इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार जेफ्री बॉयकॉट यांनी महिला समालोचकाबद्दल वक्तव्य केल्यामुळे, त्यांना चाहत्यांबरोबरच क्रिकेटमधील दिग्गजांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. बॉयकॉट यांनी ऑस्ट्रेलियाची माजी महिला विश्वचषक विजेती कर्णधार आणि सध्याची समालोचक असणारी लिसा स्थालेकरला क्रिकेट सोडण्यासाठी सांगितलं आहे.
बॉयकॉट (Geoffrey Boycott) यांनी एका वृत्तपत्रासाठी आपल्या स्तंभात लिहलं होत, की काही निवडक लोकांनाच समालोचन करण्याची संधी मिळाली पाहिजे.
त्यांनी पुढे लिहले होते, “क्रिकेटचे समालोचन करण्यासाठी तुम्हाला त्याचा दबाव आणि तांत्रिक गोष्टीची माहिती असणे गरजेचं आहे. मला नाही वाटत तुम्ही गोष्टी वाचून, क्लब क्रिकेट किंवा महिला क्रिकेट खेळून हे समजू शकता. महिला आपल्या खेळात चांगल्या आहेत. पण त्या पुरुष क्रिकेटच्या ताकदीसमोर आणि वेगासमोर काहीच नाहीत.”
बॉयकॉट यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना लिसा (Lisa Sthalekar) म्हणाली, “बऱ्याच काळापासून ते ज्या खेळाचा भाग आहेत, त्या संपूर्ण खेळाचा ते अपमान करत आहेत. आता वेळ आली आहे, की त्यांनी हा खेळ सोडून द्यावा. ते एक महान क्रिकेटर म्हणून कायम आठवणीत राहतील.”
“बॉयकॉटच्या स्ट्राईक रेटपेक्षा, त्यावेळी क्रिकेट खेळणाऱ्या महिलांचा स्ट्राईक रेट चांगला होता. क्रिकेटचे ताकतीशी काही देणंघेणं नाही, जसं पुरुष क्रिकेटमध्ये असते. पुरूष आणि महिला या दोन्ही क्रिकेटची तुलना केली जाऊ शकत नाही. कारण दोन्हीही वेगळे आहेत,” असेही ती पुढे म्हणाली.
ऑस्ट्रेलियाला महिला विश्वचषक जिंकून देणारी लिसा पुढे म्हणाली, “क्रिकेट हा एक असा खेळ आहे. ज्यामध्ये सर्व लोक कोणताही भेदभाव न करता खेळतात. जर प्रत्येक जण या खेळावर तेवढंच प्रेम करतो, मग तो पुरुष असो किंवा महिला किंवा कोणत्याही देशाचा असो त्याला प्रसारणामध्ये (ब्रॉडकास्ट) संधी का मिळत नाही.”
बॉयकॉट यांनी कसोटीत २२, वनडेत १, प्रथम श्रेणीत १५१ आणि अ-दर्जाच्या क्रिकेटमध्ये ८ अशाप्रकारे एकूण क्रिकेट कारकीर्दीत १८२ शतके ठोकली आहेत.