मथळा वाचून अनेक जण म्हणतील हे कसे शक्य आहे ? टी२० क्रिकेट ज्याप्रकारे खेळले जाते त्यात एकाच दिवशी दोन शतके कशी काय झळकावली जाऊ शकतात ? खरतर, एकच खेळाडू दोन शतके कशी काय करेल ? असे अनेक नानाविध प्रश्न अनेकांसमोर येतील मात्र हे खरे आहे. होय, एकाच फलंदाजाने टी२० मध्ये एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या सामन्यात दोन शतके ठोकली आहेत.
स्पॅनिश फलंदाज तारिक अली अवानने ४ सप्टेंबर २०१२ रोजी युरोपियन टी२० चँपियनशिप विभाग-२ स्पर्धेमध्ये ग्रीसमधील मोसोंगीच्या मैदानावर नाबाद १५० आणि १४८ धावा केल्या होत्या. त्यादिवशी तारिकने एस्टोनियाविरुद्ध ६६ चेंडूंत नाबाद १५० आणि पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यात १४८ धावा केल्या.
दिवसातील पहिल्या सामन्यात स्पेनने एस्टोनियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना, २० षटकांत २१८ धावा फटकावल्या होत्या. सलामीला आलेला तारिकने ६६ चेंडू खेळताना ५ चौकार व १६ षटकारांच्या मदतीने नाबाद १५० धावांचा तडाखा दिला. तारिक व्यतिरिक्त दुसरा सलामीवीर अर्माघन खान याने २८ चेंडूत ३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, एस्टोनियाचा संघ अवघ्या ९३ धावा काढू शकला व १२५ धावांनी सामना हरला.
एस्टोनिया विरुद्ध विजय मिळवल्यानंतर, काही वेळातच स्पेन विरुद्ध पोर्तुगाल सामन्याची घोषणा करण्यात आली. पोर्तुगालचा कर्णधाराने नाणेफेक जिंकत स्पेनला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तारिकने पुन्हा एकदा आपल्या बॅटने विरोधी संघाच्या गोलंदाजांना पाणी पाजले. यावेळी अवघ्या ५५ चेंडूत त्याने १४८ धावांची खेळी केली. यात, ६ चौकार व तब्बल १८ षटकार सामील होते. यावेळी, पोर्तुगीज गोलंदाज जफर अलीने त्याला त्रिफळाचीत केले. तळाच्या फलंदाजांच्या योगदानामुळे स्पेनने २४८ धावा उभारल्या. २४८ धावांचा पाठलाग करताना, बिलाल सफदरच्या ३७ चेंडूतील ८२ धावांमुळे पोर्तुगाल १७३ पर्यंत मजल मारू शकला. स्पेनने एकाच दिवशी दोन दणदणीत विजय साजरे केले.
या दोन विजयानंतर स्पेनला इस्राईलच्या हातून पराभव पत्करावा लागला. मात्र, माल्टा व लक्झेंबर्गला पराभूत करत त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत देखील स्पेनला विजय मिळवण्यात अपयश आले. स्वीडनने शेवटच्या चेंडूवर विजय संपादन केला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत, स्पेनने साखळी सामन्यातील पराभवाचा बदला घेत, ९० धावांनी इस्राईलला पराभूत केले. इसले ऑफ मॅन या छोट्याशा बेटावरील संघाने स्वीडनला पराभूत करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
तारिकपूर्वी, एकाच दिवशी दोन शतके झळकावण्याचा विक्रम भारताचे दिग्गज खेळाडू रणजीतसिंग जी यांच्या नावे आहे. त्यांनी, २२ ऑगस्ट १८९६ रोजी, ससेक्स व यॉर्कशायर यांच्या दरम्यान झालेल्या तीनदिवसीय प्रथमश्रेणी सामन्यात एकाच दिवशी दोन शतके झळकावली होती. यॉर्कशायरने पहिल्या डावात केलेल्या ४०७ धावांंना प्रत्युत्तर देताना, तिसर्या दिवशी रणजितसिंग जींनी शतक झळकावून देखील ससेक्सचा संघ १९१ धावांवर सर्वबाद झाला. ससेक्सला फॉलोऑन मिळाल्याने, दुसऱ्या डावात फलंदाजी करताना रणजीतसिंग जींनी नाबाद १२५ धावा ठोकल्या होत्या. अशाप्रकारे, एकाच दिवशी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावणारे पहिले व एकमेव फलंदाज ठरले.
ट्रेंडिंग लेख –
गावसकरांनी ४३८ धावांचे लक्ष्य जवळपास गाठून दिले होते पण….
पाकिस्तानी दिग्गजाला माकडउड्या मारायला लावणाऱ्या किरण मोरेंची गोष्ट
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे ५ फलंदाज
महत्त्वाच्या बातम्या –
पोलार्ड टी२०चा उत्तम खेळाडू, पण कसोटी क्रिकेट खेळण्यास योग्य नाही, पहा कोण म्हणलंय असं
रिकी पॉन्टिंगने ‘या’ दोन भारतीय क्रिकेटपटूंचे केले तोंडभरुन कौतुक; म्हणाला…
आयपीएल २०२०: सर्व संघांना दिले गेले ब्लूटूथ सक्षम बॅज; सर्व डेटा जाणार बीसीसीआयकडे