीन आलेल्या जसप्रीत बुमराह, शमी अशा खेळाडूंबरोबर तितक्याच उर्जेने खेळतो. तो आज एक परिपक्व खेळाडू झाला आहे. त्याला आज काय करायचे आणि काय नाही हे उमगले आहे. इशांतही ही गोष्ट मान्य करताना कमीपणा मानत नाही. तो स्वत: म्हणतो, मी पूर्वी जरी चांगली कामगिरी केली असली तरी मला आत्ताची कामगिरी महत्त्वाची वाटते. कारण मी पूर्वी काय करत होतो हे मलाही कळायचे नाही, पण मी आत्ता काय करतो हे मला माहित आहे. याबरोबरच आणखी एक गोष्ट त्याच्याबाबतीत मान्य करावी लागेल ती म्हणजे इशांत राहुल द्रविड ते विराट कोहली अशा अनेक कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळला, पण विशेष गोष्ट अशी की यातील सर्वांनी इशांतवर कसोटी क्रिकेटसाठी तरी पूर्ण विश्वास दाखवला आहे, त्यामुळे इशांत आजही भारताकडून खेळताना दिसतो.
इशांतमध्ये झालेल्या सुधाणांमध्ये कदाचित थोडाफार का होईना पण त्याच्या पत्नी प्रतिमाचाही वाटा असावा. प्रतिमा आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू आहे. बास्केटबॉलच्या एका स्पर्धेदरम्यानच 2011 मध्ये त्यांची ओळख झाली होती. त्यावेळी तिला क्रिकेटला फार महत्त्व मिळत असल्याने क्रिकेटपटूंचा तिरस्कार होता. पण हळूहळू इशांतबद्दल माहिती होत गेल्याने त्यांचे सुर जुळले. इशांत आणि प्रतिमा 9 डिसेंबर 2016 ला विवाह बंधनात अडकले होते.
इशांत तसा मैदानावर फार काही शांत खेळाडू नाही. आत्ताच्या भारताच्या युवा खेळाडूंप्रमाणे त्यालाही जशास तसे उत्तर द्यायला आवडते. तोही स्लेजिंग करण्यात कमी नाही. ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथविरुद्ध तर त्याने वेगवेगळे हावभाव करत केलेल्या स्लेजिंगमुळे तर अनेक मीम्सही तयार झाले. इशांत आणि इंग्लंडच्या सर ऍलिस्टर कूकची तर वेगळीच कहानी आहे. कूक दिग्गज खेळाडू पण त्याला इशांतने कसोटीत तब्बल 11 वेळा बाद केले आहे आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे कूकने 161 कसोटी सामन्यात केवळ 1 विकेट घेतली असून ती विकेट इशांतची आहे. याबद्दल कूक असेही म्हणतो, मी इशांतची विकेट घेतली त्याला बदला त्याने मला 11 बाद करत घेतला आहे.
Alastair Cook to Ishant Sharma, 50mph (est)
via @Peter_Davidson1
— Cricket’s great moments (@PitchedInLine) August 16, 2019
तब्बल 6 फूट 4 इंच उंची असलेल्याने लंबू हे टोपननाव पडलेल्या इशांतच्या यशात झहीरचाही वाटा आहे. झहिरकडून इशांतने गोलंदाजीच्या अनेक गोष्टी शिकल्या. त्याच्यावर अनेकदा टिका झाली. लोकांनी अनेकदा ट्रोल केले. याला संघात का घेतात असेही त्याला ऐकावे लागले. पण तरीही इशांत सर्वांना पुरुन उरला.
हेही वाचा-
‘लंबू’ने ताशी 152.2च्या गतीने फेकलेला कारकीर्दीतील वेगवान चेंडू, वाचा इशांतबद्दल माहीत नसलेल्या 10 गोष्टी
मराठीत माहिती- क्रिकेटर इशांत शर्मा
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज अनिल कुंबळे
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण