भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याला उद्यापासून (२४ फेब्रुवारी) अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. चेन्नई येथील पहिल्या दोन सामन्यांपैकी पहिला सामना इंग्लंड संघाने जिंकला तर दुसऱ्या सामन्यात यजमान भारतीय संघाने बाजी मारली. त्यामुळे मालिका १-१ अशा उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे.
त्यातच तिसरा सामना गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळवला जाणार असल्याने या सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मात्र या सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना पाहुण्या इंग्लिश संघाचा कर्णधार जो रूटने एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. तिसऱ्या सामन्यासाठीची गोलंदाजीची फळी आम्ही अजूनही निश्चित न केल्याचे त्याने आभासी पत्रकार परिषदेत सांगितले.
“आम्ही अजून वेळ घेऊ इच्छित आहोत”
तिसऱ्या कसोटी सामन्यात कुठल्या गोलंदाजांसह उतरायचे, हा इंग्लिश संघ व्यवस्थापनासमोर सध्या पेच आहे. याबाबत विचारले असता रूट म्हणाला, “हे मैदान आणि गुलाबी चेंडूने इथे खेळला जाणारा पहिला सामना, हे पहिले असता आम्हाला त्याबाबत फारशी कल्पना नाही. त्यामुळे जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ आम्ही या निर्णयासाठी वापरू. आम्ही स्वतःला शक्य तितका वेळ देऊ इच्छित आहोत.”
जोफ्रा आर्चर तंदुरुस्तीतून सावरल्याने इंग्लंडपुढील पेच वाढला आहे. त्यावर बोलताना रूट म्हणाला, “आर्चर तंदुरुस्त झाला असून आमच्यासाठी हे चांगले चिन्ह आहे. तो एक जागतिक दर्जाचा वेगवान गोलंदाज आहे आणि त्याचे कौशल्य आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये आम्हला निवडीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असून आम्ही योग्य ती निवड करू.”
दरम्यान, इंग्लंडच्या संघात नियमित यष्टीरक्षक जॉनी बेअरिस्टोचे देखील पुनरागमन झाले आहे. त्यामुळे इंग्लंडसमोर मागच्या सामन्यात समाधानकारक कामगिरी केलेल्या बेन फोक्स आणि पुनरागमन झालेल्या बेअरिस्टो यापैकी कोणाला संधी द्यायची, हाही प्रश्न आहे. समतोल साधत इंग्लंडचे संघ व्यवस्थापन कशी संघनिवड करणार, हे आता सामन्यापूर्वी नाणेफेकी वेळीच कळेल.
महत्वाच्या बातम्या:
माजी भारतीय दिग्गज बेदी यांची प्रकृती चिंताजनक, करण्यात आली बायपास सर्जरी
युवा खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! मास्टर ब्लास्टर देणार फलंदाजीचं मोफत प्रशिक्षण, पाहा कसं ते