इंग्लंड आणि भारत संघातील मँचेस्टर येथे होणारा कसोटी मालिकेतील पाचवा सामना सुरु होण्यापूर्वीच रद्द करावा लागला. कोरोना व्हायरसच्या कारणाने हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या मालिकेत खेळणारे आणि आयपीएलचा भाग असणारे खेळाडू अपेक्षेपेक्षा लवकर आयपीएल २०२१ हंगामाच्या दुसरा टप्प्यात सहभागी होण्यासाठी युएईला पोहचले. १९ सप्टेंबरपासून आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम खेळवला जाणार आहे. याबद्दल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे.
विराटने इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना रद्द होण्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे. तसेच कोविडमुळे उद्भवणाऱ्या अनिश्चित परिस्थितीत बायोबबल सुरक्षित राहिल अशी आशा व्यक्त केली आहे.
विराटने आरसीबीच्या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म्सशी बोलताना म्हटले की ‘आम्हाला दुबईला लवकर यावे लागले हे दुर्भाग्यपूर्ण होते. पण कोरोना व्हायरसमुळे अनेक गोष्टी अनिश्चित आहेत. अशा परिस्थितीत काहीही होऊ शकते. आशा आहे की आपण एक चांगले, मजबूत आणि सुरक्षित वातावरण बनवण्यात सक्षम राहू आणि हा आयपीएल हंगाम शानदार असेल.’
विराट पुढे म्हणाला, ‘सध्या हा एक रोमांचक काळ असणार आहे. हे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये आमच्यासाठी आणि मग टी२० विश्वचषकात भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे आहे.’ आयपीएल २०२१ ला कोरोनाच्या कारणाने २९ सामन्यांनंतर स्थगिती देण्यात आली होती. पण, नंतर हा उर्वरित हंगाम युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयपीएलनंतर १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.
आरसीबीत सामील झालेल्या खेळाडूंबद्दल विराट खूश
आयपीएल २०२१ हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातून आरसीबीच्या काही खेळाडूंनी माघार घेतली. त्यामुळे आरसीबीला काही नव्या खेळाडूंना संघात सामील करुन घ्यावे लागले. नव्याने संघात सामील झालेल्या खेळाडूंमध्ये वनिंदू हसरंगा, दुश्मता चमिरा, टीम डेविड आणि आकाश दीप यांचा समावेश आहे.
त्यांच्याबद्दल विराट म्हणाला, ‘मी सर्वांच्याच संपर्कात आहे. आम्ही गेल्या एक महिन्यापासून खूप चर्चा केली आहे. संघात बदली खेळाडू म्हणून सामील होणाऱ्या खेळाडूंबद्दलही चर्चा झाली. अखेर आम्ही प्रमुख खेळाडूंच्या बदल्यात प्रतिभाशाली खेळाडूंना संघाशी जोडण्यात यशस्वी झालो.’
तो पुढे म्हणाला, ‘आम्हाला प्रमुख खेळाडूंची अनुपस्थितीत जाणवेल, पण त्यांच्या जागेवर जे खेळाडू संघात येत आहेत, त्याच्याकडे युएईतील वातावरणासाठी चांगले कौशल्य आहे. मला त्यांना भेटायचे आहे. सर्वांबरोबर सराव करण्याची वाट पाहात आहे. आम्ही चांगल्या सुरुवातीची लय कायम राखण्याचा प्रयत्न करु.’ विराट सध्या इंग्लंडहून युएईला आल्याने ६ दिवसासांठी क्वारंटाईन झाला आहे. त्यानंतर तो संघात सामील होईल.
आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात आरसीबीची कामगिरी चांगली झाली होती. त्यांनी ७ पैकी ५ सामने जिंकत गुणतालिकेत तिसरा क्रमांक मिळवलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘इत्तू सा’, हिंदी भाषेबद्दल चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर डेविड मिलरने शेअर केले मजेशीर मीम
विराट कोहली आणि एमएस धोनीच्या नेतृत्वातील जडेजाने सांगितला फरक; म्हणाला…