भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन हा क्रिकेटच्या मैदानावरील त्याच्या प्रदर्शनाने मने तर जिंकतोच. परंतु बऱ्याचदा त्याला त्याच्या मैदानाबाहेरील कृतीनेही मने जिंकताना पाहिले गेले आहे. झिम्बाब्वे विरुद्ध भारत संघात शनिवारी (२० ऑगस्ट) हरारे येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यानंतरही त्याने आपल्या कृतीने कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांची हृदय जिंकली आहेत. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका चिमुकल्या चाहत्याची मागणी पूर्ण करताना दिसत आहे.
झिम्बाब्वेच्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संजूने (Sanju Samson) मॅच विनिंग प्रदर्शन केले. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत संजूने ३९ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने नाबाद ४३ धावा केल्या. तसेच त्याने खणखणीत षटकार मारत संघाला सामन्यासह मालिकाही जिंकून दिली.
त्याच्या या प्रदर्शनामुळे चाहते चांगलेच प्रभावित झाले आहेत. त्यामुळे सामन्यानंतर संजूची एक झलक पाहण्यासाठी चाहते तरसले होते. संजूनेही चाहत्यांना निराश केले नाही. त्याने चाहत्यांची जाऊन भेट घेतली. त्यांना ऑटोग्राफ दिले, त्यांच्यासोबत सेल्फी काढल्या. त्यातही त्याने एका चिमुकल्या चाहत्याला भलतेच खुश केले. त्याने त्या लहानग्या चाहत्याच्या बॅटवर स्वाक्षरी केली, ज्यानंतर तो चिमुकला खूपच खुश दिसला.
https://t.co/hKjcDXF3w6#SanjuSamson fans ki demand pey ☝️. #CricketTwitter @rajasthanroyals @SanjuSamsonFP @SanjuSamsonEra @SanjuSamsonEra pic.twitter.com/9Ft1zOVUzt
— Vimal कुमार (@Vimalwa) August 21, 2022
संजूने (Sanju Samson) झिम्बाब्वेच्या एका कँसरशी झुंज (Zimbabwe Cancer Fighting Kid) देत असलेल्या चिमुकल्याला प्रेमळ वागणूक दिली आहे. या मन जिंकणाऱ्या क्षणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत अनेकांनी संजूवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धचा दुसरा वनडे सामना झिम्बाब्वेतील कँसरग्रस्त मुलांना समर्पित केला. या चांगल्या कामात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दर्शकांना केशरी रंगाची जर्सी घालून सामना पाहायला येण्याचे आवाहनही बोर्डाने केले होते. देशातील आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही सामाजिक भान जपत झिम्बाब्वे बोर्डाने घेतलेल्या या निर्णयाचे तेथील रहिवास्यांनी स्वागत केले. बरेचसे कँसरग्रस्त चिमुकले आणि त्यांचे कुटुंबिय केशरी रंगाचे कपडे घालून हा सामना पाहायला आले होते.
यापैकीच एक चिमुकला संजूच्या खेळीने प्रभावित झाला. सामना संपल्यानंतर त्या चिमुकल्याने संजूकडे धाव घेतली आणि आपल्याकडे असलेल्या चेंडूवर संजूला ऑटोग्राफ देण्याती विनवणी केली. मोठ्या मनाच्या संजूनेही त्याला लगेचच ऑटोग्राफ दिला. यानंतर संजूने त्या चिमुकल्याशी काही वेळ गप्पाही मारल्या.