fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कसोटी सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा तो एकमेव फलंदाज

क्रिकेट खेळात कोणताही प्रकार असो सुरुवातीची काही षटकं फलंदाज स्थिरावण्यास घेतात. पहिली काही षटकं व्यवस्थित स्थिर झाले की पुढे चांगली धावसंख्या उभारता येते. जगातील अनेक क्रिकेटपटू असे आहेत ज्यांचा सुरुवातील स्ट्राईक रेट हा अतिशय कमी असतो. परंतु नंतर ते हाच स्ट्राईक रेट १००च्याही पुढे नेतात.

काही मोजके फलंदाज असेही असतात जे पहिल्या चेंडूपासून धुव्वांदार फलंदाजी सुरु करतात. परंतु जगात असा एकच फलंदाज आहे ज्याने कसोटी सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आहे.

कसोटी सामन्यातील पहिल्याच डावातील पहिल्याच चेंडूवर षटकार-

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ख्रिस गेलने कसोटी सामन्याच्या पहिल्याच डावात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. वेस्ट इंडिज बांगलादेश दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी २०१२मध्ये आली होती. मालिकेतील पहिलाच कसोटी सामना ढाका स्टेडियमवर सुरु होता. कर्णधार डॅरेन सॅमीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशकडून २० वर्षीय सोहाग गाझी पदार्पण करत होता. बांगलादेशचा कर्णधार मुशफिकूर रहिमने चेंडू याच खेळाडूच्या हातात दिला. कारकिर्दीतील पहिलाच चेंडू वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने लाॅंग ऑनवरुन थेट स्टेडियम बाहेर भिरकवला. बरोबर दोघांचेही नाव इतिहासात अजरामर केले. आजही क्रिकेटमध्ये कोणाला हा कारनामा करता आला नाही. Chris Gayle hits the first ball of a Test Match for Six vs Bangladesh.

 वनडेतील डावातील पहिल्याच चेंडूवर षटकार-

भारत, झिंबाब्वे व यजमान ऑस्ट्रेलियाने २००४व्हीबी सिरीजमध्ये भाग घेतला होता. अपेक्षेप्रमाणे भारत व ऑस्ट्रेलिया संघ अंतिम फेरीत पोहचले होते. या मालिकेत तीन फायनल खेळवल्या जातात व जो दोन फायनल आधी जिंकेल त्याला विजयी घोषीत केले जाते. पहिला सामना भारत पराभूत झाला होता. दुसरा सामना ८ फेब्रुवारी २००४ रोजी झाला. यात नाणेफेक जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाॅटींगने प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. यात त्यांनी ५ बाद ३५९ धावांचा डोंगर उभा केला. ३६० धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताकडून विरेंद्र सेहवाग व सचिन तेंडूलकर फलंदाजीला आले.

गोलंदाजी मार्कवर तेव्हाचा भेदक गोलंदाज जेसन गिलेस्पी होता. सेहवागने गिलेस्पीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारत इरादे स्पष्ट केले. या षटकाराबरोबर सेहवागचे नाव इतिहासात लिहीले गेले. परंतु पुढे सेहवाग १२ तर सचिन २७ धावांवर बाद झाले. भारत हा सामना २०८ धावांनी पराभूत झाला व मालिकाही गमावली.

सेहवाग सोडून या ४ फलंदाजांनी मारले आहेत वनडे सामन्यांत धावांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर षटकार 

१.तमिम इक्बाल – बांगलादेशचा फलंदाज तमिम इक्बालने २०१७ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळताना असा कारनामा केला होता. त्यावेळी बांगलादेशचा संघ २७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना  इक्बालने जीतन पटेलने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता.

२. मार्टिन गप्टिल – न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिलने २०१९ च्या सुरुवातीला भारताविरुद्ध हेमिल्टन येथे झालेल्या वनडे सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. त्यावेळी न्यूझीलंडचा संघ ९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता.

३. मार्क ग्रेटबॅच – वनडेमध्ये सर्वात पहिल्यांदा धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या मार्क ग्रेटबॅच यांच्या नावावर आहे. त्यांनी १९९२ ला पाकिस्तान विरुद्ध खेळताना वासिम आक्रमने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. त्यावेळी न्यूझीलंड संघ १४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता.

४. फिल वॉलेस – वेस्ट इंडिजने फलंदाज फिल वॉलेस यांनी भारताविरुद्ध १९९८ ला असा कारनामा केला होता. त्यांनी ढाका येथे झालेल्या वनडे सामन्यात जवागल श्रीनाथने टाकलेल्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला होता. तेव्हा भारताने वेस्ट इंडिजला २४३ धावांचे आव्हान दिले होते. Virender Sehwag hits the first ball of the match for a six.

ट्रेंडिंग घडामोडी – 

संपुर्ण यादी- कोरोनाविरुद्ध लढाईत मदत केलेले ५ क्रिकेट बोर्ड, ज्यांचा भारतीयांना वाटेल कायमच अभिमान

वनडेत १८३ धावा करा आणि टीम इंडियाचं कर्णधार बना

जेव्हा पंच असलेल्या वडिलांनी ‘बाप’ निर्णय घेत फलंदाज मुलाला दिले होते बाद