भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज यशपाल शर्मा यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, भारताच्या या धाडसी व संकटमोचकाची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूविषयी काही गोष्टी आपण जाणून घेऊया.
१) संकट मोचक-
भारताचे महान सलामीवीर व कर्णधार सुनील गावसकर यांनी यशपाल यांना ‘संकटमोचक’ ही उपाधी दिली होती. गावस्कर व शर्मा अनेक वर्ष भारतीय संघासाठी एकत्रितपणे क्रिकेट खेळले. दबावाच्या स्थितीतून संघाला बाहेर काढण्याचे काम, यशपाल चोखपणे करत असल्याने त्यांना ही उपाधी देण्यात आली होती.
२) एसटीडीचा किस्सा –
भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांनी यशपाल यांच्याबद्दलचा एक गमतीदार किस्सा सांगितला होता. गायकवाड सांगतात,
” एकदा यशपाल धावत ड्रेसिंग रूममध्ये आला. तो छातीत जळजळ होत असल्याची तक्रार करत म्हणाला,
” मला एसटीडी झाली. याआधी कधीच नव्हती झाली.”
संघ सहकाऱ्यांना काहीच कळेना तेव्हा कोणीतरी म्हटले त्याला ऍसिडिटी म्हणायचंय. तेव्हा सगळे पोट धरून हसत होते.
३) चेतन शर्माचे काका-
भारतातर्फे पहिली हॅटट्रिक घेणारे चेतन शर्मा हे यशपाल शर्मा यांचे पुतणे होत. चेतन यशपाल यांच्यापेक्षा अवघे बारा वर्ष लहान आहेत. काका-पुतण्याच्या जोडीने भारतासाठी एकत्रितपणे दोन एकदिवसीय सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे. चेतन यांच्या गोलंदाजीवर यशपाल यांनी इंग्लंडच्या ग्रीम फ्लॉवर यांचा झेल देखील घेतला होता.
४) जागतिक दर्जाच्या गोलंदाजांसमोर धाडसी फलंदाजी-
१९७७ मध्ये दुलीप ट्रॉफी दरम्यान उत्तर विभागासाठी खेळताना यशपाल यांनी दक्षिण विभागाच्या आबिद अली, व्यंकटराघवन, इरापल्ली प्रसन्ना व चंद्रशेखर या जागतिक दर्जाच्या चौकडीचा सामना केला होता. पाच तास फलंदाजी करत त्यांनी १७३ धावांची सुंदर खेळी केली होती.
५) सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू
१९७८ मध्ये यशपाल यांना सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यावर्षी, यशपाल यांनी ७६.२० च्या सरासरीने ७६२ धावा काढल्या होत्या.
६) देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा रतीब-
१९७९ मध्ये वेस्ट इंडिज संघ भारत दौर्यावर आला असता, यशपालयांनी उत्तर विभागाकडून खेळताना नाबाद १३५ धावा केल्या. त्यावेळी, वेस्ट इंडीजच्या गोलंदाजीच्या ताफ्यात व्हॅनबर्न होल्डर आणि माल्कम मार्शल यांचा समावेश होता. त्याच्या पुढच्याच सामन्यात त्यांनी, उत्तर विभागाला दुलीप करंडक मिळवून दिला. सुनील गावसकर, अंशुमन गायकवाड, दिलीप वेंगसरकर, अशोक मंकड, यजुवेंद्रज सिंग आणि करसन घावरी यासारख्या दिग्गजांचा समावेश असलेल्या पश्चिम विभागाच्या संघाविरुद्ध, पहिल्या डावात त्यांनी ८९ धावांची उत्कृष्ठ खेळी साकारली. तिथेच त्यांना, राष्ट्रीय संघाचे तिकिट मिळणार हे पक्के झाले होते.
७) गुंडाप्पा विश्वनाथ यांच्यासोबत मॅरेथॉन भागीदारी-
इंग्लंडविरूद्ध चेन्नई येथे विश्वनाथ आणि यशपाल यांनी भारतासाठी तिसर्या गड्यासाठी ३१६ धावांची भागीदारी रचली. विश्वनाथ यांनी द्विशतक आणि यशपाल यांनी १४० धावा फटकावल्या होत्या. कसोटीच्या, दुसर्या दिवशी दोघांनी चिवट फलंदाजी केली. त्यावेळी, संपूर्ण दिवसभर नाबाद राहणारी ही तिसरी जोडी होती. इंग्लंड विरुद्धचा हा सामना भारताने बरोबरीत सोडवला.
८) १९८३ विश्वचषक विजयाचे नायक-
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजवर भारताने विजय मिळवला तेव्हा, यशपाल यांनी भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताची अवस्था पाच बाद १४१ अशी असताना, त्यांनी १२० चेंडूत ८९ धावा काढल्या. एखाद्या कसलेल्या खेळाडूप्रमाणे त्यांनी स्वतःच्या व संघाच्या धावसंख्येला आकार दिला. ऑस्ट्रेलियाविरुध्द ४० आणि उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुध्द ६१ धावांच्या संस्मरणीय खेळ्यासुद्धा केल्या. यशपाल यांनी १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत ३४.२८ च्या सरासरीने २४० धावा केल्या.
९) निवडकर्ता-
भारतीय क्रिकेटच्या अस्वस्थतेच्या काळात, म्हणजेच २००३ ते २००६ यशपाल हे, भारतीय संघाचे निवडकर्ता देखील राहिले. तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्या विरुद्ध ते सौरव गांगुलीच्या समर्थनात उभे राहिले. २००८ मध्ये पुन्हा त्यांची निवड समितीवर नियुक्ती करण्यात आली. मधल्या काळात त्यांनी उत्तर प्रदेश रणजी संघाचे प्रशिक्षक पद भूषवले.
१०) अष्टपैलू क्षमता-
यशपाल हे फलंदाज असले तरी, वेळप्रसंगी गोलंदाजी सुद्धा करत. त्यांच्या नावे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ४७ बळी आहेत. यशपाल यांच्यासारख्या दर्जेदार खेळाडूला, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो मान मिळायला पाहिजे होता, तो मात्र कधीही मिळाला नाही.
ट्रेंडिंग लेख-
-वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा करणारे अव्वल ३ भारतीय फलंदाज
-वनडे क्रिकेटमध्ये या ३ भारतीयांची नावे सुवर्णाक्षरांनी लिहीली गेली, एकाने तर…
-आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक बळी मिळवणारे पहिले १० खेळाडू