पुणे । रिग्रीन संघाने विनर अकादमी संघाला ९ गडी राखून पराभूत करताना आझम कॅम्पस मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या आबेदा इनामदार ऑल इंडिया निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
अंतिम लढतीत नाणेफेक जिंकून विनर अकादमी संघाने निर्धारित २० षटकांत ९ बाद १०० धावापर्यंत मजल मारली. श्वेता जाधवने २९ (३ चौकार), सई पुरंदरे २८ (४ चौकार) धावांची महत्वपूर्ण खेळी केली.
इशा पाठारे व नीलम पाटील यांनी प्रत्येकी २ तर, मुक्ता मगरे व तेजल हसबनीस यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले. रिग्रीन संघाने १७.१ षटकांत १ बाद १०४ धावा करताना विजय साकारला.
सलामीवीर मुक्ता मगरेने नाबाद ५२ (५ चौकार), तेजल हसबनीसने नाबाद २८ (३ चौकार) तर, प्रियांका घोडकेने १८ (३ चौकार) धावांची खेळी करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने पिडीसीए संघाला १८ धावांनी पराभूत केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आझम सपोर्ट अकादमी संघाने निर्धारित १५ षटकात ७ बाद ८६ धावा केल्या. किरण नवगिरे २२ (२ चौकार), सोनाली पाटीलने १५, गौतमी नाईक १२ (१ चौकार) धावा केल्या.
उत्कर्षा देशपांडेने भेदक गोलंदाजी करताना ३ गडी बाद केले. तिला रोहिणी मानेने २ तर, प्रतिभा अरगडेने एक गडी बाद करताना सुरेख साथ दिली. पीडीसीए संघाचा डाव १४.३ षटकांत सर्वबाद ६८ धावांत संपुष्टात आला. रोहिणी मानेने एकाकी किल्ला लढविताना ३४ (४ चौकार) धावांची खेळी केली. प्रज्ञा वीरकर व किरण नवगिरेने प्रत्येकी २ तर, सोनाली शिंदे व गौतमी नाईकने प्रत्येकी १ गडी बाद केला. किरण नवगिरेला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१८३ धावा व ३ विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी बजावणाऱ्या रिग्रीन संघाच्या मुक्ता मगरेला ‘सर्वोत्तम खेळाडू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘सर्वोत्तम फलंदाज’ म्हणून आझम स्पोर्ट्स अकादमी संघाच्या किरण नवगिरेला (२२६ धावा), ‘सर्वोत्तम गोलंदाज’ म्हणून पीडीसीएच्या रोहिणी मानेला (९ विकेट्स) सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण एमसीई सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. आंतरराष्ट्रीय खेळाडू सोनिया डबीर, आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक गुलजार शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मजीद सय्यद यांनी केले.
संक्षिप्त धावफलक : तिसऱ्या स्थानासाठी : आझम स्पोर्ट्स अकादमी : १५ षटकांत ७ बाद ८६. (किरण नवगिरे २२(२ चौकार), सोनाली पाटील १५, गौतमी नाईक १२ (१ चौकार), उत्कर्षा देशपांडे ३-०-१२-३, रोहिणी माने ३-०-८-२, प्रतिभा अरगडे ३-०-२३-१) वि वि पीडीसीए १४.३ षटकांत सर्वबाद ६८ (रोहिणी माने ३४ (४ चौकार), किरण नवगिरे २.३,०-४-२, प्रज्ञा वीरकर ३-०-१४-२, सोनाली शिंदे ३-०-१३-१, गौतमी नाईक ३-०-१९-१)
अंतिम लढत : विनर अकादमी : २० षटकांत ९ बाद १०० (श्वेता जाधव २९ (३ चौकार), सई पुरंदरे २८ (४ चौकार), नीलम पाटील ४-०-१२-२, इशा पाठारे ४-०-२२-२, मुक्ता मगरे ४-०-१६-१, तेजल हसबनीस ४-०-१४-१) पराभूत वि रिग्रीन : १७.१ षटकांत १ बाद १०४ (मुक्ता मगरे नाबाद ५२ (५ चौकार), तेजल हसबनीस २८ (३ चौकार), प्रियांका घोडके १८ (३ चौकार))