भारतीय संघ येत्या ५ फेब्रुवारी पासून इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत विराट कोहली याने पहिल्या सामन्यानंतर पालकत्त्व रजा घेतली होती आणि भारतीय संघाची धुरा सांभाळली होती ती अजिंक्य रहाणे याने. परंतु विराट आता संघात परतला आहे. विलगीकरण काळानंतर भारतीय संघ मंगळवार (२ फेब्रुवारी) पासून मैदानात सरावासाठी उतरला आहे. अशातच भारतीय संघ आणि कोहली मैदानावर मस्ती करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
एमएस धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटची नक्कल
भारतीय संघाचा मैदानात सराव करत असतानाचा एक गमतीशीर व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय खेळाडू धावताना, फुटबॉल खेळताना तर, कर्णधार विराट हा माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी याच्या प्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉटची नक्कल करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. तसेच क्रिकेट चाहत्यांनी भरपूर कमेंट सुद्धा केल्या आहेत.
विराट कोहलीला विक्रम करण्याची संधी
इंग्लंड संघाविरुद्ध खेळताना कोहलीला अनेक विक्रम करण्याची संधी आहे. पहिल्या कसोटी सामन्यात विराटने अवघ्या १४ धावा केल्यास तो वेस्ट इंडिजचे महान कर्णधार क्लाइव्ह लॉयड यांना पिछाडीवर सोडेल. विराटने कर्णधार असताना आतापर्यंत ५२२० धावा केल्या आहेत. लॉयड हे ५३३३ धावांसह या विक्रमाच्या यादीत विराटच्या पुढे आहेत. त्यामुळे १४ किंवा त्यापेक्षा जास्त धावा करत विराटला लॉयड यांना मागे टाकण्याची संधी आहे.
या विक्रमाच्या यादीत ग्रीम स्मिथ (८६५९ धावा) अव्वलस्थानी विराजमान आहेत. तर ऍलन बॉर्डर (६६२३ धावा) आणि रिकी पाँटिंग (६५४२ धावा) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.
Team bonding 🤜🤛
Regroup after quarantine ✅
A game of footvolley 👍#TeamIndia enjoys a fun outing at Chepauk ahead of the first Test against England. 😎🙌 – by @RajalArora #INDvENGWatch the full video 🎥👉 https://t.co/fp19jq1ZTI pic.twitter.com/wWLAhZcdZk
— BCCI (@BCCI) February 2, 2021
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी
न्यूझीलंड संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तसेच भारत आणि इंग्लंड यांच्या मालिकेच्या निकालावर दुसरा अंतिम संघ कोण असेल? हे समजणार आहे. भारतीय संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्याची संधी आहे. भारतीय संघाने इंग्लंड संघाला २-०, २-१, ३-०, ३-१ किंवा ४-० ने मालिकेत पराभूत केले, तर भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचू शकतो. तसेच इंग्लंड संघाने भारतीय संघाला ३-०, ३-१ किवा ४-० ने पराभूत केले तर इंग्लंड संघही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
“मागे उभारून कर्णधार कोहलीची मदत करणे, आता हेच माझे काम”, रहाणेचे मोठे भाष्य
भारत का इंग्लंड, चेन्नई कसोटीत कोणाचे पारडे जड? ‘अशी’ आहे आकडेवारी
“भारतात कसोटी क्रिकेट खेळतांना आयपीएलचा अनुभव नाही येणार कामी”, ‘या’ इंग्लिश गोलंदाजाची स्पष्टोक्ती