न्यूझीलंडच्या संघाने १९८५- ८६ च्या मोसमात प्रथमच ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी मालिकेत २-१ ने हरवले होते. न्यूझीलंडचे महान अष्टपैलू खेळाडू सर रिचर्ड हॅडली हे त्यावर्षी तुफान फॉर्ममध्ये होते. त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांची निवड झाली होती आणि सोबतच सदर मालिकेचे मालिकावीर म्हणून ‘अल्फा रोमियो सलून’ ही कार त्यांना भेटली होती.
त्यावेळी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा (New Zealand Cricket Board) एक नियम होता, की पुरस्कार रूपाने मिळालेली रक्कम ही बोर्डाच्या मदत निधीमध्ये टाकावी लागत.
हॅडली ती गोष्ट सांगताना म्हणतात, “सिडनीच्या मैदानावर पारितोषिक वितरण समारंभात मला गाडीची चावी देण्यात आली अन् सांगण्यात आले, गाडी न्यूझीलंडला पाठवली जाईल. परंतु जेव्हा मी विमानात बसलो तेव्हा मॅनेजर मला म्हणाला, रिचर्ड तुला गाडी विकून ती रक्कम आपल्या बोर्डाला निधी म्हणून द्यावी लागेल.”
“पण मी त्यांना म्हटलो, मला ती कार हवी आहे. दुसरा काही उपाय आहे का? तेव्हा मॅनेजरने मला गाडीची रक्कम जी होईल, ती स्वत: च्या खिशातून टीम फंडमध्ये टाकण्यास सांगितले. ती रक्कम जवळपास ३०- ३५ हजार न्यूझीलंड डॉलर्स इतकी होत होती. परंतु मी कार स्वत:कडे ठेवण्यासाठी सर्व संघाला ‘लेक टोपो रिसॉर्ट’ वर एक आठवडा सुट्टी घालवण्याचा प्रस्ताव मांडला,” असेही ते पुढे म्हणाले.
याच घटनेवर खुलासा करताना तत्कालीन न्यूझीलंड कर्णधार जेरेमी कोनी (Jeremy Coney) आपल्या पुस्तकात म्हणतात, “हॅडलीच्या त्या निर्णयाने संघात दरी निर्माण झाली. संघाच्या एकजुटीला तडा गेला. त्यादिवशी विमानतळावर असल्या गोष्टीसाठी मतदान झाले. थोड्याच दिवसात देशांतर्गत मोसमाची सुरवात होणार होती, म्हणून काही खेळाडूंनी तो प्रस्ताव स्विकारला.”
हॅडली (Sir Richard Hadlee) सांगतात, “ती कार माझ्याकडे ठेवण्याचा कलंक माझ्यावर खूप काळ राहिला. परंतु आता अशी कोणतीही गोष्ट नाही.”
हॅडली यांनी आपल्या कारकीर्दीत ८६ कसोटी सामन्यांमध्ये सहभाग घेत ३१२४ धावांसोबतच ४३१ बळी देखील मिळवले आहेत. याच बरोबरीने ११५ वनडे सामन्यांत १७५१ धावा व १५८ बळी देखील घेतले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने रिचर्ड हॅडली यांच्या कामगिरीची दखल घेत २०१४ साली त्यांचा समावेश “आयसीसी हॉल ऑफ फेम”मध्ये केला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-वनडे सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद होणारे ६ भारतीय फलंदाज
-ते ३ झेल, ज्यामुळे खऱ्या अर्थाने बदलला भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा
-३ असे सामने, जे टीम इंडिया जिंकता-जिंकता झाली पराभूत