-प्रणाली कोद्रे
इच्छा असते तिथे मार्गही असतो ही उक्ती भारताच्या एका क्रिकेटपटू बाबतीत अगदी चपखल बसते. १९९६ ला विश्वचषकात सचिन तेंडुलकरला पाहून त्याच्याबरोबरच क्रिकेट खेळण्याचे स्वप्न त्याने पाहिले आणि तिथून सुरु झाला त्याचा एक क्रिकेटपटू बनण्याचा प्रवास. तो क्रिकेटपटू म्हणजे रुद्रप्रताप सिंग अर्थात आरपी सिंग.
६ डिसेंबर १९८५ ला रायबरेली या गावात आरपीचा जन्म झाला. त्याचे वडील नोकरी करत होते. त्याच्या पालकांनाही वाटायचे त्यानेही सर्व सामान्य मुलांप्रमाणे शिक्षण पूर्ण करुन एखादी नोकरी वगैरे करावी. पण लहानपणापासूनच क्रिकेटची आवड लागलेल्या आरपीला क्रिकेटमध्येच काहीतरी करुन दाखवायचे होते. त्याने घराजवळील मैदानात टेनिस बॉलने क्रिकेटही खेळायला सुरुवात केली. त्यावेळी ज्याच्याकडे बॅट होती त्याला बाकीच्यांनी गोलंदाजी करायची असे होते. त्यामुळे आरपीला नेहमी गोलंदाजी मिळायची. काही वर्षाने तो लखनऊला गोलंदाज म्हणून ट्रायल द्यायलाही मित्राबरोबर गेला. त्यावेळी तो घरच्यांना न सांगता आणि ट्रेनचे तिकीट न काढता गेला होता. तिथे त्याने ट्रायल दिली आणि तो घरी आला. त्यानंतर महिन्याभराच्या अंतराने त्याची त्या ट्रायलमध्ये निवड झाली असल्याचे पत्र आले. ते पत्र आरपीने घरचे ओरडतील म्हणून फाडून टाकले. पण ही गोष्ट त्याला टोचायला लागली होती. त्याने पालकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी त्याचे ऐकले नाही. तो कानपूरलाही ट्रायल द्यायला गेला. पण तिथे त्याच्याकडे शूज नसल्याने त्याची निवड झाली नाही. अखेर आरपीने घर सोडून लखनऊला जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळी त्याने घरच्यांना सांगितले की तो काहीतरी चांगले करुन येईल किंवा आहे तसाच राहिल पण कोणतीही चूकीची सवय लावून घेणार नाही.
तो नंतर लखनऊला स्पोर्ट्स हॉस्टेलला गेला. तिथे त्याच्या क्रिकेटला वळण मिळायला सुरुवात झाली. तिथे तो १९ वर्षांखालील संघातही खेळला. त्यावेळी त्याने काहीतरी वेगळे करायचे म्हणून आऊटस्विंग टाकण्याचा प्रयत्न केला मात्र या प्रयत्नात तो त्याची ताकद असणारी इनस्विंग गोलंदाजी विसरायला लागला. परिणामी त्याने निराश होऊन पुन्हा शिक्षणाकडे लक्ष देण्याचा विचार केला. त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला समजावले की तू चांगली गोलंदाजी करु शकतो. त्यांचे ऐकून आरपी ६-६ तास सराव करायला लागला. यादरम्यान त्याला एमआरफकडूनही ट्रायलसाठी बोलावणे आले होते. पण त्याची तिथे निवड झाली नाही. पण या दरम्यान तो जे सामने खेळला, त्यात त्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याची १९ वर्षांखालील भारतीय संघात निवड झाली. २००४ चा १९ वर्षांखालील विश्वचषक तो खेळला. त्या संघात अंबाती रायडू, सुरेश रैना, शिखर धवन, दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा हे खेळाडू देखील होते, ज्यांनी पुढे जाऊन वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळवले. त्या विश्वचषकात आरपीची कामगिरी शानदार राहिली. त्याने २४.७५ च्या सरासरीने ८ विकेट्स घेतल्या. त्या वर्षी आरपीची देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी झाली. तो २००४-०५ च्या रणजी मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला. त्याने ६ सामन्यात ३४ विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीने त्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. Story of RP Singh.
त्याच काळात ग्रेग चॅपेल भारताचे प्रशिक्षक होते. त्यांनी संघात युवा खेळाडूंना अधिक संधी देण्यास सुरुवात केली होती. त्याला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी २००५ मध्ये भारतीय संघात झहिर खानऐवजी संधी मिळाली. त्याने पहिल्याच सामन्यात २ विकेट्स घेत सर्वांना प्रभावित केले. त्यानंतर त्याने त्याच्या कारकिर्दीतील तिसराच वनडे सामना खेळताना राजकोट येथे श्रीलंकेविरुद्ध ३५ धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि सामनावीराचा पुरस्कारही मिळवला.
त्यानंतर २ महिन्यांनी २००६ ला त्याने पाकिस्तान दौऱ्यात फैसलाबाद कसोटीतून कसोटी पदार्पण केले. त्याने पहिल्याच कसोटी सामन्यात ५ विकेट्स घेतल्या. त्याला या सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. त्याच दौऱ्यात त्याने मुलतानला झालेल्या वनडे सामन्यात ४ विकेट्स घेत भारताला वनडे मालिकेत विजयी आघाडी घेऊन देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यावेळी अखेर आरपीने त्याचे सचिन बरोबर क्रिकेट खेळण्याचे स्वप्नही पूर्ण केले होते. अनेकांना आरपी हा धोनीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला असे वाटते. पण आरपीच्या बाबतीत खास गोष्ट म्हणजे त्याचे वनडे पदार्पण गांगुलीच्या नेतृत्वाखाली, तर कसोटी पदार्पण द्रविडच्या नेतृत्वाखाली झाले. तसेच आरपीने त्याच्या कारकिर्दीतील केवळ १ कसोटी सामना धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. आरपीने आर्धी कारकिर्द गांगुली, द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखाली खेळली. विशेष म्हणजे आरपीने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडे, कसोटी, टी२० पदार्पण तीन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली केले आहे.
असो, २००७ विश्वचषकाच्या आधी भारतीय संघात झहिर खानने पुनरागमन केल्याने आरपीला संधी मिळाली नाही. पण त्याची २००७ च्या टी२० विश्वचषकात निवड झाली. या संधीचे सोने करत त्याने त्या विश्वचषकात १२ विकेट्स घेतल्या. यातील ४ विकेट्स त्याने यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घेतल्या. त्याच्या या कामगिरीने भारताला या विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. मात्र आरपी या विश्वचषकानंतर केवळ ३ टी२० सामने भारताकडून खेळू शकला. २००७ लाच त्याने लॉर्ड्स कसोटीत ७ विकेट्स घेतल्या. यातील ५ विकेट्स त्याने एका डावात घेतल्याने ऑनर बोर्डवर नाव कोरले. त्यानंतर त्याने २००८ ला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही चांगली कामगिरी केली. परंतू २००८-०९ नंतर आरपीला विकेट्स घेण्यात अपयश येऊ लागले. त्यामुळे कसोटी, वनडे संघातील स्थान त्याने गमावले. पण आरपीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणे सुरु ठेवले.
त्यानंतर त्याला २-३ वर्षांनी २०११ ला इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात दुखापतग्रस्त झहिर खानच्या अनुपस्थित संधी मिळाली. हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा दौरा ठरला. त्याचे हे पुनरागमन इतके खराब ठरले की तो अनेकांसाठी टिकेचा धनी ठरला. त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार धोनी त्याच्या संघातील निवडीसाठी आग्रही राहिल्याने त्याच्यावरही टिका झाली होती. त्यावेळी दौऱ्याआधी आरपी यूएसला सुट्ट्यांसाठी गेला होता. त्यानंतर अचानक त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी बोलवणे आले होते. त्याने या दौऱ्यात खेळलेल्या एकमेव कसोटी सामन्यात विकेट घेतली नाही. तसेच वनडे मालिकेत त्याला केवळ १ विकेट घेता आली. नंतर आरपीची कामगिरी खालवल्याने आणि संघात अन्य वेगवान गोलंदाजांनी प्रतिभा दाखवल्याने आरपीची भारतीय संघातून गच्छंती झाली. त्यावेळी आरपी केवळ २५ वर्षांचा होता. पण यानंतरही तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत राहिला. तसेच त्याने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली. परंतू तोपर्यंत त्याला भारतीय संघात स्थान मिळणे कठीण झाले होते.
तो २००८ ते २०१६ दरम्यान आयपीएलमध्ये ८२ सामने खेळला. यामध्ये त्याने ९० विकेट्स घेतल्या. यादरम्यान २०१३ ला आयपीएलमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंगसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडे सुपुर्त करण्यात आलेल्या मुद्गल रिपोर्टमध्ये आरपीचे नाव आल्याने चर्चा झाली होती. त्याची दिल्ली पोलिसांकडून चौकशीही झाली. पण त्याबाबत काहीही सिद्ध झाले नाही. तसेच त्या रिपोर्टमध्ये असेही म्हटले गेले की रिपोर्टमध्ये खेळाडूंच्या नावांचा समावेश असणे म्हणजे त्यांनी फिक्सिंग केला असा अर्थ होत नाही. दरम्यान २०१२ ला आरपीने देवांशी पोपट हीच्याशी लग्न केले. ती वकिल असून त्याला एका रणजी ट्रॉफी दरम्यान भेटली. तीची आणि आरपीची ओळख त्यांच्या कॉमन मित्रांनी करुन दिली होती. तसेच आरपीने या दरम्यानच्या काळात त्याचे शिक्षण पूर्ण करण्याचीही इच्छा व्यक्त केली होती. त्याला बॅचलर डिग्रीच्या शेवटच्या वर्षाचा १ पेपर द्यायचा बाकी होता. हा पेपर त्याला तो भारतीय संघात आल्याने देता आला नव्हता.
पुढे आरपी २०१५ नंतर गुजरात संघाकडून खेळला. त्याने २०१६-१७ ला गुजरातकडून रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले. त्याने अंतिम सामन्यात मुंबईविरुद्ध ४ विकेट्सही घेतल्या. हा त्याचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील शेवटचा सामना ठरला. त्यानंतर त्याने २०१८ ला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो निवृत्तीनंतर क्रिकेट प्रशासनात आला. काही महिन्यांपूर्वीच त्याची बीसीसीआयच्या सल्लागार समितीत निवड झाली आहे. आरपीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द खूप बहरली नाही. पण त्याने जेवढे वर्षे क्रिकेट खेळले त्यात त्याने सर्वांना लक्षात राहिले अशी कामगिरीही केली. खरंतर एक चांगला डावकरी वेगवान गोलंदाज असूनही त्याला सातत्याने एखाद्या खेळाडूचा बदली खेळाडू म्हणून संघात स्थान मिळत गेले. तो खूप क्वचित संघात प्रमुख गोलंदाज म्हणून खेळला, हेच आरपीच्या कारकिर्दीतील दुर्दैव ठरले.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद
–गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला अजय जडेजा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज अनिल कुंबळे
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण